जळगाव : शहरातील शीवतीर्थ मैदानावर (जी. एस. ग्राऊंड) 11 ते 14 मार्च दरम्यान सुरु असलेल्या भव्य अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा उद्या (सोमवारी) समारोप होत आहे. प्रदर्शनाला तीन दिवसात हजारो शेतकर्यांनी भेट दिल्याने प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
प्रदर्शनाच्या आज तिसर्या दिवशी आमदार शिरीषदादा चौधरी, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला अध्यक्षा सीमाताई नरोडे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक कुरबान तडवी शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्ष सतीश दाणी, कडूआप्पा पाटील, जैन इरिगेशनचे वरिष्ठ केळीतज्ञ डॉ. के. बी. पाटील आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन शेतकर्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरल्याच्या प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या. यानिमित्ताने झालेल्या चर्चासत्रात अनिल घनवट यांनी जी. एम. तंत्रज्ञान शेतकर्यांसाठी किती फायद्याचे आहे याविषयी तर जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी रोगांच्या निमुर्लनासाठी शेतकर्यांनी कशी काळजी घ्यावी याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.
विविध स्टॉल्सची पाहणी
प्रदर्शनात सहभागी झालेल्या यंत्र व अवजारे, शासकीय विभाग, बँक, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्या अपारंपरिक पिके, नामवंत ठिबक कंपन्यांसह बियाणे, खते, किटकनाशके तसेच निविष्ठा उत्पादकांच्या स्टॉल्सला उपस्थित मान्यवरांनी भेटी दिल्या.
ड्रोन ठरला शेतकर्यांचे आकर्षण
प्रदर्शनात ड्रोेनद्वारे पिकांवर फवारणी करतानाचे प्रात्यक्षिक शेतकर्यांना पाहता येत असल्याने ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी हे शेतकर्यांचे आकर्षण ठरले आहे. ड्रोनचा वापर करणार्या शेतकर्यांना कृषी विभागाकडून सबसिडी देखील मिळणार आहे. ही सर्व माहिती शेतकरी जाणून घेत आहेत.
शेतकर्यांची मोफत आरोग्य तपासणी
प्रदर्शनस्थळी भेट देणार्या शेतकर्यांची गोदावरी फाऊंडेशनतर्फे तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. याच बरोबर टुडी इको याची देखील तपासणी केली जात असल्याने त्यालाही शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, र्हायनोमॅट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स प्रायव्हेट लिमीटेड व गोदावरी फाऊंडेशनचे हृदयालय हे सहप्रायोजक आहेत.