सांगलीच्या सेवानिवृत्त सैनिकाचा प्रयोग
स्टोरी आऊटलाईन…
- हलक्या मुरमाड यासह सर्वच प्रकारच्या जमीनीत येणारे पिक.
- कोरड्या दुष्काळात कमी पाण्यात तग धरणारे.
- लागवडीपासून 25 ते 30 वर्ष उत्पादन देणारे पीक.
- ड्रगन फळ आरोग्यासाठी अति उत्तम.
- मधूर गोडी असल्याने पोटभर खाता येणारे फळ.
- शेतक-यांना हमखास भरपूर आर्थिक उत्पन्न मिळवून देते.
सांगली- जिल्ह्याच्या जत तालूक्यातील आवंढी येथील सेवानिवृत्त भारतीय सैनिक अनिल भगवान कोडग यांनी भारत मातेच्या सरंक्षणार्थ सेवा बजावून सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर आपल्या शेतीत जिव ओतत तिच्यात पारंपरिक पिकापेक्षा नवख्या फळ पिकाची लागवड करुन शेतीला नवा आयाम दिला आहे. त्यांच्या कार्यावरुन त्यांना मजय जवान जय किसानफ हे वाक्य तंतोतंत लागू पडते आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात जत-आवंढी रस्त्यावरुन जाताना उत्तर दिशेस कोलंदपासून 2 कि.मी. अंतरावर चारी बाजूने डोंगर आणि आतमध्ये हे 3 हजार लोकसंख्या असलेले आवंढी गाव वसलेलं आहे. गाव परिसर चोहूबाजूने डोंगरानी वेढलेला आहे. गावाजवळून कोणतीही नदी वाहत नाही. येथील शिवारास धरणाच्या कालव्याचे पाणीही येत नाही. या भागातील कृष्णा नदीवर एक धरण आहे. त्या धरणाचे पाणी येथल्या परिसरातील शिवारास सिंचनासाठी मिळण्याकरीता कालव्याची कामे चालू आहेत. ती पूर्ण झाली नसल्याने शिवार कोरडवाहूच आहे. याच आवंढी गावात सर्वसामान्य शेतकरी कुटूंबात जन्मलेले अनिल कोडग हे 7 वी शिक्षणानंतर वर्ष 1980 ला भारतीय सैनिक दलात बेळगाव येथे भरती झाले. देश सेवेची त्यांना आवडही होती. भरतीनंतर त्यांनी पुणे, अहमदाबाद, गंगानगर, बडनेर, जम्मू-कश्मीरमधील पुंछ, कारगील, पाकिस्तान बॉर्डर येथे भारतीय सैन्यात देश सरंक्षणाची चोख सेवा बजावल्यानंतर 1997 ला सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले. यानंतरचे आयुष्य त्यांनी शेतीत घालवण्याचा द़ृढनिश्चय केला. आई सिताबाई, वडिल भगवान शंकर यांच्या सल्याने शेती करु लागले. त्यांना वडिलोपार्जित 5 एकर शेती होती त्यांनी आता आणखी 9 एकर स्वत: खरेदी केलीय. त्यात ते खरीपात ज्वारी, बाजरी, डाळिंब हे घ्यायचे. आजही ती पिके ते घेतातच. अनेक रोगांच्या प्रादुर्भावामुळे डाळिंब बागेतून उत्पन्न काहीच हाती येत नसल्यामुळे ती काढून टाकली आहे. पारंपरिक पिकपध्दतीतून खर्च जाता हाती अपेक्षीत असे उत्पन्न पडत नसल्याने ते कमी खर्चात कमी पाण्यात येणा-या पिकाच्या शोधात होते. अशातच त्यांना एक प्रसंग आठवला. ज्या वेळी ते सैन्यात सेवेत असताना एका सुट्टीच्या काळात त्यांचे सहकारी सैनिक मित्र ठाकूर यांच्या सोबत त्यांच्या कलकत्ता शहराजवळील गावी गेले असता त्यांना मित्राच्या घरी ड्रगन फळ दिसले. नंतर हे फळ मित्राच्या शेतीत पिकते असे सांगितल्यावर त्यांनी ड्रगन फळाची बाग आवार्जून पाहिली व या अनोख्या पिकाविषयी माहिती जाणून घेतली. याच प्रसंगाअधाराने त्यांनी आपल्या शेतीत ड्रगन फळ पिकाची लागवड करण्याचे ठरवून त्याची प्रत्यक्षात सुरुवातही केली. याकरीता शेतीत प्रथम विहीर-बोअरची उभारणी करुन घेतली.
