मोर्शी तालुक्यात रोडे बंधूमुळे संत्रा उत्पादकांना बाजारपेठ
दर्जेदार संत्रा उत्पादनासोबतच संत्र्याचे ग्रेडींग, व्हॅक्सीन आणि पॅकींग युनिटची उभारणी करून संत्रा उत्पादकांना जादा दर मिळवून देण्यासाठी सालबर्डी (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथील निलेश व शैलेश रोडे या भावंडांनी पुढाकार घेतला आहे. मोर्शी तालुक्यात खासगी तत्वावरील पहिलेच संत्रा प्रक्रिया युनिट उभारणार्या या भावंडांनी येत्या काळात संत्र्याला हमीभाव मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सिमेवर असलेले सालबर्डी सातपुडा पर्वतरांगात वसलेले आहे. या भागातील जमीन संत्रा लागवड आणि उत्पादकतेसाठी प्रसिद्ध आहे. फळांना रंग आणि दर्जा चांगला मिळतो, असेही शेतकरी सांगतात. याच शिवारात निलेश रोडे यांची 18 एकर शेती. निलेश यांचे वडील सुरेशराव हरिभाऊ रोडे यांनी 30 वर्षांपूर्वी अवघी पाच एकर शेती खरेदी केली. या पाच एकरावर संत्रा लागवड करण्यात आली होती. त्यातून मिळणार्या उत्पन्नातून त्यांनी टप्याटप्याने शेती 18 एकरापर्यंत झाली. आज या संपूर्ण क्षेत्रात संत्रा लागवड आहे. वडीलांच्या निधनानंतर निलेश व शैलेश रोडे हे दोघे शेतीची जबाबदारी सांभाळत आहेत.
सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन
एका एकरात सरासरी 150 झाडे आहेत. 17 बाय 17 फूट अंतरावर लागवड आहे. संत्रा बागेचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करण्यावर रोडे भावंडाचा भर आहे. जीवामृत, शेणखत, निंबोळी ढेपे, एरंडी ढेप या घटकांचा वापर केला जातो. निंबोळी ढेप आणि एरंडी ढेपचा वापर दरवर्षी दोन किलो याप्रमाणे ते करतात. निलेशने दिलेल्या माहितीनुसार, निंबोळी ढेप बुरशीनाशकासारखा उपयोग होतो. एरंडी ढेपमुळे झाडाच्या पानांची संख्या वाढण्यास मदत होते आणि झाडाची रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते, असा अनुभव आहे. गेल्या तीन वर्षांपासून या दोन्ही घटकाच्या वापरात तर जिवामृत, शेणखताचा वापर गेल्या बारा वर्षापासून केला जात आहे. यामुळे जमीनीचा पोत सुधारण्यासोबतच पिकाला पाणी कमी लागते, असे त्यांचे निरीक्षण आहे. फळांची गुणवत्ता देखील यामुळे सुधारली आहे.
प्रक्रिया उद्योग उभारला
आंबट-गोड चव असलेल्या नागपूरी संत्र्याची टिकवण क्षमता कमी आहे. साधारण परिस्थितीत सात ते आठ दिवसच संत्रा टिकतो. संत्र्यावरील साल पातळ असल्याच्या परिणामी हे घडते. त्यामुळे राज्याच्या इतर भागात नागपूरी संत्रा पाठविताना किंवा देशाबाहेर निर्यातीत मर्यादा येतात. संत्रा फळांवर व्हॅक्सींन कोटींग केल्यास 25 दिवसापर्यंत टिकवण क्षमता वाढू शकते, असे निलेश सांगतात. त्यावरील चमकदारपणा देखील वाढीस लागतो. मोर्शी हा संत्रा उत्पादनामुळे कॅलीफोर्नीया ओळखला जातो. असे असताना या भागात एकही व्हॅक्सीन, ग्रेडींग, पॅकींग युनिट नव्हते. रोडे भावंडांनी ही उणीव दूर केली. त्याकरीता जुनी यंत्रणा एका शेतकर्याकडून खरेदी करण्यात आली. या युनिटकरीता 90 बाय 45 फूट आकाराचे शेड उभारण्यात आले आहे. शेड उभारणीसह सयंत्रावर 27 लाख रुपयांचा खर्च आला. मोर्शी तालुक्यातील खासगी तत्वावरील हे पहिलेच युनिट ठरले आहे.
शेतकर्यांसाठी बाजारपेठ
सालबर्डी परिसरातील शेतकर्यांकडून थेट व्यापार्यांना संत्रा विकला जात होता. व्हॅक्सीन, ग्रेडींग सारखी प्रक्रिया देखील त्यांच्याकडून होत नव्हती. कच्चा माल म्हणूनच संत्रा ते विकत होते. या प्रक्रियेत त्यांची पिळवणूक होत होती. मार्केटमध्ये जर 30 रुपये किलोचा दर असेल त्यावेळी सात ते दहा रुपये किलोने व्यापारी खरेदी करीत होते. आता बाजारात 30 रुपये किलोचा दर असेल त्यावेळी सरासरी 20 रुपये किलोप्रमाणे दर शेतकर्यांना मिळतोच मिळतो. वाहतूक खर्च व इतर किरकोळ खर्च वगळून शेतकर्यांना हे दर दिले जातात. परिसरातील शेतकर्यांना या युनिटची माहिती मिळाल्यानंतर बहूतांश शेतकरी याच ठिकाणी आपला संत्रा विक्रीसाठी आणतात. या प्रक्रियेत कोणतीच सुट आणि कमिशन घेतले जात नसल्यामुळे शेतकर्यांसाठी हा फायद्याचा सौदा ठरत आहे. परिणामी या भागातील 50 टक्के शेतकरी रोडे भावंडांच्या नव्या प्रक्रिया केंद्रावर आपला माल आणतात. उर्वरित शेतकर्यांच्या बांधावर जात त्यांच्या संत्र्याची खरेदी केली जाते. खरेदी आणि प्रक्रिया केलेला हा संत्रा नंतर बांग्लादेशसह राज्याच्या इतर भागात पाठविला जातो. त्याकरीता व्यापार्यांशी करार करण्यात आला आहे.
