नाशिक (विलास गरूड) –
नवीन युवा पिढी मिळेल त्या पाच आकडी पगाराच्या मागे धावत आहे, असे असतांना मात्र पदवी घेऊन नोकरीची अपेक्षा न करता गोपालन-गोसंवर्धन करुन करिअरचा श्रीगणेशा करीत खैरनार बंधुनी तरुणांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. गोपालनापर्यंत सिमीत न रहाता शुध्द जातीच्या उच्च गुणसुत्रांसहित अधिक दुध उत्पादन देणार्या गोवंशाची निर्मीती, विषमुक्त व सुरक्षीत अन्न निर्मीतीचे उदिष्टे ठेवत राहुल मनोहर खैरनार यांनी सुरु केलेल्या “इंडिजिनस फार्म”ने अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे. या क्षेत्रात येणार्या नवीन गोपालकांना त्यांचा इंडिजिनस फार्म दीपस्तंभ ठरत आहे.
कृषी क्षेत्रातील पदवी घेतलेल्या नाशिक येथील तरुणाने नोकरी मागे न धावता कृषी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. विषमुक्त अन्न व दुध निर्मितीसाठी देशी गोवंशाचे महत्व लक्षात घेऊन दोन वर्ष विविध राज्यातील गोवंशाचे अभ्यास करुन गीर गायीची निवड करत नाशिकमध्ये व्यवसाय सुरू केला. गीर गाईची उच्च गुणसुत्र व दुध उत्पादन आधिक असणारी नविन पिढी तयार करणे करीता इंडिजीनस फार्म नावाने गोसवंर्धन सुरु केले. ते आज तब्बल 75 गाईचे तंत्रशुध्द पध्दतीने व्यवस्थापन व संवर्धन करत आहेत. रोजचे 150 लीटर दुध उत्पादन करुन 200 ग्राहकांचे नेटवर्क तयार करण्यात ते यशस्वी झालेले आहेत. अशा आधुनिक पद्धतीने गोसवंर्धनाला ओळख देण्यार्या तरुणाचे नाव आहे राहुल मनोहर खैरनार…!
रोगमुक्त गीर गोवंशाची निवड करून संवर्धन
खैरनार बंधू उच्च गुणसूत्र व अधिक उत्पादन देणारे देशी गोवंश तयार करण्याकरीता फक्त नैसर्गिक सवंर्धन पध्दत न वापरता कृत्रिम रेतन व आय.व्ही.एफ. सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन शास्त्रीय पध्दतीने गोवंश सवंर्धन करत आहे. शुध्द देशी गीर गोवंशाची निवड करुन त्यांची टी. बी, जे. डी व ब्रुसेलोसिस या आजारांची तपासणी करण्यात आलेली आहे. गोसंवर्धनासाठी गीर गोवंशाचे गुणधर्म, उच्च गुणसूत्र व वंशावली उपलब्ध असलेल्या रोगमुक्त गीर गोवंशाची निवड करून संवर्धन करण्यात येत आहे.
इंडिजिनस फार्ममधील गोसंवर्धन पध्दती व वैशिष्ट्ये
1. नैसर्गिक पध्दत : भुवनेश्वरी पीठ, गौडल यातील दूध प्रतियोगिता विजेती आई बबू व प्रसिद्ध नंदी पारस यांचे उच्च गुणसूत्र असलेल्या भुवन यामार्फत नंदीद्वारा नैसर्गिक संवर्धन करण्यात येते.
2. कृत्रिम रेतन : खैरनार बंधू यांनी गिर मधील प्रसिध्द वंशावली, ब्लड लाईन्स व शारीरिक रचना यांचा अभ्यास करुन भारतात उपलब्ध सन 1985 मधील प्रसिध्द गीर नंदी ते सन 2021 मधील प्रसिध्द गीर नंदीचे विर्यकांडी, वीर्य गोळी (सीमेन पेल्लेट्स) मिळवलेले आहे. समवेत ब्राझील येथील 2 वळुंचे कन्व्हेंशनल सिमेन व 2 वळुंचे सेक्स सोर्टेड सिमेन इंडिजिनस फार्मच्या सिमेन बँकेत स्टोअर करणेत आलेले आहे. सदर सिमेन बँकेत 35 पेक्षा जास्त उत्कृष्ठ वळुंचे सिमेन साठवण्यात आलेले आहे.
