नामदेव कहांदळ, संगमनेर
ग्रामविकास, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठस्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्याच्या सायंकाळी जून 2006 मध्ये लोकसहभागातून दंडकारण्य चळवळ उभी केली. वयाच्या पंच्याहत्तरीत असताना देखील भाऊसाहेबांनी सक्रीयपणे अविश्रांतपणे मेहनत घेऊन ती वाढवली, फुलवली. याच चळवळीच्या माध्यमातून पर्यावरण वाचवा.. जीवन वाचवा.. हे अभियान फलास आले व कधी काळी उजाड, ओसाड असलेल्या संगमनेर तालुक्यातील डोंगरं हिरवीगार झाली. त्यामुळेच संगमनेर तालुक्याची ओळख आता सर्वाधिक ऑक्सिजन देणारा तालुका अर्थात महाराष्ट्रातील अॅमेझॉन अशी बनली.
निर्सगात माती, पाणी आणि झाड यांची घट्ट सोयरिक आहे. मात्र आज सर्वत्र मानवाने पर्यावरणाचा र्हास करुन सिमेंटची अरण्ये सर्वत्र उभी केली आहे. पर्यावरणाचा नाश मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे वारंवारचे दुष्काळ, दुषित हवामान, वाढलेली उष्णता यामुळे सजीव सृष्टी अस्वस्थ होत आहे. यावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांनी दुरदृष्टीतून संगमनेर तालुक्यात पर्यावरण वाचविण्यासाठी दंडकारण्य अभियानाच्या चळवळीचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे व सौ. दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात दरवर्षी हे अभियान पर्यावरणाचा महोत्सव म्हणून साजरा होत आहे.
वनीकरणाशिवाय पर्याय नाही
कोरोना साथरोगाने लोकांच्या जगण्याची परिभाषा बदलली आहे. एक वेळ अशी आली होती, की वैद्यकीय उपचारासाठी लागणार्या ऑक्सीजनची टंचाई निर्माण झाल्यामुळे बहुतांश रुग्णांना लाखमोलाचे प्राण गमावण्याची नामुष्की आली. ग्लोबल वार्मिंगचे परिणाम आज सारे जग भोगत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळ, गारपीट, दुष्काळ, पाणी टंचाई, हवेतील प्रदूषण यामुळे मनुष्यप्राणी हैराण आहे. विकासाच्या नावाखाली येणारे महाकाय प्रकल्प आणि त्यातील लोकांचे नव्हे तर वन्यजीवसृष्टी, जंगल, जमीन आणि पाणी यांचेही मोठे नुकसान होत आहे. भूगर्भातील पाण्याचा साठा खोलवर जात आहे. काही राक्षसी पिकांमुळे शेतकर्यांच्या क्षारपड जमिनी होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकूण या सर्वांमुळे भविष्यात पर्यावरणाचे प्रश्न आणखीन कठीण होणार आहेत असे दिसते. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा, डॉ. बाबा आमटे, मेधा पाटकर, कुसूमताई कर्णिक, विनायकराव पाटील, मोहन धारिया, नानाभाऊ एंबडवार, आचार्य विनोबा भावे, जगदीश गोडबोले अशा असंख्य माणसांनी काम केलेले आहे. पश्चिम घाट बचाव आंदोलन यासारख्या अनेक चळवळी झाल्या आहेत. अवर्षणप्रवण भागात म्हणजेच दुष्काळी भागाचा कायापालट करायचा असेल तर वनीकरणाशिवाय पर्याय नाही. प्रथम डाव्या विचारांच्या मुशीत घडलेले आणि नंतरच्या काळात ग्रामविकास, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवणार्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी ही चळवळ उभी केली.
86 लाख झाडांची लागवड
दंडकारण्य अभियानांतर्गत लोकसहभागातून आजतागायत सुमारे 86 लाख झाडे लावण्यात आली आहेत. यात चिंच, जांभूळ, काशीद, खैर, सुरु, शिसम, बांबू, रेन ट्री, लिंब, भेंडी, आवळा, बाभूळ, सीताफळ, ऑस्ट्रेलियन बाभूळ, वड, पिंपळ, करवंद, निलगिरी, पळस, बेल, उंबर गिरीपुष्प आदींचा समावेश आहे. संगमनेरमधून सुरु झालेली वृक्ष संवर्धन संस्कृती राज्याला निश्चितच दिशादर्शक ठरणारी आहे, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात केलेले विनम्र आवाहन रास्तच आहे. शांत, संयमी, व्यासंगी अभ्यासक असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी निसर्ग संरक्षणासाठी भाऊसाहेबांचा वैचारिक वारसा समर्थपणे पुढे नेताना ते त्यांच्या संस्कृतीतून व्यक्त होत आहे. दंडकारण्य अभियानाच्या यशस्वीतेसाठी एक अनोखे दृश्य प्रवरा नदीच्या खोर्यात पहायला मिळत आहे. बहुचर्चित रखडलेला निळवंडे धरणाचा प्रकल्पही मार्गी लागण्याच्या अंतिम टप्यात आहे. लोक सहभागातून लक्षावधी झाडे लावून ते वास्तवात आणणारे, आधुनिक दंडकारण्याची निर्मिती करणारे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हे वनऋषी ठरले आहेत.
