श्रीलंकेत १८६१ साली कॉफी पिकावर ही बुरशी शास्त्रज्ञांना आढळुन आली,त्यानंतर जावा देशात स्केल(खवले किड)किडीच्या मृत अवशेषांच्या भोवताली पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसुन आली.झिमरमॅन या शास्त्रज्ञाने ह्या बुरशीचे शुध्द(Pure Culture)स्वरुप वाढवून त्या बुरशीचा किड नियंत्रणासाठी काही उपयोग होऊ शकतो का यासंबधी अधिक संशोधन सुरु केले.१९३९ साली ब्राझिल मध्ये विगेस ह्या शास्त्रज्ञाने व्हर्टिसिलयम चा वापर कॉफी पिकातील खवले किड नियंत्रणासाठी केला आणि त्यानंतरच ह्या बुरशीला आताचे नाव प्राप्त झाले.व्हर्टिसिलियम लेकॅनी ही बुरशी पिकांवरिल विविध किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.मावा,पिठ्या ढेकूण,फुलकिडे,लेपिडोप्टेरा (अळिवर्गीय)आणि डिप्टेरा (माशीवर्गीय)गटातील इतर किडी,पांढरी माशी तसेच काही सुत्रकृमींच्या विरोधात ही बुरशी कार्य करते.

ही बुरशी लैंगिक पध्दतीने पुनरुत्पादन करु शकत नाही.अलैंगिक पध्दतीने तयार केले जाणारे कोनिडोस्पोअर्स हे किडीच्या तसेच काही बुरशींच्या नियंत्रणासाठी उयपुक्त ठरतात. व्हर्टिसिलियम चे कोनिडीयोस्पोअर्स रुजताना किडींच्या शरीरात घातक आक्रमण करुन तसेच हायड्रोलायटिक एन्झाईम्स स्रवुन प्रवेश मिळवतात.ही बुरशी किडीच्या अंडी-तसेच अळी(निप्फल स्टेज),प्रौढ अवस्था नियंत्रणात येऊ शकते.व्हर्टिसिलियम तिच्या मायसेलिम च्या सहाय्याने पानांच्या खालील बाजुस चिटकुन देखील राहते.किडीला संसर्ग झाल्यानंतर ७ दिवसात किडीच्या शरीराच्या भोवताली तसेच किडीच्या शरीरावर पांढऱ्या पिवळसर रंगाचे कोनिडीया दिसुन येतात.व्हर्टिसिलियम तिच्या मायसेलियम मधुन ब्रासिनोलाईड ह्या सायक्लोडेप्सिपेप्टाईड ह्या गटातील विषारी द्रव स्रवते,तसेच डिपिकोलिनिक अँसिड,ब्युव्हिरिसिन,डिसिनेडोईक आणि १०-हाड्रॉक्सि ८-डिसिनोईक हे विषारी द्रव देखिल स्रवते,ज्यामुळे किडींच्या शरिरात प्रवेश मिळवणे तसेच किडींचा नायनाट करण्यास मदत मिळते.
व्हर्टिसिलियम काही पिकांच्या पेशींत देखील आत जाऊन राहते,त्यामुळे पिकाच्या नैसर्गिक प्रतिकारक क्षमतेला देखील चालना मिळते.व्हर्टिसिलियम बुरशी सिस्ट निमॅटोड(Heterodera schachti)च्या अंडी आणि प्रौढ अवस्था देखिल नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरते.ह्या निमॅटोडच्या अंड्यामधे शिरुन हि बुरशी त्यात असणाऱ्या घटकांवर उपजिविका करते.बुरशीला अंडी,तसेच प्रौढ निरॅटोड वर हल्ला करण्यास ६० तास पुरेसे ठरतात,त्यानंतर किडीच्या आत जाऊन हि बुरशी त्यातील घटकांवर उपजिविका करुन निमॅटोड चा नायनाट करते.निमॅटोड ची हि प्रजाती प्रामुख्याने सोयाबीन,शुगर बीट,कोबी,फुलकोबी पिकांवर आढळून येते.
