दुष्काळात दाळमिलची साथ
नगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळ आहे.
मात्र तालुक्यातील दिघी येथील देविदास रामहरी इंगळे यांनी दुष्काळापुढे
हार न मानता त्यांनी शेती पद्धतीत बदल केले. विविध पीक पद्धती राबवत
त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले. कमी पाण्यात उत्पादन घेण्याची किमया
साधली. शेतीला दाळमिलची जोड देऊन आर्थिक स्त्रोत वाढवले. त्यासाठी
अत्याधुनिकता व तंत्रज्ञानाचा वापर करत बेसनपीठ तयार करणारे यंत्र,
पॉलिशर, ड्रायर आदी यंत्रे टप्प्याटप्प्याने खरेदी केल. दुष्काळी तालुक्यात
त्यामुळे इंगळे यांच्या शेतीची आणि दाळमील उद्योगाची चर्चा आहे.
यंदाच्या दुष्काळाच्या झळा राज्यातील अन्य शेतकर्यांबरोबर नगर जिल्ह्यातील दिघी
(ता. कर्जत) येथील देविदास रामहरी इंगळे यांनाही जाणवत आहेत. त्यांची सुमारे 26 एकर शेती आहे. त्यात विविध केळी, सिताफल, जांभूळ ही फळपिके, त्यात कलिंगड, भाजीपाला, वांगी अशी आंतरपीके घेतली. ऊसासह हंगामनिहाय पीकपद्धतीची रचना त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे हे कुटूंब पूर्वी शेतमजुरी करायचे. मात्र प्रयोगशील शेतीच्या जोरावर या कुटुंबाने आता शेतीत आर्थिक प्रगती साधली
आहे. इंगळे कुटुंबाकडे सुरवातीला वडिलोपार्जीत असलेल्या जमीन क्षेत्रासह नव्याने त्यांनी शेतजमीन घेतली आहे. सध्या त्यांच्याकडे प्रत्येकी दोन एकरात सिताफळ, जांभूळ, केळीची लागवड केली आहे. या फळबागेत कलिंगड व वांगी उत्पादन घेतले आहे.
बिकट परिस्थितीवर मात
देवीदास इंगळे यांच्या आई-वडिलांनी मजुरी केली. वडिलांनी काही काळ सालगडी म्हणून काम केले. देवीदास यांच्यावरही घरची जबबादारी पडल्याने दहावीनंतर शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे त्यांनी सेवा सहकारी सोसायटीत सचिव म्हणून त्यांनी
नोकरी स्वीकारली. सध्या त्यांच्याकडे कर्जत तालुक्यातील मलठण, नीमगाव
डाकू व पारेवाडी या तीन गावांच्या सोसायटीची जबाबदारी आहे. नोकरी असली
तरी शेतीकडे जराही दुर्लक्ष त्यांनी केले नाही.
उसाकडून फळबागेकडे
गावाशेजारच्या दिघी (ता.जामखेड) शिवारात वडिलोपार्जित चार एकरांत उसाचे चांगले उत्पादन घेतले. सोळा वर्षांपूर्वी सीना नदीवरून पाइपलाईन केली आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी सीताफळ लावले. त्यात कांदा, गवार व मिरची लागवड केली. जांभूळ बागेत सिमला मिरची व कलिंगडाचे आंतरपीक घेतले. दिघी परिसरात पूर्वी सीना नदीला मुबलक पाणी असायचे. त्यामुळे ऊस महत्त्वाचे पीक होते. या भागात पारंपरिक सरी पद्धतीने लागवड असताना इंगळे यांनी दोन एकरांत पट्टा पद्धतीने ऊस घेतला. आता
पाणीटंचाईमुळे दोन एकर ऊस कमी केला आहे. त्यांनी जळगाव येथे केळी लागवड
तंत्रज्ञानाचे पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले. जळगाव येथून ग्रँड नैन रोपे आणून मध्ये दोन एकरांत लागवड केली.
दाळमीलचा पर्याय शोधला
कर्जत तालुक्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तरीही इंगळे यांनी शेतीतील उमेद व सकारात्मक वृत्ती कायम ठेवली आहे. पाणी उपलब्ध नसल्याने सुमारे दहा एकर क्षेत्र त्यांना कोरडे ठेवावे लागले. यंदाही सुमारे आठ एकर क्षेत्राला पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र हताश न होता
उत्पन्नाचे विविध पर्याय शोधण्याचे प्रयत्न इंगळे यांनी सुरू ठेवले आहेत. विविध
पर्याय शोधताना आपली शोधकवृत्ती त्यांनी कायम जपली आहे. शेतीला पूरक
काहीतरी प्रक्रिया उद्योग करावा, असे त्यांना वाटत होते. कृषी प्रदर्शनाला
सातत्याने ते भेट देतात. त्यातूनच डाळमिल उद्योगाची कल्पना सूचली. त्यासाठी बुलढाणा, यवतमाळ, खामगाव, वाशिम या भागातील डाळमिल्स त्यांनी
पाहिल्या. या व्यवसायाचे अर्थकारण तपासले. संबंधित यंत्रे तयार करणार्या
व्यावसायिकांशी संपर्क साधला. सर्व अभ्यासाअंती अकोला येथून पाच
लाख रुपये खर्च करून आधुनिक डाळमील यंत्र खरेदी केले.
