गहू पिकासाठी पाणी व्यवस्थापन तसेच जमिनीतील ओलावा अत्यंत महत्त्वाचा असतो. गव्हास योग्य प्रमाणात 2-3 वेळा पाणी मिळाल्यास उत्पादनात 20 ते 40 टक्के वाढ होते. याशिवाय, ठिबक सिंचनामुळे पाण्यात 40 ते 50 टक्के बचत होऊन उत्पादनातही भरघोस वाढ होते.
आंतरमशागत
• पेरणीपासून 30 ते 40 दिवसांच्या आत तणांचे प्रमाण लक्षात घेऊन एक किंवा दोनवेळा खुरपणी करावी. जरुरीप्रमाणे एक ते दोनवेळा कोळपणी करून जमीन मोकळी करावी. त्यामुळे तणांचे नियंत्रण होते. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
• पहिली कोळपणी पीक तीन आठवड्यांचे झाल्यावर करावी. कोळपे चालविल्याने जमीन भुसभुशीत होऊन मातीचा थर चांगला बसू शकतो. जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो.
ओलावा व्यवस्थापन
• आच्छादनासाठी तूरकाठ्यांचा भुसा, धसकटे, वाळलेले गवत, भाताचे काड वापरावे. पीक 4 ते 5 आठवड्यांचे होण्याच्या आत आच्छादनाचा वापर करावा. आच्छादनाचा वापर केल्यामुळे पिकामध्ये 25 ते 30 मिलिमीटर ओलाव्याची बचत होते. पिकास महत्त्वाच्या पाणी देण्याच्या अवस्थेत ओलावा अधिक मिळतो. तसेच जमीन भेगाळण्याची तीव्रता कमी होते.
• ठिबक/तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. पाण्याची उपलब्धता असल्यास संरक्षित किंवा पीक जगविण्यासाठी पाणी द्यावे. तुषार पद्धतीने पाणी दिल्यास जास्तीचे क्षेत्र कमी कालावधीत भिजविता येईल.
पाणी व्यवस्थापन
• गहू पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. योग्य ओल नसल्यास पेरणी शेत ओलावून वाफसा आल्यावर करावी. पेरणी केल्यानंतर लगेच शेत ओलवावे. पेरणीनंतर साधारणपणे दर 18 ते 21 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी 4 ते 5 वेळा पाणी द्यावे लागते. पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत, त्या वेळी पाणी देणे फायदेशीर ठरते.
संवेदनशील अवस्था :पेरणीनंतरचे दिवस
• मुकुटमुळे फुटण्याची अवस्था : 18-20
• कांडी धरण्याची अवस्था : 45-50
• फुलोरा अवस्था : 60-65
• दाण्यात दुधाळ/चीक अवस्था : 80-85
• दाणे भरण्याची अवस्था : 90-100
• पाणीपुरवठा अपुरा असल्यास काही ठरावीक वेळेला पाणी देणे शक्य असेल तर पाण्याच्या पाळ्या पुढीलप्रमाणे द्याव्यातः
1. एकच पाणी देणे शक्य असल्यास ते 40 ते 42 दिवसांनी द्यावे.
2. पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
3. पेरणीनंतर तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी 40 ते 42 दिवसांनी द्यावे.
4. पेरणीनंतर तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी 40 ते 42 दिवसांनी व तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
• गव्हास एकच पाणी दिले, तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत 41 टक्के घट येते. दोन पाणी दिले, तर उत्पादनात 20 टक्के घट येते.
ठिबक सिंचनाचा वापर
• गहू पिकात ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करणे अधिक फायदेशीर दिसून येते. ठिबक सिंचनाद्वारे पाणी नियोजन केल्यास गव्हाला लागणाऱ्या पाण्यात 40 ते 50 टक्के बचत होते. उत्पादनात वाढ होते. ठिबक सिंचनाद्वारे पाणी वापर कार्यक्षमता अधिक मिळते, याचबरोबर ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी खते फर्टिलायझर टँकमधून देता येतात.
• ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी खते दिल्याने खतांच्या वापरामध्ये 25 ते 30 टक्के बचत करता येते. पिकांना पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठ्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते. दाणे चांगले भरले जातात. दाण्यांना वजन चांगले मिळते. दाण्याची गुणवत्ताही चांगली मिळते.
• ठिबक सिंचनातून 12 हप्त्यांतून अन्नद्रव्ये देण्याचे प्रमाण (किलो प्रति हेक्टर)
लागवडीनंतरचा कालावधी : नत्र-स्फुरद-पालाश
1 ते 21 (3 समान हप्ते) : 30-9-9.60
22 ते 42 (3 समान हप्ते) : 56.4-12-19.20
43 ते 63 (3 समान हप्ते) : 24-21-6.40
64 ते 84 (3 समान हप्ते) : 9.60-18-4.8
एकूण : 120-60-40
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कृषी सल्ला : हळद – फर्टीगेशन, करपा रोग, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन
- कृषी सल्ला : आंबा मोहोर संरक्षण फवारणी वेळापत्रक