चहा… नुसता शब्द जरी उच्चारला तरी थकवा दूर होऊन तरतरी आल्यासारखं वाटतं. आपली सकाळ आणि सायंकाळ चहाविना अपूर्णच राहते. एखाद्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी चहा घेतला नाही तर आळस येतो. चहा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आहारातील इतर खाद्यपदार्थांप्रमाणेच चहा या पेयाचे स्थान देखील मोलाचे आहे. आपल्यासाठी इतका महत्त्वाचा असलेल्या या घटकाचा नेमका इतिहास मात्र आपल्याला सांगता येणार नाही. हाच इतिहास ‘अॅग्रोवर्ल्ड फार्म’च्या वाचकांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. चहाचा इतिहास… चहा प्यायला कोठून सुरुवात झाली… भारतात चहा कोठे पिकतो… भारतातील कोणत्या ठिकाणाची चहा सर्वोत्तम असते… अशा सार्या बाबींचा उलगडा करण्याचा प्रयत्न “जागतिक चहा दिन” निमित्ताने या लेखातून करण्यात आला आहे.
भारतात घराघरात चहाचे चाहते सापडतील. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये चहा नियमितपणे घेतला जातो. विशेष करून हिवाळा आणि पावसाळ्यात तर चहा कोणत्याही वेळी घेतला तरी चालतो. तणाव, थकावा घालवण्यासह झोपेला दूर पळवण्यासाठी चहा फायदेशीर असतो. चहा आज प्रत्येक घरातील, प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा घटक असला तरी त्याविषयी आपण अधिक जाणून घेण्यासाठी फारसे उत्सूक नसतो. किंबहुना तसा प्रयत्नही कुणी करत नाही, हे वास्तव आहे. वरवर पाहता चहा हा किरकोळ विषय वाटत असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आहारातील एका घटकापासून ते चहा पिकवणारी शेती, चहाच्या पानांपासून चहा पेयासाठी लागणारी पावडर तयार करणारे उद्योग-व्यवसाय, त्याचा व्यापार आणि सरतेशेवटी हॉटेल्स, चहा विकणारे छोटे-मोठे व्यावसायिक अशा चक्राच्या माध्यमातून होणारे अर्थकारण लक्षात घेतले तर चहा या विषयाच्या व्याप्तीचा विचार करता येऊ शकतो. चहा या पेयाने जागतिकीकरण फार पूर्वीच घडवून आणलं आहे. चहाबाबत चीनची मक्तेदारी आणि इतर देशांचे तिला तोंड द्यायचा प्रयत्न हा इतिहास रंजक आहे. आपल्या देशातच नाही, तर जगभरात सगळीकडेच चहा हे नुसतं पेय नाही तर ती एक प्रकारची संस्कृती आहे. एकमेकांना परस्परांशी जोडून घेणारी, गरम पाण्याच्या त्या एका उबदार पेल्यात जीवनाचा प्रवाह वाहता ठेवणारी संस्कृती. संवाद सुरू करून देणारी, थांबलेला संवाद पुढे नेणारी, सुसंवाद आणखी थोडं पुढे नेणारी संस्कृती. एका अर्थानं त्या एका लहानशा चहाच्या पेल्यात भलंमोठं जग व्यापलंय, जग जोडलंय, असे म्हटले तरी ते वावगं ठरू नये.
आपल्या भारत देशाचा विचार केला तर चहाला अंदाजे 200 ते 300 वर्षांचा इतिहास असल्याचे मानलं जातं. चहाचा मूळ उगम कोठे झाला? याबाबत मते-मतांतरे आहेत. परंतु, जगाचा विचार केला तर चीन आणि त्यानंतर भारत या देशांमध्ये चहाला प्राचीन इतिहास असल्याचा इतिहासकारांचा दावा आहे. आपल्या शेजारी असलेला चीन या देशात चहाचा शोध लागल्याचे मानले जाते. चीन आणि भारतात प्राचीन काळापासून चहाचा व्यापार होत आहे. असे असले तरी चीनच्या लोकांचे आवडते पेय असलेला चहा आपल्या भारत देशात पोहचण्यासाठी 17-18 वे शतक उजाडावे लागले. त्याला ब्रिटीश साम्राज्य कारणीभूत असल्याचे इतिहासकार सांगतात. ब्रिटिशांनी व्यापाराच्या उद्देशाने जगाचा प्रवास सुरू केला तेव्हा ते प्रत्येक देशातील संस्कृती, तेथील जीवनमानाचा जवळून अभ्यास करत असत. व्यापारासाठी भारतात आल्यावर त्यांनी शेजारील चीनची संस्कृती, तेथील लोकांची जीवनपद्धती देखील जाणून घेतली. तेव्हा ब्रिटिशांना चहाची माहिती झाली. त्यानंतर ब्रिटिशांनी बरचं राजकारण केल्यानंतर चहा भारतात आणला. त्यानंतर काही वर्षांचा कालावधी उलटला. ब्रिटीश भारत सोडून गेले. परंतु, त्यांनी भारतात आणलेला चहा मात्र येथेच राहिला. आज चहा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला आहे.