असी केली ड्रगन फळाची लागवड
सुरुवातीला अडिच एकर जमिनीची मशागत केल्यानंतर त्यात अडिच फूट उंचीचे बेड केले. त्यानंतर 11 फूट रुंद आणि 7 फूट लांबी अंतरावर अडीच एकरात 1150 सिमेंटचे पोल रोवले. पोलाच्या टोकावर चार छिद्रे असलेल्या सिमेंटच्या खिडक्या बसवल्या. जेणेकरुन ड्रगन फळाची वेल फांदी खिडकीच्या छिद्रातून ओवून घेवून लोंबती सोडत जमीनीच्या दिशेने वाढवली जाते. संपूर्ण क्षेत्राला थिबक संच बसवण्यात आला. यानंतर पोलच्या बुंध्याशी चारी बाजूने एक फूट खोलीचे चार खड्डे खणून त्यात थोडा शेणखत टाकला. आणि जून 2014 ला पंढरपूरजवळील पिलीव येथील नर्सरीतून आणलेले ड्रगनची चारीत (खड्यात) प्रत्येकी एक रोप याप्रमाणे एका पोलच्या बुंध्याशी चार रोपे लागवड केली. त्यानंतर दुस-या दिवशी ठिंबक व्दारे पाणी दिले. अडीच एकरात 4600 रोपे लागली.एकूण 5 हजार रोपे आणली होती.
बागेचे संगोपन
ड्रगन फळाच्या वेलीला लागवडीपासून एक दिवसाआड ठिंबकने एक तास कृषि पंप चालवून पाणी दिले जाते.कधी कधी झाडाच्या वाढी अवस्थेनूसार दोन दिवस आड ते पंधरा दिवस आड करुन देखील ते पाणी देतात. फळे तोडणी केल्यानंतर बुंध्याशी मुळीच्या ठिकाणी समप्रमणात शेण खत पसरवून तो मातीने बुजवला जातो. ड्रगन फळझाड हे नैसर्गिक वनस्पती असल्याने त्याच्यावर कोणताही रोग पडत नाही. काटेरी असल्यामुळे सरंक्षणाचीही गरज नाही. वर्षभर फक्त पाणी देत राहणे एवढेच काय ते त्याची संगोपन करण्याचे कार्य आहे.
ड्रगन फळ विदेशी पिक
हे फळ पीक प्रामूख्याने विदेशातील थायलंड येथे पिकवल्या जाते. ते विदेशी फळ पिक असून काही वर्षापासून भारतात आले आहे. खायला जास्त गोडही नाही अन् जास्त आंबटही नाही. सममधुर स्वॉप्ट असे मानवी शरिराला आरोग्यवर्धक असल्याने त्याला आवडीने खाल्ले जाते. फळाचा रंग पांढरट लालसर असतो. आत मध्य राजगि-याहूनही बारीक काळ्या बिया असून गर अधिक असतो. एक फळ साधारणता 300 ते 700 ग्राम वजनाचे भरते. या फळाचे ज्युस,पल्प आदी उपपदार्थ तयार केले जात असल्याने सर्वत्र त्यास मोठी मागणी आहे. अलिकडच्या काही वर्षापासून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापुर, मराठवाडा, विदर्भ भागातही त्याची लागवड शेतकरी करीत आहेत. लागवड सामुग्रीसाठीचा सुरुवातीला अधिकचा खर्च वगळता हे पीक तिस वर्ष फळे देते. या कालावधीत शेतक-यांना कमी पाण्यात कमी खर्चात कमी मनुष्य बळात लक्षावधी रुपये मिळवून देणारे पीक असल्याचे कोडग यांनी सांगितले.
