नवी दिल्ली : भारताने वनस्पती-आधारित मांस उत्पादनांची अर्थात व्हेगन मीट ची (शाकाहारी मटन) पहिली खेप अमेरिकेला रवाना केली आहे. या पदार्थांना उच्च पौष्टिक मूल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. निर्यात केल्या गेलेल्या पहिल्या कंटेनरमध्ये वनस्पती आधारित मांसयुक्त चमचमीत मोमोज, मिनी समोसे, पॅटीज, नगेट्स, स्प्रिंग रोल्स, बर्गर यांसारखे शाकाहारी खाद्यपदार्थ होते.
गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नाडियाद येथून पहिली खेप कॅलिफोर्नियाला निर्यात केली गेली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. “विकसित देशांमध्ये शाकाहारी खाद्यपदार्थांच्या वाढत्या लोकप्रियतेसह, शाकाहारी खाद्यपदार्थांच्या उच्च पौष्टिक मूल्यामुळे वनस्पती-आधारित मांसयुक्त खाद्यपदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी निर्यात क्षमता आहे,” असे पीयूष गोयल यांच्या मंत्रालयाने म्हटले आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना ; यासाठी मिळू शकते २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/SckaImzMZFk
भरपूर फायबर कमी कॉलेस्ट्रॉल असल्यामुळे, शाकाहारी अन्न उत्पादने जगभरातील पर्यायी अन्न उत्पादने बनत आहेत, असे कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडाचे (APEDA) अध्यक्ष एम अंगमुथू यांनी म्हटले आहे. वनस्पती-आधारित मांस उत्पादनांची पहिली शिपमेंट ग्रीन-नेस्ट आणि होलसम फूड्सद्वारे निर्यात केली गेली.
पारंपरिक प्राणी-आधारित मांस निर्यात बाजाराला अडथळा न आणता वनस्पती-आधारित मांस उत्पादनांच्या प्रचार-प्रसारासाठी अपेडा काम करत आहेत. अपेडाने येत्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलिया, इस्रायल, न्यूझीलंड आणि इतर देशांमध्ये पॅनकेक, स्नॅक्स आणि चीजसह विविध शाकाहारी खाद्यपदार्थांच्या उत्पादनांचा प्रचार, प्रसार करण्याची योजना आखली आहे, असे अंगमुथू यांनी ॲग्रोवर्ल्डला सांगितले.
भारतीय व्हेगन मीट (शाकाहारी मटन) प्रथमच अमेरिकेत
भारतातून पहिल्यांदाच भारतीय व्हेगन मीट म्हणजेच शाकाहारी मटन असलेले हे खास मोमो, समोसे, पॅटीज, नगेट्स अमेरिकेत पोहोचणार आहेत. जाणून घेऊया काय आहे खास यात ते. व्हेगन मीटला व्हेजन, व्हिगन, व्हीगन, वेगन मीट अशा विविध उच्चाराने जगभर ओळखले जाते. व्होल फूड व्हेगन डाएट किंवा प्लांट बेस्ड प्रोटीन फूड हाही सध्या जगात खाद्य ट्रेण्ड आहे.
व्हेगन फूड हे जगभर पर्यायी खाद्यपदार्थ बनत आहे. त्यात उच्च दर्जाचे पोषक घटक असतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी आहे. विकसित देशांमध्ये शाकाहारी खाद्यपदार्थांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, वनस्पतींवर आधारित अन्न उत्पादनांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्याची प्रचंड क्षमता आहे.
यामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, मध, अंडी यांचा समावेश होतो. म्हणजेच शुद्ध शाकाहारी पेक्षा अधिक पटीने जास्त शाकाहारी. जे व्हीगन लोक दूध पीत नाहीत; तसेच दही, तूप, पनीर, चीज काहीच खात नाहीत, यासाठी इतर पर्यायांचा अवलंब केला जातो. याशिवाय, फक्त सेंद्रिय पद्धतिने उगवलेल्या धान्य, भाज्या, फळे खाल्ले जातात.
व्हेगन मीटच्या पहिल्या कंटेनरला रवाना करताना खेडचे जिल्हाधिकारी के. एल. बछानी यांनी भविष्यातील निर्यात संबंधित उपक्रमांसाठी अपेडाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “अपेडाच्या गुजरात प्रादेशिक विभागाच्या प्रयत्नांमुळे भाजीपाला मांसआधारित खास खाद्यपदार्थांची पहिली खेप नडियादहून अमेरिकेला निर्यात होत आहे.”
