नंदुरबार आणि चौधरी हे आगळेवेगळे समीकरण झाले आहे. नंदुरबारकर चौधरींनी वेगवेगळ्या व्यवसायात आणि क्षेत्रात यशाचा झेंडा रोवला आहे. चौधरींच्या चहाचे कौतुक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले आहे. चौधरींचा चहा जसा नंदुरबार-सुरत दरम्यान लोकांच्या पसंतीस उतरलाय तशीच किमया चौधरींच्या दुधानेहि साधली आहे. अर्धातच चौधरी हे आता नंदुरबारचे ‘ब्रेंडनेम’ झाले आहे. याला अपवाद खांडबारा येथील चौधरी तरी कसे ठरणार. हरीश्चंद्र चौधरी यांनी दोघा भाऊंना सोबत घेऊन चहाच्या दुकानाच्या जोडीने दुग्धोत्पादन व्यवसाय विकसित केला आहे.
नंदुरबारपासून १०-१२ किमी अंतरावर नंदुरबार-नवापूर रस्त्यावर खांडबारा हे तालुक्यातील एक मोठे गाव. खांडबारा भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरचे स्थानक देखील आहे. हा तसा आदिवासीबहुल परिसर. असे असले तरी खांडबाऱ्यात चौधरी परिवाराचे वास्तव्य पिढीजात आहे. स्व.पुनमचंद सुपडू चौधरी यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता. भाजीपाला विकता विकता त्यांनी बाजारपेठेत चहाचे दुकान सुरु केले. चहा व भाजीपाल्याने चांगली साथ दिल्याने २००७ साली पूनमचंद चौधरी यांनी खांडबारा गावापासून जवळच भादवड शिवारात १२ एकर शेती विकत घेतली. उंचसखल शेतीचे लेव्हलिंग करून घेऊन त्यात उत्पादनाला सुरुवात केली. पहिल्यावर्षी काही क्षेत्रात आल्याची लागवड केली. अनिश्चित बाजारपेठेमुळे आल्याऐवजी इतर पिकांना देऊ केले, त्यात उसाचा समावेश होता.
व्यवसायाची गरज म्हणून सुरु झाले दुग्धोत्पादन. दरम्यान भाजीपाला विक्री आणि चहाच्या व्यवसायाला शेतीची जोड देऊन २०१२ मध्ये पुनमचंद चौधरींनी या जगाचा निरोप घेतला. वडिल आपल्या तिघा मुलांसाठी सचोटी आणि कष्टाची शिकवण शिदोरी स्वरूपात देऊन गेले. मोठे बंधू हरिश्चंद्र यांनी वडिलांची जागा घेतली. चहाचा व्यवसाय दोघा बंधूंच्या सोबत ते सांभाळतच होते; त्याला त्यांनी दुग्धोत्पादनाची जोड देण्याचा निर्णय घेतला. लहान भाऊ विशालला या व्यवसायाचे आकर्षण असल्याने तो तिकडे लक्ष देऊ लागला.
१० म्हशींपासून झाली सुरुवात:
चौधरींना स्वत:च्या हॉटेलसाठी दररोज सुमारे ७० ते ८० लिटर दूध लागते. एवढ्या मोठ्याप्रमाणात शुद्ध दूध मिळतही नव्हते म्हणून, सर्वानुमते आपल्या शेतात दुग्धोत्पादन करण्याचा निर्णय झाला. सुरुवात १० म्हशींपासून झाली. जाफराबादी म्हशी काठेवाड,भावनगर येथून आणल्या. म्हशी खरेदी, गोठा व व चारा गोडाऊनसाठी बैंक ऑफ बडोद्याचे २० लाख रुपये कर्ज मंजूर झाले. या कर्जाव्यतिरिक्त रक्कमही उभारण्यात आली. कारण म्हशींमध्ये सुमारे २०-२१ लाखाची गुतंवणूक झाली होती. शिवाय गोडाऊन, म्हशींचा गोठा व लेबर रूमसाठी ८ लाख रुपये खर्च आला.
पंधरा मिनिटात होते घरबसल्या दुधविक्री:
सुरुवात १० म्हशींपासून झाली असली तरी दुधाची मागणी वाढत गेल्याने आज त्यांच्याकडे ३० म्हशी झाल्या आहेत. व्यायलेल्या आणि गाभण म्हशींचे प्रमाण समान असते. कायम १४ ते १५ म्हशी व्यायलेल्या असतात. दररोज सुमारे १५० लिटर दूध मिळते. त्यापैकी स्वत:च्या चहाच्या व्यवसायासाठी सकाळी ७५ लिटर दुधाची गरज असते सकाळी नेमके ७५ ते ८० लिटर दूध येते ते सगळे हॉटेलात चहासाठी लागते तर सायंकाळचे सर्व दूध राहत्या घरी किरकोळ ग्राहकांना विकले जाते. दुधाचा उत्कृष्ट दर्जा पाहून ग्राहक घरी येऊन रोखीने दूध घेऊन जातात. फक्त पंधरा मिनिटात घरबसल्या दुधाची विक्री होते.