चहाच्या क्षेत्रातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली आणि भारतीयांना खर्या अर्थाने चहाचा परिचय झाला. असं असलं तरी भारतात चहा अगदीच माहीत नव्हता असं नाही. काही भागात त्याचा फक्त औषधी वापर होत होता इतकेच. ब्रिटिशांनी आसामच्या खोर्यात आणि दार्जिलिंगच्या डोंगरांमध्ये चहाची लागवड सुरू केली. अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर भारतात चहाचे उत्पादन जोर धरू लागलं. हळूहळू चीन इतकाच चहा भारतात तयार होऊ लागला. आज भारत चीननंतरचा म्हणजे दुसर्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. भारतात आसाममध्ये कॅमेलिया सिनेसिस जातीच्या चिनी प्रकारच्या चहासारखे उत्पादन होऊ शकतं, याचा शोध सर्वप्रथम रॉबर्ट ब्रूस याला 1823 मध्ये लागला. मणीराम दिवाण या स्थानिक व्यापार्याने ब्रूसची गाठ सिंगफो या जमातीशी घालून दिली. या जमातीतले लोक चहाशी साधर्म्य असणारे एक पेय पीत होते. ते एका विशिष्ट जंगली झुडपाची कोवळी पानं उन्हात वाळवत. तीन दिवस या पानांवर दव पडेल, अशी ती ठेवली जात. त्यानंतर ती पोकळ बांबूत ठेवून दिली जात. त्यांचा चांगला वास येईपर्यंत त्यांना धुरी दिली जात असे. ब्रूसने त्या पेयाची चव घेतली तर ती चहाशी मिळतीजुळती आहे, असं त्याच्या लक्षात आलं. त्याने या पानांचे नमुने गोळा केले. पण त्याच दरम्यान 1830 मध्ये त्याचा मृत्यू झाला. मग त्याच्या भावाने, चार्ल्सने पाठपुरावा करत हे नमुने कोलकात्याला पाठवले. त्यात असं आढळलं की ती चहाचीच पानं होती, पण ती चिनी चहापेक्षा वेगळी होती. त्यांचे नाव असामिका ठेवण्यात आलं. याच दरम्यान चहाच्या क्षेत्रातली चीनची जागतिक मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी ब्रिटिशांच्या वसाहतींमध्ये चहाची लागवड करता येईल का, याची चाचपणी सुरू होती. त्यासाठी चीनमधून चहाच्या बिया चोरून भारत, श्रीलंका या वसाहतींमध्ये आणल्या जात. त्यांच्यावर प्रयोग केले जात. या चिनी बिया इथल्या मातीत नीट रुजत नव्हत्या. याच दरम्यान ब्रूसला सापडलेली ही नवी जात सगळ्यांपुढे आली. त्यावरच्या अथक प्रयोगांनंतर ब्रिटिशांनी अप्पर आसाममधल्या चबुआ इथं चहाची व्यावसायिक लागवड सुरू केली 1840 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात चहाच्या व्यवसायाने पाय रोवायला सुरुवात केली. चिनरी ही जात आधी आसाममध्ये आणि नंतर दार्जिलिंग तसेच कांगरामध्ये लावली गेली. ती तिथे चांगलीच रुजली. दार्जिलिंगचा पहिला सुपरीटेंडंट आर्चिबाल्ड कॅम्पबेल याने दार्जिलिंगमध्ये 1841 मध्ये त्याच्या घराजवळ चिनारीची रोपं लावली. त्याचं बघून इतरांनीही रोपं लावायला सुरुवात केली. 1847 मध्ये अधिकृतरीत्या चहाच्या रोपांची नर्सरी सुरू झाली.
