मुंबई : शेतात पिकांना वेळोवेळी पाणी देणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच शेतीमध्ये पाण्याचा योग्य वापर करून उत्पादन वाढावे यासाठी ठिबक सिंचन हे तंत्रज्ञान आहे. केंद्र आणि राज्य सरकार पुढाकार घेऊन कोरडवाहू क्षेत्रावरील शेतीसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देत असते. सध्या सिंचन शेतीमध्ये ठिबक बसविण्यासाठी कृषी सिंचन योजनेमधून 80 टक्के अनुदान मिळत आहे. या योजनेसाठी कोण असणार पात्र?, कागदपत्रे कोणती लागणार?, अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करता येईल?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पाण्याचा वापर चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना करता यावा, असा सरकारचा मुख्य उद्देश आहे. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन हे दोन सिंचन प्रकार आहेत. शेतीमध्ये ठिबक सिंचन बसवण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज कसा करावा याची माहिती आपण जाणून घेऊया.
या योजनेसाठी पात्र लाभार्थी कोण ?
या योजनेसाठी राज्यातील सर्वच शेतकरी पात्र आहे. मात्र, राज्य सरकारने एक अट घातलेली आहे. यात अर्जदार शेतकऱ्याने मागील 7 वर्षात या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
ही आहेत आवश्यक कागदपत्रे
जमिनीचा सातबारा आणि 8अ उतारा असणे आवश्यक
अनूसूचित जाती आणि अनूसूचित जमातीच्या लाभार्थींना योजनेचा लाभ घेण्यासाठी संवर्ग प्रमाणपत्र अनिवार्य
अनुदान आणि अर्ज
अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या 80 टक्के म्हणजेच केंद्र सरकार पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेतून 55 टक्के तर उर्वरित पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25 टक्के अनुदान देण्यात येते. आणि इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या 75 टक्के अनुदान देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज देखील करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. तसेच या योजने संदर्भात अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करू शकतात.