मुंबई : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. दर 4 महिन्यांनी शेतकर्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा होतात. 15 नोव्हेंबर 2023 ला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता.
शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असले तर ही माहिती ई-केवायसी संबंधित आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पंतप्रधान किसान योजनेसाठी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी ते लवकर पूर्ण करावे. तुम्ही हे वेळेवर न केल्यास तुमचा 16 वा हप्ता अडकू शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया आजच पूर्ण करावी.
ई- केवायसी करण्याची ही आहे शेवटची मुदत
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांनी ती लवकर पूर्ण करावी. यासाठी 31 जानेवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही असे न केल्यास पीएम किसानच्या 16 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. एवढेच नाही तर ई-केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांची खातीही निष्क्रिय होणार आहेत.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात, जे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप जमीन पडताळणी केली नाही त्यांनी हे काम लवकर पूर्ण करावे. 31 जानेवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण न केल्यास ते योजनेसाठी अपात्र मानले जातील.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य
योजनेशी संबंधित ई- केवायसी मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्राला किंवा जवळच्या बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता. तसेच तुम्ही घरी बसूनही पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. जर तुम्हाला ई- केवायसी ऑनलाइन करून घ्यायचे असेल तर तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करू शकता..
ई-केवायसी करण्यासाठी प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in वर जा.
यानंतर होम पेजवर ई- केवायसीवर क्लिक करा.
आता तुमचा आधार क्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती येथे टाका.
हे केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल तो प्रविष्ट करा. तुमचे ई- केवायसी पूर्ण होईल.
तसेच शेतकरी सीएससी केंद्राला भेट देऊन ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
या योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तुम्ही हेल्पलाइन क्रमांक – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय तुम्ही [email protected] या ईमेलवर संपर्क देखील साधू शकता.