भारतात चहा लोकप्रिय होण्यामागे ब्रिटिशांचे खूप प्रयत्न होते. भारतात रेल्वेचं आगमन झाल्यावर विविध रेल्वे स्टेशन्सवर चहाचे ठेले उभारले गेले. दुसर्या महायुद्धानंतर भारतात चहा लक्षणीयरीत्या लोकप्रिय झाला. 1900 शतकाच्या शेवटी भारतात उत्पादित होणार्या एकूण चहापैकी 71 टक्के चहा भारतातच विकला जात होता. आज भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्चिम बंगाल, तामीळनाडू आणि केरळमध्ये चहाच्या महत्त्वाच्या बागा आहेत. इथे सगळीकडेच उत्तम दर्जाचा चहा तयार होतो आणि या चहा उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आज भारतात चहाच्या उद्योगातून लाखो लोकांना रोजगार मिळत आहे. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या माहितीनुसार आजमितीस संपूर्ण आसाममध्ये मिळून 43 हजार 292 चहाच्या बागा आहेत. 62 हजार 213 चहाच्या बागा निलगिरीमध्ये आहेत. तर दार्जिलिंगमध्ये फक्त 85 चहाच्या बागा आहेत. दार्जिलिंग, आसाम आणि निलगिरी चहाच्या अधिकृत पुरवठ्यासाठी 1953 मध्ये टी अॅक्ट तयार करण्यात आला असून त्यामार्फत या चहाची अधिकृततेची तपासणी होते.
भारतात चहाची लागवड करण्यासाठी ब्रिटिशांनी जो खटाटोप केला त्याला आणखी एक बाजू होती. ती होती चीनबरोबरच्या संबंधांची. त्या काळी चीनकडून चहा विकत घेऊन तो इंग्लंडमध्ये तसेच इतर ठिकाणी नेऊन विकला जात होता. आपल्या चहाच्या मक्तेदारीची जाणीव असलेला चीन हा देश चहाचे दर सतत वाढवत असे. दुसरीकडे चहाची मागणीही वाढती होती. इंग्लंडमधला साधा कामगारदेखील त्याच्या एकूण उत्पन्नाच्या काही टक्के रक्कम चहावर खर्च करत असे. ब्रिटिश भारतातून कापूस नेत, त्याचे कापड विणणे वगैरे व्यापारातून जो पैसा मिळत असे तो चीनमध्ये उत्पादित होणार्या चहाच्या खरेदीसाठी वापरला जाई. दरम्यानच्या काळात चीन आणि बिटिशांच्या व्यापारात अनेक चढउतार आले. चिनी व्यापारी ब्रिटिशांची कोंडी करत असत. त्यामुळे इंग्लंडमध्ये मोठी मागणी असताना चीनकडून चहाचा पुरवठा होत नसे. ही कोंडी फोडण्यासाठी ब्रिटिशांनी 17 व्या शतकात अफूच्या व्यापाराची शक्कल लढवली. चिनी राज्यकर्त्यांचा विरोध झुगारून ब्रिटिशांनी अफूचा व्यापार चोरी-छुप्या पद्धतीने सुरू ठेवला. याच काळात चीनला अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. शेवटी व्यापारक्षेत्रासाठी ब्रिटिशांनी घालून दिलेल्या मागण्या चीनला मान्य कराव्या लागल्या. चहा आणि अफू या दोन्ही घटकांनी चीनच्या अर्थव्यवस्थेवर बराच काळ राज्य केले आहे.