व्हर्टिसिलियम च्या कोनिडीया रुजण्यासाठी पाण्याची नितांत गरज भासते.सहसा पाण्याचा पातळ पापुद्रा असल्यास अशा वातावरणात बुरशी चे कोनिडिया किडीवर सहजरीत्या रुजु शकतात.बुरशीच्या वाढीसाठी १५ ते ३० डे.से.तापमान योग्य ठरते.बुरशीच्या कार्यक्षमतेसाठी १० ते १३ तास जास्त आर्द्रता असणे गरजेचे असते.व्हर्टिसिलियम, मेटारायझियम,तसेच इतर उपयुक्त बुरशींच्या कार्यक्षमतेत योग्य तापमान आणि जास्त आद्रता ह्या फार महत्वाच्या ठरतात. सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के असणे हे बुरशीच्या वाढीसाठी पोषक ठरते.ह्या पेक्षा कमी आर्द्रतेत बुरशीची वाढ कमी होते.

व्हर्टिसिलियमचे उत्पादन करतांना काहीवेळेस जी फरमेंटेशन पध्दत वापरली जाते तसेच काही शेतकरी ज्या फरमेंटेशन पध्दतीचा अवलंब करतात( शेण, डाळीचे पिठ, गुळ, दही, ताक वै. पदार्थ एकत्र करुन कुजवतात)त्या पध्दतीने वाढविल्यास त्यापासुन मिळणारे कोनिडिया हे किडीस संसर्ग करण्यास सक्षम राहत नाहीत.त्याऐवजी द्रव सतत हलवत राहणे (shaken Liquid) आणि घन पदार्थावर वाढविलेल्या व्हर्टिसिलियम मधुन किडीस संसर्ग होवु शकेल असे कोनिडिया मिळतात.
त्यामुळे विविध बुरशी फरमेंटेशन तंत्रज्ञानाने वाढविण्यापुर्वी हा शास्त्रीय दृष्टीकोण समोर ठेवल्यास मर्यादीत स्रोतांपासुन जास्तीत जास्त लाभ करुन घेता येईल.व्हर्टिसिलियम चे कोनिडीयोस्पोअर्स हे लहान मोठ्या आकाराचे असतात,आकारने लहान असलेले स्पोअर्स हे मावा किडीस संसर्ग करण्यास सक्षम असतात तर आकाराने मोठे असलेले स्पोअर्स हे पांढऱ्या माशीला संसर्ग करण्यास सक्षम असतात. इंग्लंड येथील ग्रीन हाऊस मध्ये क्रायसॅन्थॅमम पिकावरिल मावा किडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम चा वापर केला असता ३ महिन्यांपर्यंत किडिचे नियंत्रण मिळाले,नियंत्रित वातावरणात शेती असल्याने तेथील आर्द्रता आणि तापमान नियंत्रित केले जाते,अशा परिस्थीतीत बुरशीची वाढ झपाट्याने होवुन किड नियंत्रणात मदत मिळते. एकदा किडीला संसर्ग झाल्यानंतर तिच्या मृत्युनंतर देखील त्यातुन कोनिडियोस्पोअर्स हे हवेत पसरतात ज्यामुळे इतरही किडींना संसर्ग होवुन त्याचा मृत्यु होतो.ग्रीन हाऊस मधील काकडी आणि टोमॅटो पिकावरिल पांढऱ्या माशीच्या नियंत्रणात देखील व्हर्टिसिलियम च्या वापरामुळे किडिंचे ९० टक्के नियंत्रण मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञ करतात.किड नियंत्रणाच्या कामात जास्तीत जास्त प्रमाणात स्पोअर्स असलेले द्रावण नियंत्रण हे चांगल्या प्रकारे मिळते.