3. आय. व्ही. एफ : गोवंश संवर्धन क्षेत्रात आय. व्ही. एफ. सर्वात प्रगत व आधुनिक तंत्रज्ञान आहे. इंडिजीनस फार्ममध्ये 2020 मध्ये प्रायोगिक तत्वावर आय.व्ही.एफ. कार्यक्रम राबविण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमात आय.व्ही.एफ तंत्रज्ञानद्वारे भारतीय देशी गिर गोवंशाची 2 वासरी व भारतीय गीर गोवंश व ब्राझील मधील गीर नंदी यांद्वारे 2 वासरी व 2 वासरे जन्माला आलेली आहे. सदर प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाला असुन आय.व्ही. एफ तंत्रद्वारे 50 कालवडी तयार करण्याचा खैरनार यांचा मानस आहे.
सदर आय.व्ही.एफ कार्यक्रमसाठी खैरनार यांनी ब्राझीलमधुन गीर गोवंशाचे सेक्स सोर्डेट सिमेन आयात केलेले आहे. ब्राझील मधून गीर गोवंशाचे सेक्स सोर्टेड सीमेन आयात करणारे पहिले गोपालक व शेतकरी उत्पादक कंपनी ठरली आहे.
यामुळे गीर गायीची निवड
गीरर गायीला सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतीक महत्व आहे. भारतात एकूण 37 देशी गाईच्या जाती असुन अनेक जातीचे सवंर्धन न झाल्याने त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा प्रकारे देशी गीर गायीच्या शुध्द जातीच्या र्हास होण्यापूर्वी त्यांचे सवंर्धन होणे फार आवश्यक आहे. उच्च दुध उत्पादन क्षमता असणारी गीर मिळविण्यासाठी गीर जातीच्या गायीची सुधारणा आणि विकास करणे शेतकरी आणि उद्योजकांना उच्च दुध उत्पादन क्षमता असणारी शुध्द गिर जाती मिळवुन देण्यासाठी वीर्य आणि गर्भ उपलब्ध करुन देणे. आनंदी गायींचे निरोगी ए 2 दुध आणि दुधाचे पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यावर खैरनार यांचा निर्धार होता. त्यासाठी गीरर हा गोवंश त्यांना योग्य वाटला.
इंडिजिनस फार्मकरीता गाईची निवड करण्यासाठी खैरनार बंधुनी जवळपास दोन वर्ष गुजरात राज्यांतील 250 हूनन आधिक गोशाळांना भेटी दिल्या. 20 हजार गाई पाहिल्यानंतर 400 गाईंच्या रक्ताच्या चाचण्या करुन त्यात टी.बी. जे.डी., आय.बी.आर. आणि ब्रुसेलोसीस या रोगांची चाचणी करुन रोगमुक्त 75 गाईची निवड केली. या व्यवसायाचा विस्तार करताना त्यांचे भाऊ राजेश खैरनार यांची त्यांना मोलाची साथ मिळतेय. कृषी विभागात सेवेत असलेल्या राजेश यांच्या अनुभवाचा देखील या व्यवसायात मोलाचा हातभार लागतोय.
आहारात 16 औषधी वनस्पती
गाईची शारीरिक स्थिती व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरीता गायींच्या आहारात सोळा प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश केला जातो. यामध्ये प्रामुख्याने शतावरी, अश्वगंधा, जीवंती, गुळवेल, आवळा, बेहडा, त्रिफळा, सफेत मुसळी, शेवगा पावडर, ज्येष्ठमध, पुत्रणजीवी, अर्जुन, बेल, विदारीकंद, हळंद सुंठ या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या औषधी वनस्पतीमुळे गाईची आरोग्य निरोगी ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे. यामुळे गाईची रोग प्रतिकार क्षमता देखील वाढत असुन दुधाची गुणवत्ता देखील वाढते. येथील गायींवर आयुर्वेदिक आणि होमियोपॅथिक औषधांद्वारे उपचार केले जातात. गाईच्या आहारात हर्बल घटकांसह रसायनमुक्त चार्याचा समावेश असतो.