झाडे लावणारा माणूस या पुस्तकातून प्रेरणा
दिवंगत स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 2006 साली दंडकारण्य चळचळीला जन्म दिला. आल्प्स पर्वतात एल झिअर्ड बुफे या अवलियाने ओसाड टेकड्यांवर अहोरात्र तब्बल 35 वर्षे परिश्रम घेऊन व जागता पहारा दिला. परिणाम स्वरुप या ओसाड आल्प्स पर्वतातील अनेक ओसाड टेकड्या हिरव्याकंच वनराईने फुलल्या. त्यांच्या कामाची दखल जागतिक स्तरावरही घेण्यात आली. फ्रेंच लेखक जाँ जिओनो यांनी त्यावर झाड लावणारा माणूस हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक भाऊसाहेब थोरातांच्या वाचनात आल्यानंतर त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी या चळवळीचा प्रारंभ केला. सुरवातीपासूनच लोकसहभागातूनच ही चळवळ उभी करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. जेणेकरुन चळवळीला व्यापक स्वरुप मिळेल तसेच लोकांमध्ये ही आपली चळवळ आहे, ही भावना रुजून पर्यावरण विषयक सकारात्मक संदेश त्यांच्यापर्यंत जाईल, हा त्यांचा दूरदृष्टीकोन होता. 2006 साली लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे आज 16 वर्षांनी वटवृक्षात रुपांतर होऊन त्याच्या अनेक पारंब्या देखील रूजून त्यापासूनही पुन्हा अनेक वटवृक्ष उभी राहत आहेत.
ग्रीन आर्मीची स्थापना
दंडकारण्य अभियानातून निर्माण झालेल्या हरित चळवळीला लोकसहभागाची जोड मिळाली आहे. यातून वनीकरणाच्या कामासाठी भाऊसाहेबांनी लोकांना संघटित करून एका अर्थाने ग्रीन आर्मीची स्थापना केली होती. ज्यात हजारो लोक, महिला, तरुण, विद्यार्थ्यांना त्यांनी संघटीत केले. 2006 च्या पावसाळ्यात संगमनेर व अकोले भागातील 132 गावातील माळरानावर एक कोटी झाडांची बियाणे लावण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. प्रकृती बरी नसतानाही या सामाजिक उद्दिष्टांसाठी त्यांनी जनजागृती सुरु केली. त्यानंतर पुढच्यावर्षी या परिसरात चार कोटी बियाणे माळरानावर टाकले जाईल अशी व्यवस्था केली. यातून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी नवी लोक चळवळ उभी राहून ती यशस्वी झाली आहे. या चळवळीचा लोकजागर सुरु ठेवण्यासाठी भाऊसाहेबांनी गाणी, भाषणे, पोवाडे अशा विविध मार्गाने त्यांनी हरित पट्टा निर्माण केला. 2006 ते 2021 या दीड दशकाच्या काळात लक्षावधी संख्येने या भागातील माळरानावर बी बियाणे टाकून रोपे लावली. त्यातील काही जगली. पुढे झाडे लावण्याचा वसा आणि वारसा भाऊसाहेब थोरात यांचे चिरंजीव विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे सर्व सहकारी लोकांच्या सहभागातून आज पुढे नेत आहेत.
माळरानावर समृद्ध हिरवाई
अमृत उद्योग समूह आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त पुढाकाराने आतापर्यंत सुमारे 86 लाख लावलेली झाडे जगविण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे माळरानावर समृद्ध हिरवाई डोलू लागली आहे. यावर्षी वडगाव पान येथील पद्मावती डोंगरावर दंडकारण्य अभियानाची सुरुवात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेतील व्यासंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, दंडकारण्य अभियानच्या प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, संगमनेर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सुनंदाताई जोर्वेकर, जिल्हा परिषदेच्या मीरा शेटे आदींसह अभियानातील अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पर्यावरणाचा जागर
हे अभियान राबविताना यामध्ये पर्यावरणाचा जागर दरवर्षी प्रा. बाबा खरात, बाळासाहेब उंबरकर व त्यांचे सहकारी गावोगावी करतात. हे कार्यकर्ते शाळा, महाविद्यालये व गावागावांत जाऊन प्रचार करतात. नियोजनपूर्वक कोणत्या भागात कधी वृक्षलागवड करायची हे ठरविले जाते. विद्यार्थी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी, कार्यकर्ते, पर्यावरण अभ्यासक, महिला मंडळे आदी या अभियानात सहभागी होतात. झाडी तोडणारी माणसे सर्वत्र असतांना झाडे लावणारे शेकडो हात संगमनेर तालुक्यात या चळवळीतून निर्माण झाले आहेत. यातून वृक्षसंवर्धन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगावर अनेक ठिकाणी वने उभी राहत आहे. एक मुल एक झाड या उपक्रमाखाली दरवर्षी सुमारे पन्नास हजार विद्यार्थी वृक्षांचे संवर्धन करीत आहेत. शासनाला ही या चळवळीचे महत्व पटले असून राज्य सरकारने सर्वत्र वृक्षलागवडीचा मोठा उपक्रम हाती घेतला आहे. या चळवळीला महाराष्ट्र शासनाचा पर्यावरणाचा पुरस्कारही मिळाला आहे.
