पारगाव (ता. श्रीगोंदा, अ.नगर) हे गाव पूर्वी पानमळ्यासाठी प्रसिद्ध होते. या गावाची आता शेततळ्याचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे. येथील शेतकरी शिवेंद्रकुमार मोटे यांनी शेततळ्यातील संरक्षित पाण्यावर विविध पिकाचे उत्पादन घेतले आहे. सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून त्यांनी शेतीतील जैवविविधता देखील जोपासली आहे.
अनेक गावातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तलावातील आहे ते पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे, त्यामुळे धरणातील पाणी शेतीसाठी मिळणे शक्यच नाही. पुढील तीन महिने कसे जाणार, असा प्रश्न पडला आहे. असेच एक गाव नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात आहे. त्या गावाची लोकसंख्या 7 हजार असून गावाचे क्षेत्र 10 हजार एकर आणि गावात सरासरी एकरी एक बोअर याप्रमाणे बोअरवेल आहेत. पण पाणी अपवादाने एखाद्याच ठिकाणी. श्रीगोंदापासून 6 किलोमीटर अंतरावर पारगाव (सुद्रिक) नावाचे हे गाव आहे. गावाला कुकडी धरणाच्या पाटाने पाणी मिळते. चांगला पाऊस झाला तर वर्षातून पाण्याच्या 3/4 पाळ्या मिळतात. ते पाणी सर्व गावकरी साठवून ठेवतात. त्यातून त्या त्या हंगामातील पिके घेतली जातात. गावतलावात पाणी साठवून त्याचा पिण्यासाठी (कठीण काळात) वापर केला जातो. इतर वेळी आपापल्या बोअरवेलचे पाणी वापरले जाते. गावातील बोअरवेल सरासरी 250 फुटापासून 560 फूट आहेत. आता नवीन बोअर घेतले तर 600 फुटाची मानसिकता ठेऊन घ्यावे लागते. गावाचे सरासरी पर्जन्यमान 1100 मिलीमीटर आहे. मात्र मान्सूनचा सुरवातीचा पाऊस 150 ते 200 मिलीमीटर असतो. परतीचा पाऊस सरासरी भरून काढतो. गेल्या वर्षीपासून पाऊस कमी होत गेला आहे. यावर्षी तर फक्त 200 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे.
ऊस, भाजीपाला शेती
गावापासून जवळ दोन साखर कारखाने (श्रीगोंदा व कुकडी) आहेत. त्यामुळे 8 वर्षापूर्वी गावाचे मुख्य पीक ऊस होते. त्याच्या जोडीला कांदा असायचा. 3 ते 5 एकर शेती असणारे शेतकर्यांची संख्या जास्त आहे. 10 एकर पेक्षा जास्त शेती असणारे शेतकरी 10 ते 15 असतील. पण सर्वाकडे स्वतःपुरती 2 गुंठ्यापासून 20 गुंठ्यापर्यंत भागीपला लावलेला असतो. याबरोबर कागदी लिंबाचेही उत्पादन होते.
पूर्वी नागवेली पानाचे उत्पादन
पारगाव वर्ष 1870 पासून 2000 पर्यंत नागवेलीच्या पानाचे उत्पादन घेणारे गाव म्हणून पुर्ण महाराष्ट्रात ओळखले जात. कळीदार मोठे पान उत्पादन हे येथील वैशिष्ट्य होते. येथून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व खान्देशातील काही भागात ही विड्याची पाने विक्री होत. त्यामुळे येथे सुमारे 500 एकर पेक्षा जास्त पानमळे होते, असे येथील बजूर्ग सांगतात. आज राज्यात असे पानमळे कुठेच दिसत नाहीत. राज्यात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातून पाने विक्रीसाठी येतात. या पानमळ्यामुळे गावतील तापमान वाढत नव्हते. पाणी वापर कमी होत होता. गावात आजही काही विहिरी आहेत त्यांची खोली 50 फुटापेक्षा जास्त नसून त्या बांधीव आहेत. साखरकारखाने झाल्यानंतर पानमळ्यांची जागा ऊस पिकाने घेतली. गावातील शेवटचा पानमळा 2010 मध्ये तुटला, असे ज्ञानदेव मोटे म्हणाले.
