मुंबई : जुलै महिन्याच्या पूर्वार्धात राज्यभरात सर्वदूर झालेल्या दमदार, संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातली सर्व प्रमुख धरणांसह, छोट्या-मध्यम प्रकल्पातही मुबलक पाणीसाठा झाला आहे. राज्यातील 3,267 धरणांमधील एकूण पाणीसाठा जुलैमध्ये सुमारे 35 टक्के वाढला आहे. गेल्यावर्षीच्या आतापर्यंतच्या केवळ 30 टक्क्यांच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणात तब्बल 65 टक्के पाणी साठले आहे.
जायकवाडी, गिरणा, कोयना या मोठ्या धरणातील पाणीपातळीतही चांगली वाढ झाली आहे. उजनी धरण प्लसमध्ये येऊन पातळी 50 टक्केपर्यंत वाढत आहे. गिरणा धरण 95 तर जायकवाडी 75 टक्के पातळीपर्यंत पोहोचत आहे. दोन्ही धरणातून लवकरच मोठा विसर्ग सुरू होईल. ही दोन्ही धरणे सलग चौथ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरणार आहेत. 105.25 टीएमसी पाणी साठवणक्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा आता तब्बल 60 टीएमसी पातळीपर्यंत पोहोचला आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇🏻
जनावरांमध्ये “लम्पी स्कीन व्हायरस”ची साथ; पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकरी अस्वस्थ
आशिया खंडातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणातून लवकरच विसर्ग
मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणांतील जलसाठा 70 टक्क्यांवर पोचला आहे. त्यात महाराष्ट्रातील महत्वाच्या धरणांपैकी जायकवाडी हे एक महत्वाचे धरण आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी त्याची ओळख आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेडसह नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना जायकवाडी धरणाचा लाभ मिळतो. नाशिक जिल्ह्यातून विसर्ग केल्या जाणाऱ्या पाण्याची आवक जायकवाडी धरणात सुरूच असल्याने गेल्या आठवडाभरात पाणीसाठा दुप्पट झाला असून धरणातून लवकरच पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरण मंगळवारी, 19 जुलै रोजी सकाळीच 76 टक्के भरले आहे. धरण 79 टक्के भरल्यावर पाणी सोडले जाईल, असे नाथसागर जलाशयाच्या अभियंत्यांनी म्हटले आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी यांना तातडीचे पत्र लिहले आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापूर धरणाचा पाणीसाठाही 75 टक्के झाला असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
हतनूर धरणाचे 41 दरवाजे खुले
जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे सर्वच्या सर्व 41 दारवाजे पूर्ण उंचीने उघडलेले असून नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 52,796 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇🏻
भंडारदरा धरण 85 टक्के भरले
नगर जिल्ह्यातली भंडारदरा धरण सुमारे 85 टक्के भरले आहे. पाऊस सुरूच राहिल्यास पाणी पातळीचे नियमण करण्यासाठी सांडव्याद्वारे प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. नगर जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या लोकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
खडकवासला धरण साखळीत 65 टक्के साठा
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणीसाठा 18.89 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 64.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणक्षेत्रात पाऊस ओसरल्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग थांबविण्यात आला आहे. टेमघर धरणात 51.88 टक्के, वरसगाव 60.55, पानशेत 67.68 टक्के तर खडकवासला धरण हे 100 टक्के भरले आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा 67.80 टक्के इतका झाला आहे.
मुंबईतील सात धरणांत 10 महिन्यांचा पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणात सध्या 84.41 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला दररोज होणारा पाणीपुरवठा पाहता हा पाणीसाठा पुढील 317 दिवस म्हणजेच दहा महिने पुरेल इतका झाला आहे. म्हणजेच 30 मे 2023 पर्यंत मुंबई शहराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पुरेल इतका आहे. सध्या मोडक सागर, तानसा व तुळशी हे तिन्ही धरण भरून वाहू लागले आहेत. आता तर मध्य वैतरणा धरणात एकूण क्षमतेच्या 90.61 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. सात धरणातील एकूण पाणीक्षमतेच्या तुलनेत एकट्या भातसा धरणात 50 टक्के पाणीसाठा जमा होतो. आजमितीस या भातसा धरणात 81.20 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यापाठोपाठ अप्पर वैतरणा धरणात 72.34 टक्के पाणीसाठा जमा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 53 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 174.44 दलघमी पाणीसाठा असून धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यात पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ; भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे व राशिवडे हे प्रमुख बंधारे आहेत. कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाणी पातळी 33 फूट 5 इंच इतकी खाली आली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे.
चंद्रपुरात धरणातून विसर्ग सुरूच
चंद्रपूर जिल्ह्यात इराई धरण, निम्न वर्धा प्रकल्प, गोसीखुर्द या तीनही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे, पाण्याची पातळी अचानक वाढू शकते, नागरिकांनी आश्रयस्थानीच राहावे. रात्रीच्या वेळी सतर्कता बाळगावी. नदीपात्राजवळ जाऊ नये. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबधीत बातम्या वाचण्यसाठी येथे क्लिक करा
राज्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार कायम, “रेड ॲलर्ट” जारी; देशातील 25 राज्यात धुवां”धार”
राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्या दोन आठवड्यात दहा टक्क्यांनी वाढ
राज्यभरात पावसाचे धुमशान; उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भासाठीही “ऑरेंज ॲलर्ट” जारी
Comments 2