ग्रोटेनर, क्रॉपेएक्स आणि अॅक्वापॉनिक तंत्राने नियंत्रित शेती
शेतजमिनीचे पिढी, दर पिढी विभाजन होत आहे. यामुळे सलग जमिनीचे खंड पडत आहेत. त्यातच गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेती शाश्वत राहिली नाही. अशा परिस्थितीत कमी जागेत कमाल शाश्वत उत्पादन काढण्यासाठी नियंत्रित शेती अर्थात पॉलीहाऊस, शेडनेट यांचा मोठा आधार ठरत आहे. या प्रकारची शेती वेगाने वाढत असली तरी जगभरातील काही प्रगत देशातील शेतकर्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेती पद्धतीत अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रोटेनर, क्रॉपेएक्स आणि अॅक्वापॉनिक तंत्राने नियंत्रित शेती केली जात आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती करून देणारा हा खास ‘स्पॉट रिपोर्ट’…
शहरातील ‘ग्रोटेनर’ शेती
पॉलीहाऊस, ग्रीनहाऊस सारखे नियंत्रित शेतीचे नवखे प्रकार भारतात कात टाकत आहेत. नियंत्रित शेती प्रकारामुळे शेतीचे शाश्वत उत्पादन घेणे शक्य झाले आहे. नियंत्रित शेती पद्धतीमुळे शेतीविश्वात बदल घडत असून शेतीक्षेत्राला कार्पोरेट लूक प्राप्त होत आहे. जगभरातील तरुण शेतीक्षेत्रात करिअर घडविण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत असल्याने शेती आता ‘ग्रीनगोल्ड’ म्हणून पाहिली जात आहे. युवा शेतकरी सातत्याने नाविन्याचा शोध घेत असतो. नाविण्याच्या शोधातच असलेल्या काही शेतकर्यांनी मिळून ‘ग्रोटेनर’ हेे नियंत्रित शेतीचे तंत्र विकसित केले आहे. नियंत्रित शेती प्रकारात सध्या ‘ग्रोटेनर’ शेती पद्धतीची नव्याने भर पडली आहे. अमेरिकेत सध्या शेतीचे दोन प्रकार पडले आहेत. शहरी आणि ग्रामीण शेती प्रकारात अमेरिकन शेतीची विभागणी झाली आहे. ग्रोटेनर शेती पद्धती ही शहरी शेतीचा एक नवखा प्रकार आहे. टेक्सास डलहस प्रांतात ग्रोटेनर तंत्राने शेती करणारे अनेक शेतकरी निर्माण झाले आहेत. या शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारपेठ चांगली मागणी आहे. ‘माती विना शेती’ प्रकारातील ग्रोटेनर हे तंत्रज्ञान आहे. न्यूयॉर्क शहरातील बेहरमॅन या संशोधकाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
शेतीसाठी कंटेनरचा उपयोग
मालवाहतूक जाहजांमध्ये विविध प्रकारचा माल वाहून नेण्यासाठी कंटेनरचा उपयोग केला जातो. जाहजांमध्ये माल वाहून नेणारे कंटेनर बघून बेहरमॅन यांना या कंटेनरमध्ये शेती करण्याची कल्पना सूचली. शेतीसाठी कंटेनरचा उपयोग बेहरमॅन यांनी लक्षात घेत या संशोधन संकल्पनेला त्यांनी ‘ग्रोटेनर’ असेे नाव दिले. या तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादन निर्मितीला हातभार लागणार असल्याचे बेहरमॅन यांचे म्हणणे आहे. शहरात शेतमालाचे उत्पादन करून मॉलमध्ये त्याची विक्री करण्यास देखील या पद्धतीतून संधी निर्माण होऊ शकते.