चहाचा प्राचीन संदर्भ
चहा हे ब्रिटिशांचे पेय मानले जात असले तरी तसे नाही. त्याचे मूळ प्राचीन चीनशी जोडले जाते. ख्रिस्तपूर्व 30 वे शतक ते ख्रिस्तपूर्व 21 वे शतक या काळात कधीतरी चीनमध्ये चहाचा शोध लागल्याचे सांगितले जाते. ख्रिस्तपूर्व 2737 मध्ये शेन नुंग हा चीनचा तेव्हाचा सम्राट होता. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर तो जंगलात राहत होता. दक्षिण चीनच्या दुर्गम भागात असताना एकदा तो एका औषधी वनस्पती असलेल्या झाडाखाली बसून गरम पाणी पीत असताना त्याच्या कपातील गरम पाण्यात त्या झाडाची काही पाने पडली. त्यामुळे पाण्याचा रंग आणि चवही बदलली. शेन नुंगला ते पाणी पिल्यामुळे एकदम तरतरी आली. त्याला ती चव खूप आवडली. पुढे त्याने गरम पाण्यात ती पाने घालून ते पाणी पिण्याची सवयच लावून घेतली. त्याने त्या परिसरात म्हणजे सिचुआन आणि युनानच्या डोंगररांगांच्या परिसरात त्या रोपांचा शोध घेतला. हीच रोपे चहाची रोपे म्हणून नावारूपास आली आणि आजच्या चहाचा जन्म झाला.
भारतातील चहाचे काही लोकप्रिय प्रकार
1) आसाम टी
आसाम राज्यात चहाचे सर्वाधिक मळे आहेत. येथे पिकणारी चहा आसाम टी नावाने ओळखली जाते. ब्रिटिशांनी आसाम राज्यापासूनच चहाला ओळख मिळवून दिली होती. आसाममध्ये चहाचे भारतातील सर्वात मोठे संशोधन केंद्र आहे. हे केंद्र जोरहाटमध्ये टोकलाईत वसले आहे. संपूर्ण भारत देशात आसाम ही एकच अशी जागा आहे; जेथे चहाचे पीक समतल जमिनीवर घेतले जाते. याच कारणामुळे आसाममध्ये उगवणार्या चहाच्या पत्त्यांचा स्वाद इतर ठिकाणच्या चहापेक्षा वेगळा आणि खास असतो. ब्रह्मपुत्रा नदीच्या खोर्याचा परिसर, कार्बी आणि काछर टेकड्यांच्या परिसरात चहाचे मळे आहेत.
2) दार्जिलिंग टी
संपूर्ण भारतात दार्जिलिंग प्रदेशातील चहा अतिशय प्रसिद्ध आहे. दार्जिलिंगमध्ये 1841 पासून चिनी चहाची रोपे उगवली जातात. वेगळ्या चवीमुळे दार्जिलिंग चहाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त असते. दार्जिलिंगमध्ये उगवणार्या चहाला संपूर्ण जगभरातून मोठी मागणी आहे. दार्जिलिंग चहाला जीआय (जीओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन प्राप्त झाले आहे. या प्रदेशातील 87 चहांच्या मळ्यांना हे मानांकन असून, त्यातून वर्षाकाठी सुमारे 10 हजार टन चहाचे उत्पादन घेतले जाते.
3) कांगडा टी
हिमाचल प्रदेशातील कांगडा भाग देखील चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात 1829 पासून चहाचे उत्पादन घेतले जाते. हिरवा आणि काळ्या रंगाची चहा येथे पिकवली जाते. कांगडा टी हा प्रकारदेखील दार्जिलिंग आणि आसाम टीप्रमाणे अतिशय लोकप्रिय आहे. या प्रदेशातील कांगडा आणि मंडी जिल्ह्यात सुमारे 2 हजार 63 हेक्टर क्षेत्रावर कांगडा टीचे उत्पादन घेतले जाते.
4) निलगिरी टी
निलगिरी टी हादेखील चहाचा लोकप्रिय प्रकार आहे. निलगिरी प्रदेशात एक खास प्रकारचे फूल उमलते. ज्याचे नाव कुरिंजी फूल असे आहे. हे फूल 12 वर्षांतून एकदा उमलत असल्याचे सांगितले जाते. या फुलाच्या सुगंधामुळे याठिकाणी उगवणार्या चहामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध आणि चव असते. ही चहा निलगिरी टी म्हणून प्रसिद्ध आहे. निलगिरी चहाला देखील जीआय मानांकन आहे. या भागात दरवर्षी सुमारे 92 दशलक्ष किलो चहा उत्पादित केली जाते. भारताच्या एकूण चहा उत्पादनापैकी सुमारे 10 टक्के वाटा निलगिरी चहाला आहे.