निर्यात वाढविण्यासाठी अपेडा प्रयत्नशील
अपेडाने निर्यात संबंधी अनेक उपक्रम सुरु केले आहेत. यासाठी व्हर्च्युअल पोर्टल विकसित केले जात आहे, जेणेकरून आभासी व्यापार मेळे, शेतकरी कनेक्ट पोर्टल, ई-ऑफिस, हॉटी-नेट ट्रेसेबिलिटी सिस्टम, खरेदीदार-विक्रेता संमेलन, उत्पादनाशी संबंधित मोहिमा इत्यादी उपक्रम राबवता येतील. राज्यातील निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अपेडा राज्य सरकारसोबत काम करत आहे.
अपेडा निर्यात चाचणी आणि अवशेष निरीक्षण योजनेसाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळांना बळकट करण्यासाठी मदत करत आहे. अपेडा कृषी उत्पादनांच्या निर्यातीला गती देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, गुणवत्ता सुधारणे आणि बाजार विकासातही मदत करत आहे.
निर्यात होत असलेल्या उत्पादनांचे गुणवत्ता प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी, अपेडाने देशभरातील 220 प्रयोगशाळांना मान्यता दिली आहे, ज्या निर्यातदारांना उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसाठी चाचणी सेवा प्रदान करतात.
व्हेगन मीट, व्हेगन फूड म्हणजे नेमके काय?
व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन ठळक खाद्यप्रकार सर्वाना माहित आहे पण मग व्हेगन म्हणजे काय? असा प्रश्न बहुतेकांना पडतो. ज्या प्रकारे शाकाहारी (व्हेज) आणि मांसाहारी (नॉनव्हेज) हे आहाराचे प्रकार आहेत; तसाच व्हेगन हा एक आहाराचा नवा प्रकार आहे. तो शाकाहारीमध्ये मोडला जातो.
मांसाहारी म्हणजे प्राण्यांचे मांस आणि अंडी खाणारे लोक. या प्राण्यामध्ये कोंबडी, बोकड, शेळी व इतर प्राण्यांचा समावेश होतो. जो माणूस मांसाहारी आहे तो शाकाहार आणि मांसाहार अशा दोन्ही प्रकारचे आहार खातो. मांसाहार न खाणारे लोक म्हणजेच शाकाहारी, या आहारामध्ये धान्य, भाज्या, फळे, दूध आणि इतर गोष्टींचा समावेश होतो. हा झाला या दोन्हीतला फरक.
व्हेगन हा शाकाहाराचा एक प्रकार आहे. या प्रकारच्या आहारामध्ये अजून काही गोष्टी वगळल्या आहेत. प्राणी, पक्षी आणि त्यांच्यापासून बनलेल्या अथवा उत्पन्न झालेल्या गोष्टी टाळल्या जातात.
मांसाहार सोडण्यासाठी नवा पर्याय
ज्यांना मांसाहार सोडायचा आहे, अथवा काही कारणाने खायचे नाही त्यांच्यासाठी व्हेगन मीटचा पर्याय उपलब्ध आहे. सोयाबीनपासून हुबेहूब मांससारखा पदार्थ तयार केला जातो, ज्याची चव, रूप सारखेच असते. अनेक खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या पाकीटबंद व्हेगन मीट बनवतात. व्हेगन फूड बाजारात अगदी सहज मिळते.
लोकांमध्ये शाकाहाराविषयी जागरूकता वाढत आहे. तसेच अन्नपदार्थात होणारी भेसळ, रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या भाज्या फळे या गोष्टींमुळे आपली प्रतिकार शक्ती कमकुवत होत आहे. त्यामुळे व्हेगन आहाराकडे कल वाढत आहे. व्हेगन आहारामुळे पक्षी, प्राणी कत्तल यांचे जीव वाचत आहेत; तसेच यामुळे सेंद्रिय शेतीलाही चांगले दिवस येत आहेत.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार
- Best Idea! झाडावर न चढता सहजपणे फळ तोडा; A1 भन्नाट देसी जुगाड! पाहा हा व्हिडिओ …
Comments 5