भविष्यातील पोर्टेबल शेती
जागतिक अन्नसुरक्षा लक्षात घेवून शेतीचे अस्तित्व आणि शहरातील वातावरणात टिकवण्यासाठी या शेती पद्धतीचे संशोधन करण्यात आले. कोणत्याही वातावरणात पुष्प व विविध प्रकारचे शेतमाल उत्पादन घेण्यासाठी ग्रोटेनर भक्कम पर्याय असल्याचे बेहरमॅन यांचा दावा आहे. बेहरमॅन यांनी विविध वातावरणात 40 ठिकाणी ग्रोटेनरच्या माध्यमातून शेती करण्याचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कमी वेळात अधिक उत्पादन ग्रोटेनरद्वारे मिळत असल्याचे त्यांच्या संशोधनातून सिद्ध झाले. या तंत्राने कोणत्याही ठिकाणी शेती करता येते, अगदी समुद्रातल्या बोटीमध्ये देखील. हे पोर्टेबल शेतीतंत्र असून याची निर्मिती करताना 20 ते 30 एमएम सिरॅमिक पेंटचा वापर केला आहे. त्यामुळे कंटेनरच्या आत त्याचे रिफलेक्शन होते. कंटेनरच्या आत विविध प्रकारची यंत्र लावण्यात आली आहेत. कंटेनरच्या आत बसविलेल्या विविध यंत्रांना ग्रोटॉलर असे नामकरण देण्यात आले आहे. ग्रोटॉलर ही वातावरण नियंत्रित करणारी पद्धत आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्णवेळ एका व्यक्तीची गरज आहे. या तंत्रामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होत नाही. पिकांना पाणी व सूर्यप्रकाश अल्प प्रमाणात लागते.
सेंद्रिय शेती करणे शक्य
ग्रोटेनर पद्धतीत पिकांवर येणारी कीड व रोग यांच्यावर नियंत्रण ठेवणारी ग्रोटॉलर पद्धत विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. आवश्यक तेवढाच सूर्यप्रकाश व पाणी पिकांना मिळत असल्याने पिकांची वाढ गतीने होते. एकंदरीतच ग्रोटेनरमध्ये निर्माण होणारा शेतमाल हा सेंद्रिय असतो, असे बेहरमॅन यांचे म्हणणे आहे.
पीक लागवडीसाठी ‘ग्रोरॅक्स’
कंटेनर मध्ये पिकांच्या लागवडीसाठीचे एक अत्याधुनिक स्ट्रक्चर निर्माण करण्यात आले आहे. पिकांच्या लागवडीसाठी ग्रोटेनर पद्धतीमध्ये स्टेनलेस स्टीलच्या रॅक्सचा वापर करण्यात आला आहे. या रॅक्स मुद्दाम एलईडी लाईटच्या खाली बसविण्यात आल्या आहेत. कंटेनरमध्ये लावण्यात आलेला रंग, बसवलेले रॅक्स व एलईडी लाईटस यामुळे प्रकाश संश्लेषणासाठीचे वातावरण निर्माण होते. या वातावरणामुळे कमी वेळात अधिक उत्पादन घेणे शक्य होत आहे. ग्रोटेनरमध्ये रॅक बसविल्यानंतर त्यावर रिमोटद्वारे नियंत्रण करता येते. पीक काढणीला आल्यानंतर मालाची प्रतवारी करावी लागते. त्यांना पुन्हा क्रेट मध्ये टाकून ग्राहकांपर्यंत पोहचावे लागते. ग्रोटेनर मध्ये बसविण्यात आलेल्या रॅक्स थेट ग्राहकांपर्यंत पोचवणे शक्य आहे. ग्रोटेनरच्या आत असलेली उपलब्ध जागा लक्षात घेवून त्याचे आरेखन करता येते. ग्राहकांच्या मागणीनुसार देखील रॅक्सचे निर्माण करता येते.
स्मार्ट फार्मींग टेक्नॉलॉजी
ग्रोटेनर मध्ये बसविण्यात आलेली ग्रोटॉलर नावाची सिस्टीम संगणक अथवा स्मार्ट फोनच्या माध्यमातून सहज हाताळता येते. पिकांना लागणारे पाणी, अन्नद्रव्य, याची माहिती देते. कंटेनरमध्ये निर्माण झालेला कार्बन, फॉस्फेट व हवेच्या आर्द्रतेची माहिती ग्रोटॉलरच्या माध्यमातून मिळत असते. जगभरात कोठूनही कम्प्यूटर किंवा स्मार्ट फोनच्या माध्यमातून ग्रोटेनरमधल्या शेतीशी सातत्याने संपर्कात राहून नेमलेल्या व्यक्तीला गरजेप्रमाणे सूचना देता येतात. सिंचन व्यवस्था, प्रकाशव्यवस्था, वातावरण व पर्यावरण याची अचूक व तत्काळ माहिती ग्रोटॉलरमुळे मिळते. एका क्लिकद्वारे माहिती अॅक्रोबेट, एक्सेल या स्वरूपात मिळते. पिकांना आवश्यक असलेल्या घटकांची अलार्म वाजवून ग्रोटॉलर माहिती देत असतो. उदा. ग्रोटॉलरमधील पिकांना जर पाणी हवे असेल तर फोनवर अलार्म वाजून माहिती मिळते. ग्रोटेनर मध्ये पिकांना पाणी देण्यासाठी पर्यावरण पूरक तंत्राचा वापर केला आहे. पिकांना पाणी देण्यासाठी ओझोनची ट्रिटमेंट दिलेले पाणी पिकांना दिले जाते. त्यामुळे पर्यावरण पूरक शेतमालाची निर्मिती करणे शक्य झाले आहे.