दाळीसह बेसनपीठ निर्मिती
दिवसाला सुमारे पाच टन अशी डाळमिलची क्षमता आहे. परिसरातील लोकांना हरभरा व तूर दाळ तयार करून देण्यासह मागणीनुसार अन्य ठिकाणीही डाळीचा पुरवठा ते करू लागले. हे करीत असताना बेसनपीठ तयार करण्याबाबत ग्राहकांकडून विचारणा होऊ लागली. मग वर्षभरातच साडेसहा लाख रुपये खर्च करून बेसनपीठ तयार करणारे यंत्रही मुंबईहून खरेदी केले. त्याची क्षमता दर दिवसाला दहा टन बेसनपीठ तयार
करण्याची आहे.
पॉलिशर, ड्रॉयरची खरेदी
तूर व हरभरा दाळ तयार होऊ लागली. पण डाळीला चकाकी येण्यास अडचणी येत
होत्या. मात्र बाजारपेठेत डाळीच्या मागणीवर त्याचा परिणाम होत होता.
साडेचार लाख रुपये खर्च करून पॉलीशर खरेदी केले. त्याची दर दोन तासाला
दोन टन पॉलिशींग करण्याची क्षमता आहे. दाळ तयार करण्यासाठी त्यातील आर्द्रता संतुलीत ठेवावी लागते. पावसाळ्यात ओलावा कमी करावा लागतो, तर उन्हाळ्यात कडक हरभर्याला भिजवावे लागते. दोन्हीही हंगामात अशा अडचणीत येत. त्यामुळे स्थानिक स्तरावर ड्रायर तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी कोलकत्याचे कारागिर बोलावण्यात आले. यंत्र तयार करण्यासाठी साडेतीन टन लोखंड लागले. ताशी एक टनापर्यंत तूर किंवा हरभरा त्याद्वारे सुकवता येतो. त्याला साडेतीन लाख रुपये खर्च आला. आणलेल्या बर्याच यंत्रांमध्ये अॅटोमेशन यंत्रणा आहे. एक कामगार यंत्र हाताळू शकतो. दाळ तयार करण्याच्या यंत्र पद्धतीत तूर, हरभरा तयार करण्यासाठी कडक
झालेल्या मालाला काहीसा ओलावा द्यावा लागतो. त्यासाठी यंत्राला वरच्या
बाजूस पाण्याची टाकी आहे. पॉलिशर यंत्राद्वारे पॉलिश झालेली दाळ पुढे
जाऊन थेट पोत्यात भरण्याची सोय आहे. एका मजुराद्वारेे शिलाईसह हे काम करता
येते. ड्रायर यंत्राला दोन वीजपंप आहेत. त्यांच्या आधारे तापमान नियंत्रित करणे व धूर बाहेर फेकण्याचे काम होते. उष्णता तयार करण्यासाठी इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जातो.
ग्रेडींग यंत्रही घेतले
नगर, बार्शी नंतर कर्जत या दुष्काळी भागात इंगळे यांनी पहिल्यांदाच अशी अत्याधुनिक यंत्रणा सुरू केली आहे. दाळनिर्मिती व्यतिरिक्त तूर, हरभर्यासाठी ग्रेडींग यंत्रही घेतले आहे. देवीदास यांनी मुलगा निखिल यांच्यावर दाळमील व्यवसायाची जबाबदारी दिली आहे. या व्यवसायात चारजणांना रोजगार देण्यात आला आहे. दाळीचे पॅकिंग देखील केले जाते. यंत्रांची देखभाल व अन्य बाबीसाठी मंगरुळपीर (जि.वाशीम) येथील रवी सुरसे ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत.
शेतकर्याकडून हमीदराने खरेदी
नगरसह राज्यातील अनेक भागांत गेल्यावर्षी तूर, हरभर्याचे भरघोस उत्पादन
झाले. त्यामुळे बाजारात हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी सुरू होती. शिवाय
शासनाने सुरू केलेल्या हमी केंद्रांवरही गर्दीमुळे हरभरा, तूर विक्रीस
अडचणी येत होत्या. इंगळे यांनी सरकारी हमीदराने तूर व हरभर्याची
खरेदी केली. त्यांची दाळ तयार करून विक्री केली. शेतकर्यांकडून कच्चा
माल खरेदी करताना क्विंटलमागे शंभर रुपये त्यांना अधिक दिले जातात. हमाली
व अन्य बाबींत पैसे कपात नसल्याने शेतकर्यांना त्याचा फायदा होतो. अकोला, गुलबर्गा, सुरत आदी ठिकाणी दाळीचा मागणीनुसार पुरवठा केला जातो.
दुष्काळाचा फटका बसला
नगर जिल्ह्यामध्ये यंदा तीव्र दुष्काळ आहे. कर्जत तालुक्यात तर गेल्या
चार महिन्यांपासून त्याच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. त्याचा डाळमील
उद्योगाला फटका बसला आहे. रब्बीत पेरणी नसल्याने हरभरा, तुरीचे उत्पादन
अत्यंत कमी किंवा होण्याची देखील शक्यता नाही. त्यामुळे यंदा बार्शी,
करमाळा येथून तूर, हरभरा किंवा व्यापार्यांकडून खरेदी करणे भाग पडले आहे
असे देवीदास इंगळे यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
दुष्काळातही दाळमील सुरूच
आमचा कर्जत तालुका दुष्काळी आहे. त्यामुळे या भागात दाळमील व्यवसाय
चालेल की, नाही याबाबत शंका होती. मात्र धाडस करून योग्य नियोजन करून
आम्ही त्यात पाऊल टाकले. ग्राहकांचा व शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद
मिळाला. आम्हाला व इतरांनाही रोजगार मिळाला. कुटुंबाला आर्थिक आधार
मिळाला. यंदा दुष्काळाचा परिणाम झाला असला तरी संघर्षातून दाळमील व्यवसाय
सुरू ठेवला आहे.
- देविदास रामहरी इंगळे
मो.नं. 7385452222