यवतमाळ (प्रतिनिधी) – अवघ्या दोन हजार रुपयांच्या बक्षीस रक्कमेवर सुरु केलेल्या पोल्ट्री व्यवसायाने कोट्यावधीच्या उलाढालीचा पल्ला गाठला, असे म्हटले तर कदाचीत कोणाचाच विश्वास बसणार नाही. परंतू तरोडा (जि. यवतमाळ) येथील देंवेंद्र भोयर या उच्चशिक्षीत युवकाने दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर हे शक्य करुन दाखविले आहे. हायटेक शेड, फिडिंगसाठी सेन्सर, दीड महिन्यात दोन लाख पक्ष्यांची विक्री त्यांच्या या व्यवसायातून होते. एका पक्षासाठी फिडिंग, लसीकरण, मजुरी, वीजबील किती खर्च येतो, याचाही हिशोब त्यांनी सांगितलाय.
जळगावात मंगळवारी 19 ऑक्टोबरला अॅग्रोवर्ल्ड आयोजीत एकदिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..
देवेंद्र भोयर यांचे पार्डी (ता.कळंब, जि. यवतमाळ) हे मुळ गाव. त्यांचे वडील एकनाथराव हे जिल्हा परिषदेत अधीक्षक पदावर नोकरीवर. मात्र मुलींचे लग्न व कौटूंबीक गरजा भागवितांना त्यांना गाठीशी पैसा जोडता आले नाही. परिणामी एकनाथरावांच्या निधनानंतर या कुटूंबाला आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागला. याच काळात देवेंद्र यांचे शिक्षण सुरु होते. बी.कॉम, बी.पी.एड., एम.ए असे शिक्षण त्यांनी घेतले. उच्चशिक्षणानंतरही नोकरी नसल्याने देवेंद्र हे निराशेत होते.
क्रिकेटमधून घडला बदल
देवेंद्र भोयर यांना महाविद्यालयीन जीवनापासून क्रिकेटचा लळा होता. विजयंता क्रिकेट क्लबमध्ये ते खेळत असत. याच क्रिकेट क्लबच्यावतीने खेळविण्यात आलेल्या एका सामन्यात त्यांनी चांगली फलंदाजी केली. त्यासाठी त्यांना प्रेक्षक व आयोजकांकडून कोणी 100 तर कोणी 200 रुपये याप्रमाणे बक्षीस दिले. तब्बल 2 हजार रुपये यातून गोळा झाले. रोजगाराच्या शोधात असलेल्या देवेंद्र यांनी त्या रक्कमेचा व्यवसाय उभारणीकामी वापर करण्याचा निश्चय केला. यवतमाळ येथील सिव्हील लाइन परिसरातील घराच्या मागेच त्यांनी 1996-97 साली छोटी पोल्ट्री सुरु केली. प्रायोगीक तत्वावर सुरु केलेल्या या पोल्ट्रीत अवघे 100 पक्षी होते. जबलपूर येथून हे पक्षी मागविण्यात आले. रेल्वेने हे पक्षी धामणगाव (जि.अमरावती) व तेथून मित्राच्या कारने हे पक्षी यवतमाळाला आणले. यवतमाळातील एका पोल्ट्री व्यवसायीकाकडून त्यांनी या व्यवसायाचे मार्गदर्शन घेतले होते. त्याच्याच मार्गदर्शनात त्यांनी हा व्यवसाय उभारला. सुरवातीला 100 पक्ष्यांच्या संगोपनातून त्यांना 300 रुपयांचे उत्पन्न झाले.
बँकेची नोकरी नाकारली पण त्याच बँकेत व्यवसायासाठी कर्ज मागितले
पोल्ट्री व्यवसाय सुरु करणार्या देवेंद्र यांना यवतमाळ अर्बन को-ऑप बँकेत नोकरीची ऑफर या काळात आली. परंतू नोकरीऐवजी मला व्यवसाय वाढीसाठी एक लाख रुपयांचे कर्ज द्या, असा आग्रह त्यांनी बँक व्यवस्थापनाकडे धरला. बँक व्यवस्थापनाने देवेंद्र यांचा आत्मविश्वास पाहून त्यांना एक लाख रुपयांच्या कर्जाची उपलब्धता करुन दिली.
दूधाचा रतीब घालणार्यांची मिळाली साथ
देवेंद्र यांच्याकडे पोल्ट्री व्यवसाय वाढीसाठी जागा नव्हती. त्यांच्याकडे दूधाचा रतीब घालण्यासाठी येणार्या शेतकर्याकडे त्यांनी व्यवसाय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्याने त्याला होकार देताच देवेंद्र यांनी आपला व्यवसाय स्थलांतरीत करुन वाढविला. त्याकरीता बँकेकडून मिळालेल्या कर्ज रक्कमेचा विनीयोग करण्यात आला. 1998 मध्ये हा बदल त्यांनी केला होता. 1700 पक्ष्यांची तेथून विक्री होत होती. त्यानंतर टप्प्याटप्याने त्यांनी पोल्ट्री व्यवसाय वाढविला. या व्यवसायातून मिळालेल्या रक्कमेतून त्यांनी तरोडा (ता.बाभूळगाव, जि. यवतमाळ) येथे चार एकर शेत खरेदी केले. स्वमालकीच्या या शेतात त्यांनी 2000 साली आपला व्यवसाय स्थलांतरीत केला. तरोडा येथे 25 हजार पक्ष्यांचे संगोपन होते. व्यवसायातून पैसा जुळत गेल्याने उत्साह वाढलेल्या देवेंद्र यांनी व्यवसाय वृध्दीचा निर्णय घेतला. त्याकरीता त्यांनी माधनी (जि. यवतमाळ) तसेच सुलतानपूर (ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) येथे शेती खरेदी केली. आज त्यांच्याकडील जमीनधारणा 50 एकरावर पोचली आहे.