कोरडवाहू शेतीसाठी ‘क्रॉपएक्स’ प्रणाली
पिकांना आवश्यक तेवढेच पाणी देण्यासाठी ‘क्रॉपएक्स’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भारतात तरुण मोठ्या प्रमाणावर शेतीकडे वळत आहेत. या युवा शेतकर्यांमध्ये स्मार्ट फोन वापरणार्या शेतकर्यांची वाढत असल्याचे क्रॉपएक्स निर्मिती कंपनीचे म्हणणे आहे. सध्या या प्रणालीचे युरोप व अमेरिकेत नुकतेच सादरीकरण करण्यात आले आहे. कोरडवाहू शेतकर्यांची संख्या व युवा शेतकरी लक्षात घेता, कंपनीच्या वतीने ही प्रणाली भारतात लवकरच सादर करणार आहे.
संगणक प्रणालीने पिकांना पाणी
जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी भीन्नप्रकारची शेतजमीन पहायला मिळते. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांना पाण्याची गरज देखील वेगवेगळी असते. पिकांना पाणी देताना कधी जास्त तर, कधी कमी दिले जाते. पाण्याचे प्रमाण कमी किंवा अधिक झाल्याने उत्पादनात घट होते. जागतिक शेतीची गरज पाहून जागतिक पातळीवर काम करणार्या शास्त्रज्ञांच्या टिमने ‘क्रॉपएक्स’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. अत्यंत मुबलक दरात ही प्रणाली मिळत असल्याने युरोपियन शेतकर्यांनी याचा वापर सुरू केला आहे. शेतकर्यांचे समाधान झाल्यानंतरच याची रक्कम कंपनी घेते.
सिंचनाच्या पाण्यात बचत
युरोप व अमेरिका खंडात पाणी बचतीसाठी वापरण्यात येणारी जगातील सर्वाधिक अत्याधुनिक प्रणाली म्हणून क्रॉपएक्स प्रणाली ओळखली जाते. पिकांना आवश्यक तेवढेचे पाणी देणे यामुळे शक्य झाले आहे. परिणामी पीकउत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पिकांना आवश्यक तेवढेच पाणी देण्यात यश आल्याने ही प्रणाली पर्यावरण पूरक ठरत आहे. पाण्याची 25 टक्के बचत होत असल्याचे युरोपियन शेतकर्यांचे म्हणणे आहे.
शेतात सेन्सर, अॅपवर सूचना
शेतीच्या प्रत्येक भागात पिकांना आवश्यक असणार्या पाण्याचा शोध क्रॉपएक्स प्रणाली घेत असते. त्यानुसार ती शेतकर्यांना मार्गदर्शन करत असते. शेतामध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी सेन्सर बसविले जातात. त्याची जोड मोबाईल मधल्या अॅपला दिली गेलेली असते. त्यानुसार शेतकर्यांना पिकांना आवश्यक असलेली माहिती तत्काळ मिळते. शेतामध्ये लावण्यात आलेले वायरलेस सेन्सर क्लाऊडला त्याचे रीडींग पाठवते. पाठविलेली रीडींग, मातीची पद्धत व शेतीची सद्यःस्थिती याची सांगड घालून पिकांना आवश्यक असणार्या पाण्याची माहिती ही प्रणाली देते. संकलित माहिती शेतकर्यांच्या मोबाईलवर शेतीच्या नकाशानुसार सादर होते. सादर झालेली माहिती प्रणालीच्या माध्यमातून शेतीला आवश्यक असलेल्या प्रमाणाची माहिती शेतकर्यांना देत असते.
‘क्रॉपएक्स’ निर्मितीचे शिलेदार
— यॉसी हरन —
हार्डवेअर निर्मितीक्षेत्रात यॉसी हरन गेली 20 वर्षे कार्यरत आहेत. मेडीकल क्षेत्राशी निगडित असलेली विविध उपकरणे त्यांनी निर्माण केली आहेत. क्रॉपएक्स प्रणाली विकसित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
— डॅनी डिशबॅक —
तंत्रज्ञान बनविणार्या अनेक कंपन्यांच्या स्थापनेत डॅनी यांचा प्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. प्रोग्रॅम मॅनेजर पदाचा त्यांना 20 वर्षाचा अनुभव आहे. क्रॉपएक्स प्रणालीचा प्रॉग्रॅम त्यांनीच विकसित केला आहे.
