जळगाव : शेवंती (Shevanti) हे फूल गुलाब नंतर सगळ्यात महत्त्वाचे फुल आहे. शेवंती या फुलाला फुलांची राणी असे म्हणतात. कारण या फुलाचा रंग, आकार आणि उमलण्याची पद्धत इतर फुलांपेक्षा फार वेगळी आहे. शेवंतीच्या फुलांचा उपयोग हार, गुच्छ, वेण्या बनविण्यासाठी तसेच फुलदाणीत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. महाराष्ट्रात विशेषत: दसरा, दिवाळी, नाताळ आणि लग्नसराईमध्ये या फुलांना मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतून प्रचंड प्रमाणावर मागणी असते.
जेशेवंतीचे फुल लोकप्रिय असून सर्वाना आवडणारे आहे. शेवंती वनस्पतीला इंग्रजीमध्ये क्रायसॅन्थेमम मल्टीफोलियम असे म्हणतात. ते मूळ पूर्व आशिया आणि ईशान्य युरोपमधील आहेत. बहुतेक प्रजाती पूर्व आशियामधून उगम पावतात, आणि विविधतेचे केंद्र चीनमध्ये आहे. चला तर मग जाणून घेऊया शेवंती या फुला विषयी सविस्तर माहिती.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
जमीन व हवामान
शेवंती पिकासाठी मध्यम ते हलकी जमीन उत्तम ठरते. पावसाळ्यात जास्त काळ पाणी टिकून रहिल्यास हे पीक खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्तम निचरा करणारी जमीन निवडावी. शेवंती पिकासाठी भारी जमीन निवडू नये. शेवंती पिकास फुले येण्यासाठी कमी कालावधी, कमी तापमान लागते. सुरवातीच्या काळात सूर्यप्रकाश आवश्यक असतो. शेवंती पिकाची वाढ होतांना २० ते ३० अंश से. आवश्यक आहे. शेवंती फुले येण्याच्या कालावधीत १० ते १६ अंश. से तापमानाची आवश्यकता असते. हलका व मध्यम पाऊस शेवंती पिकास मानवतो. जोरदार पाऊस पडल्यास शेवंती पिकाचे नुकसान होते. दीर्घकाळ पाऊस पडल्यास शेवंती पिकास रोगाचा प्रादुर्भाव होतो.
शेवंती लागवडीपूर्वी जमिनीची तयारी कशी करावी ?
लागवड करण्याआधी सर्वप्रथम जमीन उभी – आडवी नांगरून व कुळवून भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीच्या उताराला आडव्या 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या सोडून वाफे तयार करावेत. लागवडीसाठी मागील हंगामातील शेवंती पिकाच्या काश्या वापराव्यात. लागवडही सरीच्या दोन्ही बाजूस 30 सेंटीमीटर अंतरावर बगलेत करावी. लागवड शक्यतो दुपारचं ऊन कमी झाल्यावर करावी. म्हणजे रोपांची मर होत नाही.
लागवड
पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेवंती लागवड लवकर, उशिरा करता येते. लागवडीची वेळ व फुले येण्याचा काळ लक्षात घेऊन या पिकाची लागवड करावी. महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता असेल तर एप्रिल – मे महिन्यात शेवंती पिकाची लागवड करता येते. पाण्याची उपलब्धता नसेल तर जून – जुलै महिन्यात या पिकाची लागवड करता येते.

जाती
शेवंती पिकाच्या अंदाजे १५ ते २० हजार जाती आहेत. त्यांपैकी ५०० जाती भारतात आढळतात.
महाराष्ट्रात राजा, रेवडी, शरदमाला, बग्गी, सोनाली तारा आदी जाती आढळतात.
पाणी व्यवस्थापन
उन्हाळ्यात लागवड करत असाल तर पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. पाऊस सुरु होईपर्यंत ५ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देत राहावे. फुले येण्याच्या काळात पिकांवर पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. हिवाळ्यात १० ते १५ दिवसांनी आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. पाणी जास्त काळ टिकून राहिल्यास पिकास रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा निचरा होईल याची व्यवस्था करावी.
आवश्यक खते
शेवंतीच्या उत्तम वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पन्नासाठी लागवडीपूर्वी जमीन तयार करतानाहेक्टरी 25 ते 30 टन शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्यावेळी फॅक्टरी 150:200:200 किलो अनुक्रमे नत्र स्फुरद व पालाशतर लागवडीनंतर एक ते दीड महिन्यांनी दीडशे किलो नत्र हेक्टरी याप्रमाणे द्यावे.
