पल्लवी शिंपी, जळगाव.
पुराणमतवादी विचारसरणीमध्ये शेती ही पुरुषांचीच काम मानली जाते, पण याच पारंपरिक धाग्याला तोडून अनेक महिलांनी आपल्या कष्टातून या क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील संगीता अनिल पिंगळे (वय ४२) या महिलेने हेच सिद्ध करून दाखवले आहे. शेतीतून आपल्या नशीबाचे पुनर्निर्माण करणाऱ्या संगीता यांच्या मेहनतीची कहाणी प्रेरणादायी आहे. त्या १३ एकर जमिनीत द्राक्षे आणि टोमॅटोची लागवड करतात, आणि यशस्वीरीत्या दरवर्षी ८०० ते १००० टन द्राक्षांचे उत्पादन घेत आहेत. त्यामध्ये त्यांना दरवर्षी २५ ते ३० लाख रुपयांपर्यंतची कमाई होत आहे. पतीच्या निधनानंतर अजिबात खचून न जाता, शेतीतला कुठलाही अनुभव नसताना, केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेती करणार्या संगीता पिंगळे यांची ही यशोगाथा…
शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असलेल्या संगीता लहानपणापासूनच हुशार आणि शिक्षणात अगदी अद्विक होत्या. त्यांचे अगदी लाडात गेले. २००० साली त्यांनी पंचवटी येथील लोकनेते व्यंकटराव हिरे या कॉलेजमध्ये बीएस्सीत (BSC) केमिस्ट्रीमध्ये पदवी संपादन केली. संगीता पिंगळे यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षाही दिल्या. पण नियती काही वेगळीच योजना करत होती. त्यांच्या वडिलांनी, कै. हरिश्चंद्र कहांडळ यांनी, त्यांचा विवाह मातोरी (ता. जि. नाशिक) येथील अनिल पिंगळे यांच्याशी २००० साली लावला. त्या काळी शेती आणि शेतकामे त्यांच्या आयुष्यात अगदी अनोळखी होती; माहेरी शेतात जाण्याचीही त्यांना सवय नव्हती. गृहिणी म्हणून त्यांच्यावर नवी जबाबदारी आली. उच्च शिक्षण घेत असतानाही अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते आणि त्या विचारांनी त्यांना बेचैन केले. २००१ मध्ये त्यांना श्रेया या कन्यारत्नाची प्राप्ती झाली, मात्र त्याच काळात त्यांच्या आयुष्यात एक मोठा धक्का बसला – वडिलांचे निधन. त्यानंतर, २००४ मध्ये त्यांना एक मुलगा झाला, पण त्याचा जन्म अपंग होऊन, पाच वर्षांच्या कष्टांनी त्या मुलाला देखील गमावले. संकटे आणि दुख त्यांच्या आयुष्यात एकामागोमाग एक येत होती, तरीही संगीता पिंगळे या हार मानत नव्हत्या.
पतीच्या निधनानंतर शेतीची जबाबदारी
२००७ साली संगीता यांच्या जीवनाला एक नवा वळण लागला. गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात असताना, त्यांच्या संसारावर आकाश कोसळले. अपघातात पती अनिल यांचे दुःखद निधन झाले, आणि त्यानंतर फक्त १५ दिवसांनी संगीता यांना मुलगा झाला. त्या काळात सासू-सासरे, दीर-जाऊ आणि मुलांसोबत एकत्र कुटुंबात त्यांचा संसार सुखाने चालला होता. मात्र पतीच्या अचानक जाण्यामुळे संगीता यांचे आयुष्यच बदलून गेले.पतीच्या निधनानंतर ९ वर्षे त्या एकत्र कुटुंबात राहिल्या, परंतु २०१६ साली कुटुंब विभक्त झाले. या वळणावर त्यांना १३ एकर शेतीची जबाबदारी मिळाली. त्या क्षणी त्यांच्या आयुष्यात एक नवा संघर्ष आणि संधी समोर उभी होती. एका दृषटीने पाहता, एकटी महिला आणि शेतात नवे पाऊल ठेवणे, हे चांगलेच आव्हान होते. पण संगीता यांची जिद्द आणि चिकाटी त्यांना या संकटावर मात करण्यास मदत करू शकली.