प्रक्रिया युनिटची कार्यप्रणाली
निलेश रोडे यांच्या सद्याच्या ग्रेडींग, व्हॅक्सीन युनिटची चार टन प्रती तास अशी क्षमता आहे. परंतू 4 हजार 200 चौरस फूट इतक्याच जागेवर हा प्रकल्प असल्याने पॅकींगकरीता जागा कमी पडत असल्याने पॅकींगचे काम पूर्ण क्षमतेने होत नाही. संत्र्यावरील धुळ संयंत्रातील ब्रशच्या सहाय्याने काढली जाते. त्यानंतर त्यावर पाण्याचा फवारा मारला जातो. स्पंजच्या मदतीने संत्रा फळ पुसून आणि नंतर फॅनच्या मदतीने त्यावरील पाणी वाळविले जाते. त्यावर व्हॅक्सचा स्प्रे मारला जातो. ड्रायर सेक्शनमध्ये हिटर आणि फॅनच्या मदतीने व्हॅक्स कोटचा थर जमतो. त्यानंतर तो ग्रेडींग युनिटमध्ये येतो. सद्या या युनिटच्या ठिकाणी 14 कामगार आहेत. सोबतच पॅकींगकामी 22 कामगारांची गरज लागते.
बॉक्सऐवजी क्रेटचा वापर
कोरोगेटेड बॉक्समध्ये हवा कमी खेळती राहत नाही. परिणामी फळ सडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले. फळ सडण्यामुळे होणारे नुकसान टाळणाकरिता प्लॅस्टीक क्रेंटमध्येच पॅकींग करून संत्रा देशभरात पोचविला जातो. दहा किलोच्या कोरोगेटेड बॉक्सवर 34 ते 38 रुपयांचा खर्च होतो. प्लॅस्टीक क्रेटमध्ये 25 किलो संत्रा बसतो आणि हा क्रेट 110 रुपयांना मिळतो. त्यामुळे क्रेटचा पर्याय फायदेशीर ठरत असल्याचे निलेशने सांगितले.
नव्या युनिटकडे वाटचाल
संत्रा उत्पादकांचा पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता नव्याने संत्रा व्हॅक्सीन, ग्रेडींग आणि पॅकींग युनिट उभारणीकरिता रोडे भावंडांनी पुढाकार घेतला आहे. 2 कोटी 22 लाख रुपयांत हे युनिट उभारले जाणार आहे. यातील सर्व यंत्रणा अद्ययावत आणि संगणकीकृत आहे. आठ टन प्रती तास अशी या प्रकल्पाची क्षमता आहे. रोज 50 हजार किलो संत्रा फळावर या युनिटमध्ये प्रक्रिया शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले. बांग्लादेश, दिल्ली बाजारपेठेचे भाव या ठिकाणी जाहिर केले जातील. साडे दहा हजार चौरस फुटावर नव्या प्रकल्पाची उभारणी होणार आहे.
संत्रा निर्यात करणार
आयात-निर्यात परवाना निलेश यांच्याकडे आहे. नव्या अद्ययावत प्रकल्पाच्या उभारणीनंतर या भागातील संत्र्याच्या निर्यातीकरिता देखील प्रयत्न करण्याचा मानस या भावंडांनी व्यक्त केला. पंजाब राज्यात किन्नो होतो. किन्नो उत्पादकांना दर्जेदार रोपांपासून लागवड ते बाजारपेठपर्यंतची माहिती व्हावी याकरिता त्या भागात सरकारच्या प्रयत्नातून सिट्रस इस्टेट उभारण्यात आल्या आहेत. तसा प्रयत्न मात्र नागपूरी संत्र्याच्या बाबतीत झाला नाही, अशी खंत निलेश व शैलेश रोडे यांनी व्यक्त केली. दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड असलेल्या विदर्भात पहिल्या टप्प्यातील व्हॅक्सींन, ग्रेडींग युनिटची गरज आहे. त्याकरीता प्रकल्प उभारणीसाठी इच्छुकांकरीता अनुदानासाठीच्या अटी, शर्तीमध्ये शिथीलता आणावी, अशी मागणी त्यांनी केली. मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे महाराष्ट्र कृषी औद्योगीक विकास मंडळाने ग्रेडींग, व्हॅक्सीन युनिट उभारले आहे. 5 टन प्रती तास अशी त्याची क्षमता आहे. परंतू या प्रकल्पाचा उभारणीपासून आजवर शेतकर्यांना काहीच फायदा झाला नाही.
संपर्क:- निलेश रोडे – मो.नं. 9420721017