कीड
मावा व फूलकिडे :
लक्षणे – शेवंतीवर मावा व फूलकिडे या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या किडी पाने व फुलांना उपद्रव करतात, त्यामुळे फुलांची गुणवत्ता बिघडते.
नियंत्रण – त्रिकाल (युनिवर्सल बायोकॉन) – १ मिली प्रति लिटर पाणी.
पाने गुंडाळणारी कोळी :
लक्षणे – पानाच्या खालच्या बाजूने जाळ्या तयार करुन पाने गुंडाळणारी कोळी कीडही आढळते.
नियंत्रण – पाण्यात विरघळणारे गंधक तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
अस्वल अळी :
लक्षणे – अंगावर केस असणार्या अस्वल अळीचा प्रादुर्भाव शेवंतीवर पावसाळ्यात आढळतो. ही कीड पाने खाते व पिकाचे मोठे नुकसान करते.
नियंत्रण – क्विनॉलफॉस – २मिली प्रति लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी.

रोग
पानांवरील ठिपके :
लक्षणे – हा रोग पावसाळी दमट हवामानात आढळतो. या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीलगतच्या पानांवर होतो. पानांवर काळपट तपकिरी गोलाकार ठिपके पडतात. ते हळूहळू मोठे होतात. परिणामी, संपूर्ण पान करपते. या रोगाचा प्रसार बुंध्याकडून शेंड्याकडे होत जातो. दुर्लक्ष झाल्यास कळ्या व फुलेदेखील या रोगाला बळी पडतात.
नियंत्रण – रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी मॅंकोझेब (एम-४५) – ५००ग्रॅम प्रति २००लिटर पाणी किंवा कार्बेंडाझिम (बावीस्टीन) – २५०ग्रॅम अधिक क्लोरोथॅलोनील २५०मिली प्रति २००लिटर पाणी यापैकी बुरशीनाशकांची आलटून पालटून गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
आंतरमशागत
पीक तणमुक्त राहील याची काळजी घ्यावी. वेळोवेळी निंदणी करावी जेणेकरून जमीन भुसभुशीत राहून पिकांची चांगली वाढ होईल. लागवडीनंतर चौथ्या आठवड्यानंतर शेंड्या खुडण्याचे काम करावे. शेंड्या खुडल्याने अधिक फूटवे फुटून उत्पादनात वाढ होते.
काढणी
शेवंतीचे फुल पूर्ण उमलल्या नंतर त्याची काढणी करावी. सूर्योदयापूर्वी या फुलांची काढणी करावी. फुले उशिरा काढल्यास त्यांचा रंग फिका पडून वजन कमी भरते. जातीनुसार लागवडीनंतर ३ ते ५ महिन्यांनी काढणी करावी.
उत्पादन
हेक्टरी ७ ते १३ टनांपर्यंत सुट्या फुलांचे उत्पादन मिळते. फुलांची पॅकिंग बांबूच्या टोपल्यात किंवा पोत्यात करावी. लांबच्या बाजारपेठेसाठी बांबूच्या टोपलीचा तर जवळच्या बाजापेठेसाठी पोत्याचा वापर करावा. शेवंती फुलाची वाढती मागणी पाहता याचे उत्पादन घेणे फायद्याचे ठरते.
औषधी गुणधर्म
शेवंती फुल हे एक औषधी वनस्पती मानली जाते. यामुळे अनेक रोग चांगले होतात. त्यापैकी शेवंती फुलाचा चहा पिल्याने उत्तम आरोग्य फायदे आहेत. जसे की तुमची त्वचा बरी होते, आणि तुमच्या मज्जातंतू शांत होतात. तसेच शेवंतीचा उपयोग छातीत दुखणे, डोकेदुखी, ताप आणि उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी केला जातो. यामुळे आपले शरीर हे निरोगी व चांगले राहते.
शेवंती फुलामुळे मळमळ होणे थांबते आणि चक्कर येण्याची काळजी घेण्यासाठी देखील वापरले जाते. या फुलात भरपूर जीवनसत्त्वे आढळून येतात. विशेषत: यामध्ये व्हिटॅमिन बी असते, आणि डोळ्यांसाठी खूप चांगले असते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