प्रोटिन व व्हिटॅमीन जास्त असल्यामुळे अंडी व चिकनला पसंती मिळत आहे. कोरोना रुग्णांनाही व जे रुग्ण नाहीत पण प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आता अनेकजण रोज आहारात किमान दोन उकडलेली अंडी खावू लागल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अंडी व चिकनच्या मागणीत 20% वाढ झाली आहे. परिणामी, पोल्ट्री व्यवसायाला झळाळी आली आहे.
अंडी, चिकन खाण्याचा आरोग्य यंत्रणांचा सल्ला..
ज्या संकटामुळे कुक्कूटपालन व्यवसाय कोलमडला त्याच करोना संसर्गामुळे या व्यवसायाला पुन्हा झळाळी आली आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच प्रोटीन व व्हिटॅमीनचा चांगला स्त्रोत असल्यामुळे लोकांनी अंडी, चिकन नियमीत खावे, असा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून दिला जात आहे. सरकारनेही याला प्रोत्साहन दिल्याने कोव्हिड उपचार केंद्र आणि सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांना रोज अंडी खायला दिली जात आहेत. याशिवाय अनेक कुटुंब रोज नियमितपणे अंडी खावू लागली आहेत. यामुळे अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. उत्पादनात घट आणि मागणीत वाढ असल्याने अंडी, चिकनचे दर वाढले आहेत. सध्या पोल्ट्री धारकांकडून पाच ते सव्वापाच रुपये या दराने अंड्यांची खरेदी सुरू आहे, तर बाजारात अंड्यांचे दर सात रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गावरान प्रति दर अंडी 12 ते 15 रु आहेत. चिकनचे दर प्रति किलो २०० ते २५० रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे गेल्या पाच-सहा महिन्यात झालेले नुकसान भरून निघण्यास काही प्रमाणात मदत होत आहे. उत्पादनात घट असल्याने ग्राहकांना मात्र यासाठी आणखी काही काळ ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.
अंडी, चिकनची भविष्यातही मागणी वाढतीच राहणार..
एकट्या मुंबईत रोज सरासरी 80 ते 85 लाख अंडी विक्री होते. राज्यात रोज सुमारे सव्वातीन कोटी अंडी तर दीड कोटी चिकन फस्त केले जाते. कोरोनाच्या प्रकोपानंतर तसेच आरोग्य यंत्रणांच्या सूचनेमुळे लोकांचा अंडी व चिकन खाण्याकडे कल वाढला आहे. परिणामी, मार्चमधील दुसऱ्या लाटेनंतर त्यात 20% वाढ झाली. लोकांचा आता आरोग्यसंवर्धनाकडे कल वाढला आहे. त्यामुळे प्रोटीन व व्हिटॅमीनचा उत्कृष्ट स्त्रोत असलेले अंडी व चिकनचा नियमीत वापरही वाढताच राहणार असल्याने भविष्यात अंडी, चिकनची मागणीही वाढतीच राहणार आहे.