पाण्याची बदलती परिस्थिती
ऊस उत्पादन वाढले तसा पाणी वापर वाढला. शेकडो वर्षापासून भूगर्भात साठून असलेले पाणी फक्त उपसणे सुरू झाले. पुनर्भरण करणे माहित नव्हते, त्यामुळे पर्यावरण बिघडले दुष्काळाचे चक्र सुरू झाले. पारगाव देखील त्याला अपवाद नव्हते. धरणातून येणार्या पाण्यावर मर्यादा आली. मग गावकर्यांची पाणी शोधासाठी धावपळ सुरू झाली. त्यासाठी कोणी विहीर खोदली, तर कोणी बोअरवेल. सुरवातीला वर्ष 2000 पासून कमी खोलीवर शे-सव्वाशे फुटावर भरपूर पाणी लागत. यानंतर पाण्याची खोली वाढत गेली. या दरम्यान शासनाची शेततळे योजना सुरू झाली. पण ही योजना सर्वांसाठी नव्हती. ज्या शेतकर्यांकडे फळबाग असेल, किंवा नव्याने लागवड करायची असेल त्यांच्यासाठी होती. त्यातून गावात लिंबोणी, द्राक्ष व डाळिंब लागवड सुरू झाली. शेततळे योजनेत हे गाव नव्हते मग शेतकर्यांनी एक लाखापासून ते 5 लाख रुपयापर्यंतचे शेततळे स्व-खर्चातून तयार केले. सध्या या गावात 3 हजार पेक्षा जास्त शेततळी आहेत. पानमळ्याचे गाव शेततळ्याचे गाव म्हणून प्रसिद्धीस आले.
मोटेंची यशस्वी शेती
गावातील तरुण शिक्षित, अर्धशिक्षित, बिगारी शहराकडे रोजीरोटीसाठी वळाला. पण मातीची ओढ गप्प बसू देत नव्हती. त्यातील काही तरूण गावी येऊन शेती करू लागले. त्यापैकीच ज्ञानदेव मोटे (सध्या वय 62) हे रसायन विषयाचे पदवीधर. घरी वडिलोपार्जित शेती. काळाच्या ओघात वाटण्या झाल्या. उंच टेकाड असलेली 6 एकर जमीन वाट्याला आली. त्यांना एक मुलगा शिवेद्र्कुमार, तो आयटीआय. शिक्षण पूर्ण करून तो पुणे येथे बजाज कंपनीत कामाला लागला. सहा महिन्यात दुर्धर आजाराने त्याला नोकरी सोडणे भाग पडले. पुण्यातील अनेक नामांकित दवाखान्यात उपचार केले. पण गुण आला नाही, पण आई वडिलांनी आशा सोडली नाही. आयुर्वेद उपचार सुरू झाले. हळूहळू गुण येऊ लागला आणि 3 ते 5 वर्षात तब्येत सुधारली. पुढे लग्न झाले आणि दोन मुली झाल्या. नोकरी करण्यापेक्षा आपली शेती बरी म्हणून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शिवेंद्र याने शेती करणे सुरू केले.
पीक पद्धतीत बदल
शिवेंद्रकुमारने वडिलांच्या काळात असणारे ऊस व कांदा पिके कमी केले. त्या जागेवर लिंबोणी लागवड केली. 10 वर्षापेक्षा जास्त वयाची 250 झाडे आहेत. वडिलांच्या मदतीने व मार्गदर्शनाखाली 6 वर्षाखाली एक एकर पाच गुंठे क्षेत्रावर माणिक चमन जातीची द्राक्ष लागवड 8 बाय 4 फूट अंतरावर केली. वर्षभर त्याचा अभ्यास करून त्यावरील किडरोग, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन, विक्री व्यवस्था,वातावरणातील बदल व त्याचे पिकावर होणारे चांगले वाईट परिणाम याचा अभ्यास केला. 4 वर्षात चांगले म्हणजे प्रतिवर्ष 8 ते 9 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. 4 वर्षापूर्वी भगवा जातीचे डाळिंब लागवड केली. डाळिंबाचे 400 झाडे आहेत. दरवर्षी सरासरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते. यातून सरासरी 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न मिळू लागले. यातून नवनवीन कल्पना सुचू लागल्या. पिकाला पाणी कमी पडू लागले. वडिलोपार्जित 50 फूट बांधीव विहीर आहे. मग एक बोरवेल 250 फूट खोदला. पण मार्च ते मे या महिन्यात पाणी टंचाई तीव्रतेने जाणावू लागली.