द्राक्षशेतीसाठी उभे केले भांडवल
त्या काळात घराबाहेर पडण्यास अडचणी होत्या, पण संगीता यांची जिद्द तसूभर कमी झाली नाही. शेती सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाची कमी भरून काढण्यासाठी त्यांनी आपले दागिने गहाण ठेवले आणि पहिली एक स्कूटर खरेदी केली. शेतीचे व्यवसाय नावावर असले तरी मुलगा लहान असल्याने, कोणतेही कर्ज मिळवणे त्यावेळी त्यांच्यासाठी कठीण होते. परंतु संगीता यांनी हार न मानता, नातेवाईकांकडून भांडवल मिळवून पहिल्यांदा टोमॅटो लागवडीचा निर्णय घेतला. दर्जेदार उत्पादनामुळे त्यांना चांगला आर्थिक नफा मिळाला. याच उत्पन्नातून त्यांनी द्राक्षशेतीसाठी आवश्यक असलेले भांडवल उभे केले. द्राक्षे ही एक अत्यंत संवेदनशील पीक आहे, आणि त्या कामात दिवसरात्र संघर्ष करण्याची तयारी संगीता यांनी मनाशी ठरवली होती. त्यांना शेती नियोजनात सख्खा भाऊ बाळा कहांडळ, मावस भाऊ दीपक पिंगळे आणि सुनील पिंगळे यांचे सल्ले आणि मार्गदर्शन मिळू लागले. यामुळे त्यांना शेतीत अधिक आत्मविश्वास मिळाला.
अनेक आव्हानांचा केला सामना
संगीता यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. एकीकडे भांडवलाचा प्रश्न, तर दुसरीकडे अस्थिर वीज पुरवठा, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि अस्थिर बाजारपेठ अशी अनेक अडचणी समोर होती. कुटुंब विभक्त झाल्यानंतर, त्यांना १३ एकर शेतीतून ७ एकर थॉमसन आणि २ एकर जंबो काळी जातीच्या द्राक्षांची लागवड मिळाली होती. सुरुवातीला शेतीचा अनुभव नसल्यामुळे, त्यांना द्राक्ष शेतीच्या वार्षिक कामकाजाची नीट समज मिळवायला लागली. संगीता यांनी त्यानंतर ऑक्टोबर बहर छाटणी, सिंचन व्यवस्थापन, शेती यंत्रांची दुरुस्ती, मजूर व्यवस्थापन आणि शेतीमाल विक्री यासारख्या महत्वाच्या कामांचा अनुभव घेतला. या सगळ्या किचकट गोष्टी शिकत, त्या शेतीच्या प्रत्येक पैलूशी जुळवून घेत होत्या. प्रत्येक अडचण किंवा त्रास हा एक शिकवण ठरली.
पहिल्याच वर्षी १२ टन द्राक्ष उत्पादन
पहिल्या वर्षीच संगीता यांना एकरी १२ टन द्राक्ष उत्पादन मिळाले, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला. या यशाने त्यांना भक्कम आधार दिला आणि त्यांनी घेतलेली आर्थिक मदत परतफेड केली. या यशामुळे त्यांना वाटलं की, शेतीत एक पाऊल टाकण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता. एवढेच काय, तर त्यांनी पुरुषांप्रमाणेच घरातील सर्व जबाबदाऱ्या पार केल्या. संगीता पिंगळे यांना मागील वर्षी (२०२४) ८०० क्विंटल द्राक्षांचे उत्पादन झाले होते. लोकलसह त्या आज एक्सपोर्ट क्वालिटीचा मात थेट व्यापाऱ्यांना विक्री करत आहेत. निविष्ठा आणि इंधन खरेदी, किराणा सामान, मुलांचे शिक्षण, आणि कधी आजारपण यापर्यंतच्या सर्व गोष्टी त्यांनी व्यवस्थापित केल्या. “एकटी महिला शेती करू शकत नाही” ही परंपरागत भावना संगीता यांनी आपल्या परिश्रमाने खोडून काढली. त्यांनी हे सिद्ध करून दाखवले की, महिलांसाठी कोणतीही मर्यादा नाही, फक्त आत्मविश्वास, मेहनत आणि चिकाटी हवी असते.
संपर्क :
संगीता पिंगळे
7218564839