या नाविन्यपुर्ण प्रकल्पास विविध क्षेत्रातील जाणकार, शेतकरी, कृषी उद्योजक, गोपालक भेटी देतात. शुद्ध देशी जातीच्या गायींच्या संवर्धनासाठी इडिजिनस फार्मने पुढाकार घेतला आहे. त्याचीच सुरुवात शुध्द देशी गीर गायींचे संवर्धन करुन देशाचा राष्ट्रीय वारसा जपण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शुध्द, रोगमुक्त, उच्च दर्जाच्या गीर गाईचे त्यांच्या संपुर्ण वंशावळीसह या फार्ममध्ये संवर्धन केले जाते. या शिवाय उच्च प्रतीच्या कार्यक्षम गायींची निवड करुन त्यांचे वंश हे शेतकरी व गोपालकांसाठीही उपलब्ध करून दिले जातात.
गीर गाय निवडीचा उद्देश
निरोगी ए-2 दुध मोठया प्रमाणात उपलब्ध करुन, निरोगी समाज आणि त्यातुन निरोगी राष्ट्र निर्माण करणे, शेतकर्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करुन देणे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. एकुण देशी गायीपैकी अंदाजे 3.38 % वाटा हा गीर गायींचा आहेत. या गीर जातीचे नाव, त्यांचे मूळ ठिकाण, गुजरातच्या गीर जंगलावरुन ठेवण्यात आले आहे. भारतीय ए-2 दुध उत्पादनात गीर गायींचे प्रमुख योगदान आहे. त्यामुळे गीर गायींच्या संवर्धनासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहे.
गीर ही दुग्ध उत्पादनामध्ये उच्च दर्जाची, चांगली प्रजनन क्षमता असणारी उष्णता सहनशिलता, सोपी देखभाल, उच्च रोगप्रतिकार क्षमता आणि दीर्घायुष्य यासाठी उत्कृष्ठ प्रजाती मानली जाते. अमरेली, भावनगर, जुनागड, (अलीकडेच बनलेल्या गिर-सोमनाथ जिल्हयासह) आणि गुजरातच्या सौराष्ट्र भागातील राजकोट जिल्हयात गिर गायींचे मोठया प्रमाणात संवर्धन केले जाते. इंडिजिनस फार्ममध्ये देशी गिर गायीच्या विविध प्रसिध्द लाईन्सचे गुणसुत्र एकाच छताखाली उभे आहेत, हे विशेष. यामध्ये प्रामुख्याने भावनगर लाईन, भाडवा लाईन, कातर लाईन, भुतवड लाईन, मोरबी लाईन, जुनागड व सारंगपुर लाईन अशा प्रकरामधील शुध्द जातीच्या गीर गाईची निवड करण्यात आलेली आहे.
इंडिजिनस फार्ममध्ये शुध्द देशी गीर जातीच्या गायी आहेत. सदर गायी निरोगी, तणावमुक्त आणि आनंदी आहेत. व चांगल्या वंशावळीच्या असुन त्यांची वशांवळे व्यवस्थीत जतन केलेली आहे. गायींची निगा स्वच्छतेसह राखली जाते. कोणत्याही दुध वाढीच्या संप्रेरक इंजेक्शन शिवाय दुग्ध उत्पादन करतात, गायींचे वासरु पुर्णपणे संतुष्ट केले जाते. गायींची स्वच्छता राखुन दुध काढले जाते.
विविध सन्मान प्राप्त
कृषी क्षेत्रातील त्यांच्या कार्याची महाराष्ट्र शासनाने देखील दखल घेतली त्यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने (2012) तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आला होता. कृषी विभाग नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांचे कृषी विज्ञान केंद्र, नाशिक जिल्हा परिषद, रोटरी क्लब ऑफ नाशिक या संस्थाकडून देखील गौरविण्यात आले आहे. तसेच मा. पद्मश्री उज्जलजी निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला आहे.
व्यवसायाच्या माध्यमातून नाविन्यपुर्णता आणि कतृत्वाला मोठा वाव मिळत असतांना नोकरीच्या चौकटीत अडकण्याचे नाकारणार्या खैरनार बंधुंची इच्छा शक्ती इतर तरुणांसाठीही नक्कीच प्रेरक आहे.