— डॅरेल ल्यूंडी —
न्यूझीलँड मध्ये व्यापार वाढ अधिकारी या पदावर डॅरेल यांनी अनेक वर्षे काम केले आहे. ते स्वतः संगणक शास्त्राचे पदवीधर आहेत. संगणक प्रणालीचे वायरलेस सेन्सर निर्मितीचे काम त्यांनी केले आहे.
— डॉ. मायकेल डाऊग्रेट —
अमेरिकेमध्ये डॉ. मायकेल डाऊग्रेट हे नेटाफेम कंपनीचे विपणन संचालक आहेत. नेटाफेमच्या जागतिक वितरणाची जबाबदारी देखील त्यांच्याकडेच आहे. नेटाफेम ही जागतिक पातळीवर सिंचन सुविधा पुरवणारी नामांकित कंपनी आहे. मायकेल यांच्या माध्यमातून क्रॉपएक्स प्रणालीचे जगभरात वितरण होणार आहे.
प्रतिक्रिया..
शेती सिंचन क्षेत्रातील क्रांती
सध्याचे युग व त्याला साजेसे संशोधन शेतीची सिंचनाची गरज होती. पाण्याचा अपव्यय थांबवणे शेतकरी वर्गाची गरज होती. क्रॉपएक्स प्रणालीमुळे पाणी बचत क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले आहेत. जगभरातील शेती क्षेत्राला क्रॉपएक्स प्रणालीमुळे चालना मिळणार आहे.
- डॉ. कारलीयन हेडली, सल्लागार
माती व सिंचन परिषद
हायटेक शेतीची गरज!
जगभरातल्या कोरडवाहू शेती क्षेत्राला पाणी बचत करण्याची प्रमुख गरज होती. नेमकी ही गरज ‘क्रॉपएक्स’ ने लक्षात घेतली आहे. शेतीला हायटेक करण्यात या टिमने पुढाकार घेतला आहे.
– अॅरॉन सिचनॉव्हर, कृषी शास्त्रज्ञ
‘अॅक्वापॉनिक’ शेतीला चालना
जागतिक हवामान बदलामुळे शेतीपद्धतीत लक्षणीय बदल होत आहे. हवामान बदलामुळे युरोप खंडात शेतीचे अनेक नवे प्रकार उदयास येत आहे. अमेरिकेतील ऑस्टीन प्रांतात वराह पालन, टोमॅटो लागवड व भाजीपाला लागवड असा शेतीचा पॅटर्न आहे. या पारंपरिक शेतीच्या पॅटर्नमध्ये आता समुद्री शेवाळाच्या शेतीची भर पडली आहे. ऑस्टीन प्रांताच्या दक्षिणभागात जॅक वेट यांचा ‘अॅक्वाडल्स’ शेती फार्म आहे. याच फार्म मध्ये जॅक यांनी समुद्री शेवाळाची शेती करण्यास सुरवात केली आहे. युरोपमध्ये समुद्री शेवाळाला ‘ओगोनोरी’ असे संबोधले जाते. ओगो म्हणजे पॅसिफीक महासागरतील समुद्रीशेवाळाचा प्रकार व नोरी या शब्दाचा अर्थ समुद्री शेवाळ असा होतो.
समुद्राविना शेवाळाची निर्मिती
दक्षिण ऑस्टीन प्रांतामध्ये समुद्रच नाही तरी ही या प्रांतामध्ये समुद्री शेवाळाची शेती कशी केली जाते हा प्रश्न अनेकांना पडत असेल. जॅक यांनी अॅक्वापॉनिक पद्धतीचा वापर करून सेंद्रिय भाजीपाला, मस्त्यशेती व आता सेंद्रिय समुद्री शेवाळाची यशस्वी लागवड केली आहे.
पॅसिफीक महासागरात समुद्री शेवाळाची उगवण उत्कृष्ट पद्धतीने होते. समुद्री शेवाळासाठी समुद्रातील वातावरण खूप चांगले आहे. एके दिवशी जॅक विचार करत असताना त्यांना समुद्री शेवाळाची शेती समुद्र विरहित असलेल्या ऑस्टीन प्रांतात करावयाचे ठरवले. त्यांनी यासाठी तब्बल चार वर्षे अभ्यास केला. या विषयातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. यामुळे अॅक्वापॉनिक पद्धतीने ही शेती यशस्वी केली आहे.
