नेहा बाविस्कर
उन्हाळी काकडी लागवड व्यवस्थापन : काकडीचे अनेक फायदे आहेत, जसे की ती शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते, कारण त्यात 95% पाणी असते. काकडी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त आहे. उन्हामुळे होणारी त्वचादाह, मुरूम आणि लालसरपणा कमी करण्यासाठी काकडीचा थंडावा खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात काकडीची योग्य प्रकारे लागवड केली तर ती कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी फळभाजी ठरते.
लागवड
उन्हाळ्यात काकडीची लागवड करताना योग्य हवामान, पाणी व्यवस्थापन आणि पोषक घटकांचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य तंत्रांचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळवता येते. काकडीची लागवड मुख्यतः उन्हाळी हंगामासाठी जानेवारी महिन्यात केली जाते.
तापमान
काकडीसाठी 25°C ते 35°C तापमान आवश्यक असते. 16°C पेक्षा कमी तापमान किंवा थंड हवामानात काकडीची वाढ मंदावते. उष्ण आणि समशीतोष्ण हवामान काकडीसाठी उत्तम असते, कारण तिला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. उन्हाळ्यात ती चांगली वाढते. अत्यंत उष्णतेत, झाडांच्या भोवती मल्चिंग करणे फायदेशीर ठरते, कारण यामुळे मुळांचं तापमान नियंत्रित राहाते.
माती
काकडीसाठी हलकी ते मध्यम काळी, वाळूमिश्रित गाळाची किंवा सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध माती योग्य ठरते. मातीचा निचरा चांगला असावा, कारण पाणी साचल्यास मुळे सडू शकतात. पीएच पातळी 6.0 ते 7.0 दरम्यान असावी, ज्यामुळे झाडांना आवश्यक पोषक घटक सहजपणे मिळू शकतात. सेंद्रिय पदार्थांची पुरेशी मात्रा मातीमध्ये असल्यास काकडीची वाढ आणि उत्पादन अधिक चांगले होऊ शकते.
काकडीचे वाण
काकडीच्या विविध जाती उत्पादन, हवामान, आणि रोगप्रतिकारक क्षमतेनुसार निवडल्या जातात. मुख्यतः काकडीच्या काही महत्त्वाच्या सुधारित आणि हायब्रिड जाती खालीलप्रमाणे आहेत
पुसा उदय – जलद वाढणारी आणि जास्त उत्पादन देणारी जात.
पुसा संजीवनी – उन्हाळ्यासाठी योग्य, चांगल्या प्रतीची फळे देणारी जात.
सरथी – उष्ण हवामानासाठी उत्तम आणि रोगप्रतिकारक वाढविणारी जात.
ज्योती – उष्ण हवामानात चांगले उत्पादन देणारी जात.
खत व्यवस्थापन
लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट 8-10 टन प्रति एकर प्रमाणात जमिनीत मिसळा. नत्र (N), स्फुरद (P), आणि पालाश (K) यांचे प्रमाण 50:25:25 किलो प्रति एकर असावे. यामुळे झाडांना योग्य पोषक तत्वांची उपलब्धता सुनिश्चित होईल. पहिला डोस लागवडीपासून 20-25 दिवसांनी द्यावा आणि दुसरा डोस फुलोरा व फळधारणेच्या टप्प्यावर द्यावा.
पाणी व्यवस्थापन
काकडीला भरपूर पाणी लागते, विशेषतः उन्हाळ्यात. ठिबक सिंचन वापरणे अत्यंत फायदेशीर ठरते, कारण यामुळे झाडांना आवश्यक तेवढेच पाणी मिळते आणि पाण्याची बचत देखील होते. उन्हाळ्यात, एक दिवसाआड पाणी देणं योग्य असतं. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी मल्चिंग करणं आवश्यक आहे. तसेच, पाणी साचण्याची शक्यता असल्यास निचरा योग्य प्रकारे करणे महत्त्वाचं आहे, कारण निचरा न केल्यास मुळांचे सडण्याचा धोका वाढू शकतो.
रोग आणि त्यावरील नियंत्रण
भुरी : हा बुरशीजन्य रोग असून पानांवर पांढऱ्या रंगाचा पावडर सारखा थर दिसतो. त्यामुळे पानांचे वाळणे आणि उत्पादन कमी होते. नियंत्रणासाठी गंधक चूर्ण (Sulphur Dust) किंवा कार्बेन्डाझिम यांसारख्या बुरशीनाशकांची फवारणी करावी.
करपा : पानांच्या वरच्या भागावर पिवळसर ठिपके आणि खालच्या बाजूला जांभळट रंगाचा बुरशीसारखा थर तयार होतो. नियंत्रणासाठी मॅन्कोझेब किंवा मेटालॅक्सिल यांसारखी बुरशीनाशके फवारावीत.
मूळकुज : मुळे सडून झाडे अचानक वाळतात. हा रोग जास्त ओलसरपणामुळे होतो. यासाठी ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक जमिनीत मिसळावे.
फळकरपा : फळांवर पांढरे व मऊ डाग पडतात आणि फळे सडतात. नियंत्रणासाठी प्रोपिकोनाझोल किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यांसारखी बुरशीनाशके फवारावीत.
मुळावरील गळती : जमिनीच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आणि बियाण्यांना ट्रायकोडर्मा किंवा कार्बेन्डाझिम यांसारख्या बुरशीनाशक वापरावे.
काढणी :
काकडीची काढणी फळे कोवळे असतानाच काढावे त्यामुळे काकडीला बाजारात चांगला भाव मिळतो. काकडी पिकांचे तोडणी हे दोन ते तीन दिवसांमध्ये करणे आवश्यक आहे. काकडी ही लागवडीच्या 50 ते 60 दिवसानंतर काढली जाते. काकडीचे उत्पादन जाती व हंगामानुसार एकरी शंभर ते दीडशे क्विंटलपर्यंत येते.