संरक्षित पाण्यासाठी शेततळे शेततळ्याची संकल्पना मूळ धरू लागली होती. शेतात असलेले अर्ध्या एकरचे टेकाड साफ करून तेथे प्रशस्त कौलारू बंगला बांधल्याने राहण्याची सोय झाली. जळवच 120 बाय 80 फूट आकाराचे 40 फूट खोलीचे शेततळे खोदले. त्यासाठी सव्वा दोन लाख रुपये खर्च लागला. 500 मायक्रॉन चा कपडा अंथरला. त्याला सव्वादोन लाख रुपये खर्च आला. सर्व मिळून साडेचार लाख रुपये खर्च आला. पाच वर्षात एकदा कपडा बदलावा लागला. यात फक्त एकदा कपड्याचे पैसें अनुदानातून मिळाले. पाण्याचे महत्व बाप लेकाला पटले होते, त्यामुळे संपुर्ण 6 एकर क्षेत्रावरील पिकांना ठिबक सिंचन केले. संरक्षित पाण्याची सोय झाल्याने सव्वा एकर क्षेत्रात सुपर सोनाका द्राक्ष वाणाची लागवडी केली. संपूर्ण सहा एकरात रासयनिक खताचा वापर बंद केला. रासयनिकचे दुष्परिणाम शिवेन्द्र्कुमार यांना भोगावे लागले होत, त्यामुळे फक्त द्राक्ष पिकासाठी एकूण खताच्या 20 टक्के खत तेही विद्राव्य खते ड्रीप मधुन सोडण्यात येतात.
सेंद्रिय निविष्ठांचा वापर
सेंद्रिय खतासाठी दोन गाई, चार शेळ्या, पाच करडे, दोन वासरे यांचे संगोपन केले आहे. त्यापासून मोठ्या प्रमाणावर शेणखत मिळते. त्यांनी गोबर गॅस प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे घरासाठी लागणारे इंधन उपलब्ध झाले. पिकासाठी स्लरी मिळू लागली. शेतातील सगळ्या पदार्थांचा वापर सेंद्रिय मल्चिंग म्हणून वापर होतो. त्यातून खतही मिळू लागले व जमिनीची पाणी धारण क्षमता वाढून बाष्पीभवनाचे प्रमाण कमी झाले. या सेंद्रित खतामुळे द्राक्ष, डाळिंब, लिंबू यांची गोडी वाढली. घराच्या मागे एक गुंठाजागा रिकामी होती, घरातील महिलांनी तिथे वांगी, लसूण, भोपळा, वाल, मेथी, धणे, मिरची लागवड करून घरच्यासाठी विषमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन सुरू केले.
जैव विविध जोपासली
जैव विविधता जोपासण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून बांधावर विविध प्रकारची फळ झाडे लावली आहेत. त्यात 15 आंबे, दोन जांभूळ, आवळा, चिकू, पेरू, गळलिंबू, ड्रॅगन फ्रुट, फणस, यासह एक बाम्बूचे बेटही लावले आहे. पिकांना पाणी सोडताना त्याचा पीएच तपासण्यासाठी मशीन वापर केला जातो. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढला असून जमिनी भूसभूसीत झाली आहे. गतवर्षी दीड एकर द्राक्षबागेतून 40 टन उत्पादन झाले आणि जागेवर 45 रुपये किलो दर मिळाला. यावर्षी कमी पावसामुळे उत्पादन 25 टन (कमी) होईल व नवीन लागवडीच्या द्राक्ष्याचे दहा टन होईल असा अंदाज आहे. जुन्या बागेतील द्राक्ष्याची तोडणी सुरू झाली असून त्यास प.बंगालच्या व्यापार्याने 42 रुपये किलो भाव दिला आहे. नवीन बागेची तोडणी अजुन 15 दिवसानंतर येईल, त्यास अंदाजे 45 ते 50 रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा आहे.
शेततळ्यातून मत्स्य उत्पादन
शेततळ्यात गत वर्षीपासून रोहू, कतला, मृगळ जातीचे मासे पालन सुरू केले आहे. त्याचे उत्पन्न यावर्षी पासून सुरु होईल. शेती समजून घेऊन आधुनिक तंत्राचा वापर केल्यास केलेली शेती नेहमीच फायद्यात राहते. मात्र आता शेततळे ही गरज बनली आहे. पाण्याचा समतोल व योग्य वापर करून पिकाच्या गरजेपुरते पाणी वापरणे आवश्यक आहे.
- शिवेन्द्रकुमार मोटे
मो.नं. 9730561499