दंडकारण्य चळवळ संस्कृती राज्याला दिशादर्शक ः बाळासाहेब थोरात
संगमनेर व परिसरात सततचा दुष्काळ व ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 16 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानामुळे राज्यासह तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढली आहे. आगामी काळात हीच परंपरा जोपासत संपूर्ण तालुका हिरव्या वनराईचा तालुका निर्माण करण्यासाठी प्रयत्न असून लाखो वृक्षांचे रोपण व संवर्धनासाठी ही मोठी लोक चळवळ ठरल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. ना. थोरात म्हणाले, दुष्काळ व ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी, पुढील पिढ्यांना स्वच्छ ऑक्सिजन मिळावा यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीतून सोळा वर्षांपूर्वी हे अभियान सुरु केले. यामध्ये तालुक्यातील महिला, पुरुष, बालगोपाळांनी सहभाग घेतल्याने ही लोक चळवळ ठरली. संगमनेरमधून सुरू झालेली वृक्षसंवर्धन संस्कृती राज्याला दिशादर्शक ठरली. कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनचे महत्त्व कळाले. या पुढील काळात वृक्षसंवर्धन व रोपन गरजेचे असून एका व्यक्तीने दरवर्षी किमान तीन झाडांची रोपन व संवर्धन केले पाहिजे. दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षी लाखो वृक्षांचे रोपण होत असल्याने 16 वर्षापूर्वीचा तालुका व आत्ताचा तालुका यामध्ये खूप फरक झाला. तालुक्यामध्ये वृक्षसंख्या वाढली आहे. आगामी काळात संपूर्ण तालुका हिरव्या वनराईने नटण्यासाठी प्रयत्न असून त्यादृष्टीने सर्व सेवाभावी संस्था, सहकारी संस्था व तालुक्यातील नागरिक सहभाग घेत आहेत.
पर्यावरणाच्या महोत्सवाचे टप्पे
दंडकारण्य अभियान हे लोकचळवळ झाले असून सह्याद्री ते सातपुडा असा हा पर्यावरण संवर्धनाचा मंत्र जपला जात आहे. संगमनेर तालुक्यात सुरु झालेला हा उपक्रम जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील राबविला गेला आहे. शासनापेक्षा अधिक प्रभावी व बिनचूक पर्यावरणाचे काम या चळवळीतून संगमनेर तालुक्यात सुमारे दहा वर्षांपासून सुरु आहे. दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वीच याबाबतचे नियोजन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, निमंत्रक दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. अभियानाचा कालखंड ठरल्यानंतर त्या काळात नियोजनपूर्वक कार्य होते. झालेल्या कामाचे अवलोकनही अमृत उद्योग समूह व जयहिंद लोकचळवळीमार्फत केले जात आहे. सर्व प्रथम गावोगावी प्रचार, प्रसाराचा टप्पा पूर्ण केला जातो. यामध्ये पर्यावरणाबाबतची व्याख्याने, पर्यावरणाची गिते गाऊन वातावरण निर्माण केले जाते. दुसर्या टप्प्यात हजारो लोक उघड्या, बोडक्या डोंगरांवर जावून दररोज बीजारोपण करतात. हातात कुदळ, पावडे, घरची भाजी भाकरी घेऊन नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी डोंगरांवर हा पर्यावरणाचा महोत्सव साजरा करतात. तिसर्या टप्प्यात गावोगावी मोकळ्या जागेवर, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करतात. तर चौथ्या टप्प्यात चंदनापूरी घाट, माऊली घाट, कर्हे घाट यामध्ये रस्त्यांच्या दुतर्फा फुलांचे रोपण करतात. या सर्व महोत्सवाचा गोड शेवट एखाद्या पर्यावरणप्रेमी गावी आनंद मेळावा घेऊन करतात. या आनंद मेळाव्यात महिला घरोघरी सडा रांगोळी करतात. महिला, विद्यार्थी गावोगावी वृक्ष दिंडी काढतात. विविध घोषणांनी तालुका दुमदुमून जातो. पिवळी स्कार्प व पिवळी टोपी असलेले दंडकारण्याचे सैनिक सर्वत्र पर्यावरण संवर्धन व वृक्षरोपणाचे काम करतात. निसर्गाचा समतोल भरुन काढण्यासाठी दादांनी दिलेली दडंकारण्याची शिकवण प्रत्यक्षात आल्यास ही सृष्टी पुन्हा हिरवीगार होईल व त्याआधारे ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवरही मात करता येईल.