इंडिजीनस फार्म दृष्टीक्षेपात
* तणावमुक्त व आंनदी गायी हॅप्पी काऊ हॅप्पी मिल्क संकल्पनेवर आधारीत 9.5 एकरात गोसंवर्धन.
* पांरपारिक व देशी या संकल्पनेतून इंडिजीनस नावाने ब्रॅन्ड .
* मुक्त संचार पध्दत व बासरीच्या सुमधुर संगितात संगोपन.
* 3 महीन्यांपर्यंत, 10 महिने पर्यंत, 1.5 वर्षापर्यंत वासरांची स्वतंत्र व्यवस्था.
* दुभत्या गायी, भाकड गायी व गाभण गायी, यांची स्वंतत्र व्यवस्था.
* सध्या 40 गायी, 9 कालवडी, 1 नंदी, 5 वासरे व 15 वासर्या.
व्यवस्थापन
* प्रत्येक गायीचे नामकरण व इनाफ टॅगिंग.
* गायींचे दुध उत्पादन इनाफ वर नोंदणी.
* मिल्क पार्लर.
* दरवर्षी नियमित लसीकरण.
* स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,पाण्याच्या टाक्यांना चुन्याचा वापर.
* खनिज द्रव्यांची पुर्ततेकरीता चाटणवीट व शेंदा नमकचा वापर.
* सेंद्रीय पध्दतीने उगवलेले नेपीयरचे गवत, तीन प्रकारचा चारा, लसुनघास ज्वारी, ऊस व शेवगा पानाचा वापर केला जातो.
उत्पादने
उत्तम गुणसुत्र असलेले गोर्हे प्रमुख उत्पादन आहे. गिर जातीचे उत्तम गोर्हे तयार करुन सवंर्धनाकरीता उपलब्ध करुन दिले जातात. गोपालक, शेतकरी व गोशाळा यांच्याकडे उत्तम गीर गोवंशाची पैदास होणे करीता त्यांना जातीवंत वासरे संवर्धनाकरीता उपलब्ध करुन देण्यात येतात. पांरपारिक बिलोना पध्दतीने तुप निर्मिती, संपुर्ण दुधाचे दही लावुन त्यातुन लोणी काढुन तुप निर्मिती केली जाते.
वार्षिक उलाढाल
इंडिजिनस फार्ममधून सध्या प्रतीवर्ष 40 लाखांची उलाढाल होत आहे. यातून 34 लाख रुपये मनुष्यबळ, चारा, पशुखाद्य, औषध उपचार व इतर बाबीवर खर्च होतात. खर्च वजा जाता प्रती महिना 50 हजार रुपये उत्पन्न मिळत असून दरवर्षी 15 जातीवंत वासर्या तयार होत आहे. त्याच बरोबर इडिजिनस फार्ममध्ये परिसरातील 8 लोकांना रोजगारांची सुविधा उपलब्ध झाली आहे.
दरवर्षी 15 जातीवंत वासर्या शेतकर्यांना 20 हजार ते 50 हजार दराने पुरवठा केला जातो, तर स्थानिक ग्राहकांना घरपोच 90 ली लिटर्स या दराने दररोज 150 ली दुध बाटलीबंद करून काचेच्या बाटलीत 200 ग्राहकांना पुरविले जाते. देशी पद्धतीने बनविलेले गावराण तूप 2700 रु. किलोप्रमाणे वर्षाला जवळपास 200 किलो तूप विक्री होते. याशिवाय 50 किलो वजनाची गोखुरखत बॅग 200 रु. दराने विक्री होते. वर्षात 1000 बॅग शेतकर्यांना पुरविल्या जातात. या सर्वांच्या माध्यमातून प्रतीवर्ष 40 लाख रुपये उत्पन्न मिळते. यातून 34 लाख रुपये खर्च वजा जाता 6 लाख रु. उत्पन्न इडिजिनस फार्ममधून मिळते.
राहुल मनोहर खैरनार, इडिजिनस फार्म, नाशिक. मो. 9960911191