वार्षिक ९ लाख रुपये नफा:
दररोज दीडशे लिटर दुधाचे उत्पादन निघते. त्यापासून महिन्याकाठी २ लाख ७० हजार रुपये मिळतात. यातून चारा, खाद्य,मजुरी व देखरेखीचा २ लाख रुपये खर्च वजा जाता महिन्याला ७० हजार रुपये निव्वळ नफा राहतो.
प्रत्येकी १५ हजार महिना वेतन याप्रमाणे २ बिहारी सालदार म्हशींच्या देखभालीसाठी लावले आहेत. तसेच हिरवा चारा कापान्यासाठी स्वतंत्र मजूर कामाला असतात.
दिनचर्या:
दोघा बिहारी मजुरांच्या सहाय्याने विशाल चौधरी म्हशींचे व्यवस्थापन पाहतात. गोठा स्वच्छ केल्यांनंतर पशुखाद्य दिले जाते. त्यात सरकी ढेप, मकाई दान, तुरडाळ, गहू भरडा आदी मिसळून दिला जातो. एका म्हशीला एकावेळी तीन-चार किलो खाद्य दिले जाते. त्यानंतर त्यांना पाणी पाजले जाते. दुधाचे दोहन हातानेच होते. प्रत्येक दूध देणारी म्हैस एक दिवसाला (सकाळ-संध्याकाळ) सरासरी १४ ते १६ लिटर दूध देते. एका वेतात १० ते १२ महिने दूध मिळते.
चारा व्यवस्थापन:
दिवसातून दोन वेळा म्हशींना चारा दिला जातो. स्वत:च्या १२ एकर शेतीपैकी २-३ एकर क्षेत्र कायम गजराज या हिरव्या चाऱ्यासाठी राखून ठेवले जाते. दररोज सायंकाळी प्रत्येक म्हशीला ३५ ते ४० किलो हिरवा चारा दिला जातो. सकाळी मात्र कोरडा चारा खाऊ घालतात. त्यात ज्वारीच्या कुट्टीचा समावेश असतो.
खांडबारा परीसरातील सुमारे ६० एकर क्षेत्रावरील ज्वारीचा कडबा विकत घेऊन त्याची कुट्टी करून गोडावूनमध्ये भरून ठेवली जाते. साधारणत: ५० ट्रक कुट्टीचा साठा करून ठेवला जातो. त्यासाठी स्वतंत्र गोडाऊन बांधण्यात आले आहे.
म्हशींचे आरोग्य व्यवस्थापन: व्यवसायाच्या सुरुवातीच्या कालखंडात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नूर शेख यांचे चांगले सहकार्य लाभले. या भागात पशुवैद्यक सेवा फारशी उपलब्ध होत नसल्याने डॉ. नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: विशाल चौधरी म्हशींचे आजार ओळखून प्राथमिक उपचार करतात. मात्र मोठे समस्या निर्माण झाल्यास नंदुरबार येथिल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जातो.
म्हशींमध्ये स्तन्दाः हा मोठा आजार असतो. त्यासाठी डॉक्टरांचे मार्गदर्शनाने उपचार केले जातात.
कोलदे केव्हीकेचे मार्गदर्शन:
गोठ्याच्या उभारणीपासून म्हशींचे व्यवस्थापनापर्यंत सर्वच बाबतीत कोलदे (नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन लाभते. यात डॉ. गाणापुरे यांचा दामावेश आहे. चौधरी यांचा हा गोठा परिसरातील अनेकांचे मार्गदर्शक केंद्र ठरले आहे.
चौकट:
तीन भाऊंचे हे एकत्र कुटुंब आहे. वाडील वारल्यानंतर आई व मोठे भाऊ हरिश्चंद्र चौधरी हेच घराचा कारभार पाहतात. हॉटेल,शेती आणि दुग्धोत्पादन ह्याकडे प्रत्येक भाऊ स्वतंत्रपणे लक्ष देतो. ५ रुपयापासून ते ५० हजारापर्यंतच्या प्रत्येक व्यवहाराचा निर्णय आई आणि मोठे भाऊ यांच्याशिवाय घेतला जात नाही असे विशाल चौधरी यांनी सांगितले.
प्रतिक्रिया: स्वत: मेहनत केली तर या व्यवसायात चांगला नफा राहतो. सध्या चारा उपलब्धता हेच मोठी समस्या आहे. आमच्या परीने आम्ही चारा टंचाईवर मात करीत आलो आहोत. चारा समस्या दूर झाल्यास दुग्धोत्पादन वाढविण्याचा आमचा इरादा आहे. चार वर्षापूर्वी या व्यवसायात उडी घेतली. काढलेले कर्ज ४ वर्षात फेडले. आता परिसरात आमचा गोठा पाहून ४-५ जणांनी व्यवसाय सुरु केला आहे.
विशाल पुनमचंद चौधरी, खांडबारा ता.नवापूर, जि. नंदुरबार पिन .४२५४१६, मोबाईल न. ९४२३४४४५३२
- story outline:
- आदिवासी भागातले लक्षवेधी दुग्धोत्पादन.
- १० म्हशी तीन वर्षात झाल्या ३०.
- पंधरा मिनिटात होते घरबसल्या होते दुधाची विक्री.
- स्वत: चौधरी करतात म्हशींवर प्राथमिक उपचार.
- वर्षाकाठी होतो सुमारे ९ लाख नफा.