मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानात झपाट्याने बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट आहे. दरम्यान, येत्या काही तासात पश्चिम बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ निर्माण होऊन धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. या रेमल चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या मान्सूनवर काय परिणाम होईल ?
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक दाट होऊन तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. हे चक्रीवादळ 26 मेच्या मध्यरात्री पश्चिम बंगालच्या सागर बेट आणि बांगलादेशच्या खेपुपारा येथे धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच चक्रीवादळाच्या प्रभावाखाली पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल.
हवामान विभागाने (IMD) पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील किनारी जिल्ह्यांसाठी आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 26 मे रोजी ताशी 100 ते 110 किमी तर 27 मे रोजी ताशी 90 ते 100 किमी वेगाने वारे वाहणार असून दोन्ही दिवशी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
कोलकाता, पूर्व मेदिनीपूर आणि हावडा जिल्ह्यात 26, 27 मे रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी 27 मेच्या सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरातील समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. उत्तर आणि दक्षिण ओडिशात आजपासून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याचवेळी मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरामसह त्रिपुरामध्ये पुढील 7 दिवसांमध्ये असेच हवामान दिसून येईल.
या राज्यांना देण्यात आला अति उष्णतेचा इशारा
तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राजस्थानच्या बहुतांश भागात 25 ते 27 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 26 आणि 27 मे रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात आणि 25, 27 मे रोजी दिल्लीच्या विविध भागात तीव्र उष्णता जाणवेल.
रेमल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम ?
रेमल चक्रीवादळामुळे येत्या 24 तासात हवामानावर आणखी परिणाम दिसून येतील. मात्र, महाराष्ट्रावर रेमल चक्रीवादळाचा थेट परिणाम होणार नसल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या केरळमध्ये मान्सून 31 मे च्या आसपास दाखल होऊ शकतो. तर, महाराष्ट्रात 10 ते 11 जूनच्या आसपास दाखल होऊ शकतो. मात्र, हवामानाचे पालटलेले चक्र पाहता महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास विलंब होऊ शकतो. काही तासातच रेमल चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) दिला आहे.