शहरातील वाढती महागाई, धकाधकीचे जीवन आणि बेरोजगारीच्या संकटामुळे चीनमधील हजारो तरुण शहर सोडून ग्रामीण भागात जाऊन शेतीत रमत आहेत. ज्या मुलांच्या आधीच्या पिढ्यांनी गांव सोडून शहराचा रस्ता धरला, तीच मुले आता आपले मूळ शोधून गावाकडे परतत आहेत. तुलनेने पैसे कमी मिळत असले तरी मनःस्वास्थ्य आणि स्थिर आयुष्यासाठी तरुणाई हा नवा मार्ग निवडत आहे.
अलीकडे चीनच्या तरुणांना बेरोजगारीच्या संकटाचा फटका बसला आहे, ज्यामुळे पाचपैकी एक तरुण बेरोजगार होत आहे. त्यामुळे अस्वस्थ नव्या पिढीसाठी ग्रामीण चीन ही एक आश्वासक जागा दिसत आहे.
महानगरातील लोकसंख्या घटतेय
गेल्या काही पिध्यात अनेक लोक गावातून चीनच्या शहरांमध्ये नोकरीसाठी स्थलांतरित झाले, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ झाली. मात्र, सध्या ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यात अडकली आहे. तरुणांना बेरोजगारीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे 20 टक्के कामगार कपातीतून अनेक जण बेरोजगार होत आहेत. मध्यमवर्गीय जीवनाच्या आशेने, ज्या कुटुंबांनी आपल्या मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणात गुंतवणूक केली, त्यांच्या आशा आता धुळीस मिळताना दिसत आहेत. बीजिंग, शांघाय, ग्वांगझो आणि शेन्झेन या सर्व महानगरात 2022 मध्ये लोकसंख्येची घट प्रथमच नोंदवली गेली आहे.
शी जिनपिंग यांनी सुरू केली ग्रामीण प्रोत्साहन योजना
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग गेली काही वर्षे तरुणांना ग्रामीण भागात जाण्यासाठी आवाहन करत आहेत. आता त्यांनी ग्रामीण भागाकडे परतणाऱ्या तरुणाईसाठी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. ग्वांगडोंग प्रांतातील ग्रामीण भागात मे 2025 पर्यंत 3,00,000 पदवीधरांची नोंदणी करण्यासाठी एक पायलट योजना सुरू करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये कृषी इंटर्नशिप आणि कृषी पूरक व्यवसाय-उद्योगांना मदतीचा समावेश आहे. ग्रामीण भागात परतलेल्या तरुणांना वर्षभर नागरी सेवा प्लेसमेंटसुध्दा दिली जाणार आहे. त्यांना इनक्यूबेटर कार्यक्रमांचा लाभ दिला जाणार आहे.
“व्हिलेज सीईओ” पायलट कार्यक्रम
कोविड साथीनंतर चीनमधील बहुतांश शहरात अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. घर भाड्याच्या वाढत्या किमती, वाहतूक समस्या, प्रवासात जाणारा मोठा वेळ आणि दैनंदिन वाढलेल्या खर्चामुळे अनेक तरुणांना शहरात श्वास घेणेही कठीण होत चालले आहे. अशा स्थितीत जिनपिंग यांनी सुरू केलेला ग्वांगडोंगमधील “व्हिलेज सीईओ” हा पायलट कार्यक्रम तरुणांना भुरळ घालत आहे. यात ग्रामीण उद्योजकतेमध्ये महिनाभराचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जातो. नंतर विविध सरकारी पदांची ऑफर किंवा शेती अन् ग्रामीण व्यवसायाला मदत दिली जाते. काही जण याचा स्टॉप-गॅप्स म्हणून उपयोग करत असले तरी शहरातील अधिकाधिक बुद्धिमान तरुण गावाकडे परतत आहेत.
विरोधकांना वाटतेय राजकीय खेळी
कोविड लॉकडाउनच्या विरोधात गेल्या वर्षी चीनमधील अनेक शहरात नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. तरुणांचा संताप पुन्हा उघड्यावर येण्याची शक्यता कमी करण्यासाठी जिनपिंग यांच्या ग्रामीण मोहिमेकडे विरोधक आणखी एक राजकीय खेळी म्हणून पाहत आहेत. हाँगकाँग पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीतील समाजशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक जेनी चॅन म्हणाले, “तरुणांना शहरी केंद्रांपासून दूर नेणे हे राजकीय जोखीम दूर करू शकते, परंतु मूलभूतपणे आर्थिक समस्या दूर कशी करेल? सरकार फक्त बेरोजगारीचे संकट पुढे ढकलत आहे. अशी वेळ मारून नेण्यापेक्षा अर्थव्यवस्था खुली करून आणि खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.”
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- सेंद्रिय खत (Organic Manure): शाश्वत शेतीसाठी वरदान
- दुर्दैवी, देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी मजूर करताहेत आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या