मुंबई : सध्या राज्यात थंडीची लाट पसरलेली असताना हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. यातील काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत आलेल्या शेतकर्यांसमोर पुन्हा एकदा पावसाचे संकट उभे राहिले आहे.
यापूर्वी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 8 व 9 जानेवारीला अवकाळी पाऊस पडला. विशेषतः अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतरही भागातील शेतकर्यांना या पावसाचा फटका बसला. या नुकसानीच्या झळा ताज्या असतानाच पुन्हा हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार 21 , 22 आणि 23 जानेवारीला पाऊस होणार आहे. या पावसाचा फटका साधारणतः कोकण आणि मध्य महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे.
उद्यापासून पावसाची शक्यता
उद्या 21 जानेवारीला तुरळक ठिकाणी पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 22 आणि 23 जानेवारीला कमी अधिक प्रमाणात पाऊस होऊ शकतो. या पावसामुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा गारपीटची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. साधारणतः दोन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहणार आहे. 22 जानेवारीला राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 23 जानेवारीला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत पाऊस पडू शकतो. दरम्यान, हवामान खात्याच्या या अंदाजानुसार, शेतकर्यांची पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.