हायटेक पोल्ट्री शेड; फिडिंगसाठी सेन्सर, दीड महिन्यात दोन लाख पक्ष्यांची विक्री
देवेंद्र भोयर हे आजच्या घडीला अवघ्या दीड महिन्यात दोन लाख पक्ष्यांची विक्री करतात. यावरुनच त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती लक्षात येते. सुलतानपूर, तरोडा, एरड या गावांमध्ये त्यांच्या व्यवसायाचा विस्तार आहे. पक्ष्यांकरीता त्यांनी हायटेक शेडची उभारणी केली आहे. पक्ष्यांना फिडींग करीता स्वयंचलीत यंत्रणा त्यांनी बसविली आहे. फिडींगकरीता सेन्सर यंत्रणा असून पॉट (भांडे) मध्ये असलेले पक्षीखाद्य संपताच सेन्सरला कळते आणि भांडी पुन्हा खाद्याने आपोआप भरतात. पक्ष्यांना पाणी पिण्याकरीता वरच्या बाजूला निप्पल सिस्टम बसविलेली आहे. निप्पलला चोच मारल्यानंतर त्यातून येणारे पाणी पक्षी पितात.
देवेंद्र यांच्याकडील प्रत्येक शेड हे वातावरण पूरक पध्दतीचे आहे. शेडच्या दोन्ही बाजूस पडदे लावण्यात आले आहेत. त्यासोबतच आतल्या बाजूस तापमान मोजणी यंत्र व सेन्सर बसविले आहे. तापमानात घट किंवा वाढ झाल्यास सेन्सर स्वयंचलीत यंत्रणेला संदेश देतो आणि तापमान नियंत्रीत केले जाते. अशाप्रकारच्या हायटेक पोल्ट्रीफार्मची उभारणी करण्यात आली आहे. 400 फुट लांब आणि 28 फुट रुंद अशा आकाराच्या भव्य शेडची त्यांनी उभारणी केली आहे. या शेडची क्षमता 11 हजार 200 अशी पक्षी क्षमता आहे. 200 रुपये प्रती चौरस फुट याप्रमाणे या शेडच्या उभारणीवर त्यांना खर्च आला. त्यामध्ये स्वयंचलीत यंत्रणेवरील खर्चाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगीतले. भारनियमनाच्या काळात पक्ष्यांकरीता जनरेटरची व्यवस्था आहे.
पोल्ट्री व्यवसायात कोट्यावधीची उलाढाल
45 दिवसानंतर त्या पक्ष्यांची 134 रुपयांना विक्री केली जाते. उत्पन्न व खर्चाच्या या ताळेबंदानुसार एका पक्ष्यामागे 13 रुपयांचा निव्वळ नफा होतो. एका महिन्यात 2 लाखावर पक्ष्यांची विक्री होते. त्यावरुनच या व्यवसायातील एकूणच उलाढालीचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या या व्यवसायाने आज कोट्यावधीच्या उड्डाणाचा पल्ला गाठला आहे. आता नव्याने त्यांनी स्वतःच अंड्यापासून पिल्ले तयार करण्याकामी हॅचरी देखील उभारली आहे. आठवड्याला 80 हजार पक्षी अशी याची क्षमता आहे.
बाजारपेठ शोधली
आंधप्रदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील कोंबडी बाजाराचा आढावा घेऊन त्याआधारे विक्री दर ते ठरवितात. यवतमाळ शहरात हॉटेल व्यवसायीकांना कोंबडी विक्री करणार्या व्यापार्यांची बाजारपेठ आहे. त्याच बाजारात सुरवातीला त्यांनी आपले ग्राहक शोधले.
पक्ष्यांचे व्यवस्थापन
हैदराबाद येथून एक दिवसाच्या पक्ष्यांची खरेदी ते करतात. कमीत कमी 35 तर जास्तीत जास्त 45 दिवसानंतर त्या पक्ष्यांची विक्री होते. या कालावधीत एका पक्ष्याला साडेतीन किलो (91 रुपये) खाद्याची गरज भासते. मजूरी, वीजबील आणि व्हॅक्सीनेशन यावर एका पक्ष्यामागे सरासरी पाच रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. त्यासोबतच 25 रुपये प्रती नग पक्ष्याची खरेदी याप्रमाणे 121 रुपयांचा खर्च एका पक्ष्यामागे होतो. 64 रुपये किलो दराने पक्ष्याची विक्री होते. एका पक्ष्याचे वजन सरासरी 2 किलो 100 ग्रॅमपर्यंत राहते.
संपर्क – देवेंद्र भोयर तरोडा (जि. यवतमाळ ) 9422165198