उत्पादन व मिळालेले उत्पन्न
जून महिन्यात ड्रगन फळ पिकाची लागवड केल्यानंतर पूढे एक वर्ष जोपासना झाल्यावर बरोबर पुढील वर्षाच्या जून मध्ये वेलीच्या काट्यातून फुले लगडून फळधारणा होते. फुल धारणेपासून 45 दिवसाला फळ परिपक्व होवून काढणीस येते. जून ते डिसेंबर या महिन्याच्या कालावधीत त्यास 45 दिवसाच्या गॅप नंतर परत दुसरा बहर येतो. डिसेंबरपासून पुढे जूनपर्यंत फळे देणे बंद असते. वेलींची वाढ व विस्तार जस जसा वाढत जाईल तसे उत्पादन वाढत जाते.
काही वेळा वेल घनदाट झाल्यावर तो जमीनीवर टेकू नये म्हणून कटींग केली जाते. कोडग यांना पहिल्या वर्षी 2017 ला अडीच एकरात ड्रगन फळाचे अडीच टन, दुस-या वर्षी 2018 ला 9 टन म्हणजे एकूण 11 टन 500 किलो उत्पादन झाले. ती फळे हैद्राबाद, बिजापूर, सांगली, पुणे या ठिकाणी त्यांनी प्रतिकिलो 125 रुपये दराप्रमाणे विक्री केली. फळ विक्रीतून एकूण 11,50,000/ (अकरा लाख पन्नास हजार रुपये)मिळाले यातून रोपे, ठिंबक, सिमेंट पोल, खिडक्या, मजूर आदी मिळून 9,25,000/(नऊ लाख पंचविस हजार रुपये) उत्पादन खर्च आला तो वगळता त्यांना 2,25000/ दोन लाख पंचविस हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले असून यापूढे त्यात वाढ होणार आहे.
अडीच एकरात नवीन लागवड
शेतकरी अनिल कोडग यांनी दीड वर्षापूर्वी अडीच एकरात त्याच पध्दतीने ड्रगन फळ पिकाची नव्याने लागवड केली आहे. यात फरक इतकाच आहे की, वेल फांद्या पोलवरुन जमीनीकडे वळवण्यासाठी सिमेंटच्या खिडकी ऐवजी लोखंडी तार बांधला आहे. या नवीन अडीच एकरात एक हंगाम फळ उत्पादन हे दिड टन निघाले आहे.त्याच्या विक्रीतून दिड लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. आता त्यांच्याकडे पाच एकरवर ड्रगन फळाची बाग आहे.
रोपवाटीका उभारणी
ड्रगन फळ उत्पादनाबरोबरच ते ड्रगन पिकाची रोपे निर्मीती देखील करीत आहेत. वेलींच्या फांद्या कट करुन त्याचे काटे काढून 6 इंचची कांडी करुन ती एका औषधाच्या द्रावणात बुडवून मातीच्या पॉलिथिन पिशवीत लागवड करुन त्यापासून रोपांची निर्मीती केली जाते. तयार प्रती रोप 20 रुपये प्रमाणे ते शेतक-यांना नवीन लागवडीकरीता विक्री करतात.
शेतकरी /संपर्क
अनिल भगवान कोडग
आवंढी,ता.जत,जि.सांगली.
मो.9763462689
ड्रगन फळ हे पीक महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकरी लागवड करीत आहेत. हे पीक नैसर्गिक काटेरी वनस्पती असल्याने त्याच्या जवळ कोणी जात नसल्याने स्वतःचे सरंक्षण स्वतःच करते. कोणताही रोग येत नाही. दुष्काळातही कमी पाण्यात तग धरुन टिकते. मी केवळ अर्धा ईंच बोअरच्या पाण्यावर ही बाग जोपासत आहे. सुरुवातीला तिन वर्ष कोणतेही आंतरपीक घेता येते. अतिशय कमी खर्चात आणि अल्प पाण्यात पीक येते. 25 ते 30 वर्ष सतत फळे उत्पादन देवून लक्षावधी रुपये उत्पन्न देणारे आहे. सर्व शेतक-यांनी ड्रगन फळ पिकाची लागवड केली तर त्यांना हे पीक नक्कीच प्रगतीकडे नेते.
अनिल भगवान कोडग
ड्रगन फळ उत्पादक शेतकरी
आवंढी जि सांगली.