अॅक्वापॉनिक पद्धत
मातीविना शेती या प्रकारातील हा प्रकार आहे. हायब्रीड अन्न निर्माण करणारी ही अॅक्वापॉनिक पद्धत आहे. अॅक्वा कल्चर हा मस्त्यशेतीसाठी वापरण्यात येणारा प्रकार आहे. हायड्रोपोनिक्स हा पाण्यामध्ये रोप वाढविण्याचा एक प्रकार आहे. या दोनही प्रकाराचे एकत्रिकरण करून समुद्री शेवाळ व मस्त्यशेती एकत्र करण्याच्या पद्धतीला जॅक यांनी अॅक्वापॉनिक पद्धत असे नामकरण केले आहे. अॅक्वापॉनिक पद्धतीमध्ये एका मोठ्या टँकमध्ये मासे सोडले जातात. मोठ्या टँकमध्ये माशांना मोठी जागा मिळते व अन्न ग्रहण करण्याची क्षमता देखील वाढते. मस्त्यांचे वेस्ट एका पाईपद्वारे टँकच्या तळाशी साठवले जाते याला अॅक्वाकल्चर पद्धत म्हणतात. या ठिकाणाहून खराब झालेले पाणी फिल्टरकडे वाहत जाते. या पाण्यातील बॅक्टेरीया वेस्टमध्ये रूपांतर होते. फिल्टरेशन पद्धतीमुळे बॅक्टेरीयाचे वेस्टमध्ये रूपांतर होऊन ते नैसर्गिक न्यूट्रीयंटस होते. हे न्यूट्रीयंटस रोपांना अन्न म्हणून फायदेशीर ठरते. कोणत्याच नैसर्गिक पद्धतीला यामुळे बाधा येत नाही त्यामुळे समुद्री शेवाळ निर्माण होण्यास मदत होते. युरोप खंडातील बहुतांश हॉटेल्स मध्ये समुद्री शेवाळांना विशेष मागणी आहे.
युरोपातील ‘रेस्टॉरंट फार्मींग’
युरोपमध्ये प्रांतानुसार शेतीचे अनेक प्रकार बदलत असतात. सध्या सबंध युरोप खंडामध्ये ‘रेस्टॉरंट फार्मींग’ नवीन संकल्पना उदयास येत आहे. स्थानिक शेतकरी हॉटेल्सची गरज पाहून हॉटेल व्यावसायिकांशी करार करून शेती करत आहेत. अनेक शेतकर्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. याच ठिकाणी ताजा भाजीपाला ग्राहकांना देण्यात येत असल्याने शेतकर्यांच्या हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी वाढत असून शेतकर्यांच्या उत्पन्नात भर पडत आहे.
अॅक्वापॉनिक तंत्र उजेडात
ऑस्टीन प्रांतातले क्रीक ओमनी रिसॉर्ट प्रसिद्ध आहे. दुपारच्या भोजनासाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. न्यूयॉर्क शहरातील अनेक पत्रकार या हॉटेलचे चाहते आहेत. एके दिवशी एक पत्रकार येथे जेवणासाठी आला. रिसॉर्टचे मालक जेरी गुडवीन देखील हॉटेलमध्ये उपस्थित असतात. जेरी एका व्यक्तीकडून काही तरी विचित्र बाब घेत असल्याचे पत्रकारांच्या लक्षात आले. पत्रकारांनी लागलीच त्यांना विचारले हे काय आहे. जेरी यांनी उत्तर दिले समुद्री शेवाळ ! याचा खाण्यासाठी उपयोग केला जातो. पत्रकारांनी या शेवाळाचा आस्वाद घ्यायचे ठरवले. जेरी यांनी शेवाळ पत्रकरांना खायला दिले ते अतिशय न्यूट्रीशियस चवदार व अरोग्यासाठी उत्तम असल्याची पत्रकारांची खात्री झाली. जेरी यांच्याकडून जॅक वॅट यांचा पत्ता पत्रकारांनी घेतला त्यांची वेळ घेतली अगदी दुसर्याच दिवशी भेटीचे निमंत्रण मिळाले. यामुळे जॅक वॅट यांचे ‘अॅक्वापॉनिक’ शेतीची माहिती उजेडात आली.