मुंबई : केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्यानंतर मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आहे. आधी कारवार व त्यानंतर गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला. वेळेआधीच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, हा भारतीय हवामान खात्याचा (IMD) अंदाज देखील चुकला आहे.
कुठे कोरडे तर कुठे पूर्वमोसमीचे यलो अलर्ट..
उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पूर्वमोसामी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
या तारखेला मान्सून महाराष्ट्रात..
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस हीच स्थिती कमी अधिक प्रमाणात कायम राहणार आहे. मान्सूनच्या आगमनासाठी दक्षिण कोकणात पूर्व मोसमी पावसाची आवश्यकता असते. यामुळे महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार होतं. पुढील दोन ते तीन दिवस दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानाची ही स्थिती मान्सूनच्या आगमानासाठी फायदेशीर ठरणार आहे. आता 11 ते 13 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी नवीन माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली असली तरी पहिल्या टप्प्यात पावसाचा जोर हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल.
बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय…
बंगालच्या उपसागरातील मान्सूनची दुसरी शाखा अधिक सक्रिय असून मुसळधार पावासासह ती वेगाने पुढे सरकत आहे. मिझोराम, नागालँड, मणिपूर येथील आणखी काही भागांमध्ये मान्सून पोहोचला आहे. पूर्वोत्तर राज्यांवर या ढगांची झालेली दाटीदेखील बघावयास मिळते. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मात्र पश्चिम किनारपट्टीवर मान्सून अधिक सक्रिय होईल, असे गुरुवारी दिलेल्या पावसाच्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजावरून स्पष्ट होत आहे.