बाराबंकीच्या शेतकर्यांनी मर्यादित साधनांमध्ये मिळवला नफा
भारतात सध्या मशरुम उद्योगाला मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाल्या आहेत. मशरुमला काही भागात आळिंबी देखील म्हटले जाते. मशरुमची योग्य पद्धतीने लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळवता येते, हे उत्तरप्रदेशातील बाराबंकी, मनरखापूर गावातील शेतकर्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. आपल्या पारंपरिक शेतीसोबतच मशरूमची लागवड करून अनेक शेतकरी दुप्पट नफा कमवत आहेत. या गावातील जवळपास सर्वच शेतकर्यांनी उपलब्ध मर्यादित साधनांच्या सहाय्याने मशरुमच्या व्यवसायात प्रगती साधली आहे.
सद्यःस्थितीत मशरुमला बाजारपेठेत कमालीची मागणी आहे. मागणीनुसार मशरुमचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी आता मशरुमच्या लागवडीकडे वळत आहेत.
कमी जागेत जास्तीत जास्त फायदा देणारी ही शेती अनेक शेतकर्यांच्या उत्पन्नाचे साधन ठरत आहे. सुरुवातीला मशरूमची लागवड करणार्या शेतकर्यांच्या आर्थिक स्थितीत झालेली सुधारणा पाहता मोठ्या संख्येने शेतकर्यांनी त्याचा अवलंब केला. उत्तरप्रदेशातही मशरुमची शेती करणार्यांची संख्या वाढत आहे. बाराबंकी जिल्ह्यापासून सुमारे 30 किलोमीटवर असलेल्या दूर सिद्दौर ब्लॉकमधील मनरखापूर गावात राहणारे विनय वर्मा हे तरुण शेतकरी वयाच्या गेल्या 15 वर्षांपासून मशरूमची लागवड करीत आहेत. विनय यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जवळच्या गावात 1993 साली मशरूमची लागवड सुरू झाली. हळूहळू जेव्हा त्यात फायदे दिसू लागले तेव्हा आमच्या गावातही त्याची सुरुवात झाली. आज गावातील सर्व लोक गहू, भातासोबत मशरूमची लागवड करतात. यंदा आपण 75 क्विंटल स्ट्रॉमध्ये मशरूमची लागवड केली आहे. ज्यातून 40 क्विंटल मशरूम तयार होतील व त्याची बाजारात लाखो रुपये किंमत असेल, असा विश्वास विनय शर्मा यांना आहे.
छोट्या दुकानातूनही विक्री
उत्तरप्रदेशातील मानराखा गावात सुमारे 200 घरे आहेत. यापैकी 100 कुटुंबे पारंपारिक शेती करताना गव्हासह इतर धान्यवर्गीय पिकांचे उत्पादन घेतात. हे शेतकरी आता इतरांचे पाहून मशरूमची लागवड करीत आहेत. बाजारपेठेत मशरुमला जास्त मागणी असल्याने व अपेक्षित उत्पादन होत नसल्याने मशरुमची चांगल्या दराने विक्री होते. शहरी आणि ग्रामीण भागातील बहुतांश लोकांना मशरूम अधिक आवडू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये भाजीच्या छोट्या दुकानातही मशरूमची विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते.
कंपनीच केली स्थापन
मनरखा गावातील शिवा द्विवेधी या 23 वर्षीय शेतकर्याने सांगितले, की त्यांच्या गावातील लोकांच्या प्रेरणेने त्यांनी मशरूमची लागवड सुरू केली. आज त्यांना यातून चांगला फायदा होत आहे. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणार्या भातशेतीसाठी पाच हजारांहून अधिक खर्च येतो आणि नफाही तेवढाच असतो. मात्र, मशरूमचे उत्पादन घेताना एकूण दीड लाख रुपये खर्च आला व सहा महिन्यांत पाच लाख रुपयांपर्यंत कमाई झाली. यावेळी 200 क्विंटलची लागवड केली असून सुमारे अडीच लाख रुपये खर्च झाले आहेत. सध्याच्या बाजारातील दरानुसार, आपल्याला सुमारे साडेसात लाख रुपयांचा नफा मिळेल असा द्विवेधी यांना विश्वास आहे. त्यांच्या गावातील शेतकर्यांनी उत्पादीत केलेला मशरूम गोरखपूर, फैजाबाद, बस्ती, देवरिया, कानपूर, सीतापूर, लखीमपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये विकला जातो. मशरुम विक्रीच्या या व्यवहारात थेट शेतकर्यांनाच त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी कंपनीचीही स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेतकरी थेट लोकांना मशरूम विकून नफा कमावतात. बाजारात मशरूमचे दर वाढतच असल्याने त्याचा शेतकर्यांनाच लाभ होत असल्याचे द्विवेधी सांगतात.
मशरुमचे औषधी उपयोग
मधुमेही व्यक्तींकरिता मशरुम उपयुक्त आहे. ज्यात जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. अशा प्रकारच्या अन्नाची गरज मधुमेही व्यक्तींना असते. मशरूममध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक आहेत. याशिवाय मूत्रपिंड (किडनी) रोग्यांचा जीवनकाळ वाढविण्यासही मशरुम उपयुक्त ठरतात. त्यात कमी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ असल्याने लठ्ठ व्यक्तींसाठी ते फायदेशीर ठरते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील मशरुमचा उपयोग होतो. मशरूमचे नियमित सेवन केल्यास स्कर्व्ही रोगापासून बचाव होऊ शकतो. मशरूममध्ये तंतुमय पदार्थ व फॉलिक अॅसिड असल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम मशरुममुळे चांगल्या प्रकारे होते.
बटन मशरुमची लागवड
मशरूममध्ये बटण मशरुमला चांगली मागणी आहे. त्याची लागवड करून शेतकरी केवळ चार महिन्यांत दुप्पट खर्चाचा लाभ सहज घेऊ शकतात. भारतात बटन मशरूम पिकवण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वोत्तम आहे. या सहा महिन्यांत दोन पिके घेतली जातात. मनारखा गावातील सोनू कुमार या तरुण शेतकर्याने स्वतःच्या अनुभवानुसार सांगितले, ते सुमारे दहा वर्षांपासून शेती करीत आहते. ऑगस्ट ते फेब्रुवारी या कालावधीत मशरुमची लागवड केल्यानंतर त्याच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळाले. मशरूम पिकवण्यासाठी बाहेरून काहीही लागत नाही. आम्ही या व्यवसायासाठी आपली देशी जुगाड पद्धतच वापरली आहे. ज्यामध्ये आमचा अनावश्यक खर्चही वाचत असल्याचे सोनू कुमार यांनी सांगितले.
मर्यादित साधनांमध्ये मशरूमची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमावत आहेत.
कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य
सहारनपूर जिल्ह्यातील रामपूर मनिहार ब्लॉकमधील मदानुकी गावातही बारापेक्षा अधिक शेतकर्यांनी मशरूमची लागवड सुरू केली आहे. या गावातील मदनुकी गावातील शेतकरी सत्यवीर सिंग यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने 2009 मध्ये मशरूमची लागवड सुरू केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2009 मध्ये त्यांनी छोटी झोपडी बांधून मशरूमची लागवड सुरू केली होती. आज ते वर्षाला सुमारे 6 हजार पिशव्या बटण मशरूम आणि 8 हजार पिशव्या ऑयस्टर मशरूमची विक्री करतात.
अशी घ्यावी काळजी
मशरूमसाठी योग्य हवामान असणे खूप महत्वाचे आहे. हवामान खराब असल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. मशरूमसाठी 18 ते 28 अंशांचे तापमान योग्य ठरते.