अलीकडे शेती ही खूपच खर्चिक झाली असून त्या तुलनेने उत्पादन कमी होत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे असते. मात्र शेतीला अनावश्यक खते देऊन उत्पादन खर्च वाढतो. मात्र रावेर तालुक्यातील गहूखेडा येथील अल्पशिक्षित पण अनुभवी शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी किमान उत्पादन खर्चातून शेती भरपूर उत्पन्न आणि उत्पादन देणारीही होऊ शकते हे सिद्ध केले आहे.रावेर तालुक्यातील तापी नदीच्या काठावर असलेल्या गहूखेडा गावातील तुलनेने कमी शिकलेले शेतकरी ज्ञानेश्वर चिंतामण पाटील यांनी आपल्या मागील पंधरा-वीस वर्षांच्या शेती उत्पादनात किमान खर्चात अधिकाधिक उत्पन्न घेण्याचा उत्तम मार्ग स्वतः विकसित केला असून अन्य शेतकर्यांनाही ते त्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. अतिशय कमी खर्चाच्या सोयाबीन आणि धणे या पिकांच्या उत्पादनाबरोबरच त्यांनी केळी लागवड केल्यावर ल कमी खर्चात निर्यातक्षम केळीची तीन वेळा कापणी केली आहे.
याबाबत श्री चिंतामण पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांची शेतीशी असलेले निष्ठा व्यक्त झाली. ज्ञानेश्वर पाटील आणि त्यांचे लहान बंधू देविदास चिंतामण पाटील यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांच्याकडे स्वतःची सुमारे 8 एकर इतकी शेतजमीन असून अन्य शेतकर्यांची सुमारे 20/25 एकर इतकी जमीन ते नफ्याने करतात. त्यांचे वडील चिंतामण पाटील यांच्याकडूनच त्यांना एकत्रित कुटुंबाचा वारसा, संस्कार आणि आदर्श शेतीचेही धडे मिळाले आहेत. दोन्ही पाटील बंधूंचे शिक्षण अवघे सातवी आठवी इतकेच झाले आहे. पण शेतीतील प्रत्यक्ष अनुभवाचा फायदा घेत त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग तंत्रज्ञानाच्या आधारे केले आहेत.
केळीची तीन वेळेस कापणी
रावेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात आणि राज्यातही केळीची एकदा लागवड केल्यावर काही शेतकरी फक्त एकदाच कापणी करून नंतर पुन्हा केळी लागवड करतात तर काही शेतकरी दोन वेळा केळीची कापणी करतात. ज्ञानेश्वर पाटील यांनी मात्र या सर्वांच्या पुढे जाऊन केळीची एकदा लागवड केल्यावर तीन वेळेस त्याची कापणी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. केळीला प्रत्येक वेळी फक्त आठच फण्या ते ठेवत असल्याने केळीची रास 20-22 किलोच्या आसपास असते. मात्र खर्च अतिशय कमी असल्याने आणि केळीचा दर्जा हा निर्यातक्षम असल्याने ही शेती त्यांच्यासाठी चांगलीच फायदेशीर ठरते.अन्य शेतकर्यांना केळीच्या प्रती खोडामागे किमान 90 ते 100 रुपये खर्च येत असताना ज्ञानेश्वर पाटील यांना सुरुवातीला 60 ते 65 रुपये खर्च येतो. दुसर्यांदा आणि तिसर्यांदा केळीचे उत्पादन घेत असताना त्यांचा खर्च आणखीच कमी म्हणजे सुमारे 25 ते 30 रुपये प्रती खोड इतका कमी होतो.
सोयाबीनचे उत्पादन
आपल्या शेतात केळी लागवड करण्याआधी ज्ञानेश्वर पाटील सोयाबीनची लागवड करतात. सोयाबीनला कसलीही खते द्यावी लागत नाहीत. बियाणेही घरचेच असते. केवळ एक वेळेस फवारणी करून त्यांना सोयाबीनचे चांगले उत्पन्न मिळते. सोयाबीनच्या उत्पादनामुळे शेतजमीन भुसभुशीत होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. यानंतर ज्ञानेश्वर पाटील आपल्या शेतात धण्याची लागवड करतात. धने लागवड करताना एका एकरासाठी सुमारे 20 किलो इतके बियाणे लागते. गंधकाची मात्रा एकरी 30 किलो एवढी ते वापरतात. रोटावेटर आणि पेरणी यासाठी एकत्रितपणे एकरी 2100 रुपये इतका खर्च येतो. म्हणजे प्रत्यक्षात एका एकरासाठी 5 ते 7 हजार रुपये खर्च होत असताना 8-9 क्विंटल धण्याचे उत्पादन येते. त्यावेळेस सुमारे साडेबारा ते तेरा हजार रुपये क्विंटलने त्याची विक्री करता येते. केवळ 90 दिवसात धणे लागवडीतून त्यांना मोठा नफा मिळतो.
धणे लागवडीतून एक फायदा आणखी असा होतो की गावातील मजुरांना कामही मिळते. धणे लागवडीपासून ते कापणीनंतर धणे ठोकून ते पोत्यात भरेपर्यंत सर्वच कामे मजुरांच्या साहाय्याने केली जातात. त्यामुळे गावातील स्थानिक मजुरांना पुरेसा रोजगारही देता येतो. उत्पादन झालेल्या धण्याची विक्री ते कर्नाटक किंवा अहमदनगर येथील बाजारपेठेत करतात. काही वेळेस तेथील व्यापारीच थेट त्यांच्या गावात येऊन धणे खरेदी करतात. धणे लागवड आणि उत्पादनातील त्यांचे यश पाहता तालुक्यातील असंख्य शेतकरी आता त्यांच्याकडून धणे लागवडीचे मार्गदर्शन घेत आहेत. सुरुवातीला त्यांनी आपल्या शेतात 20 एकर इतकी लागवड त्यांनी एकट्याने केली होती आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोरगव्हाण, तांदलवाडी, निंबोल, उटखेडा, कुंभारखेडा आदी परिसरात सुमारे 400 एकर धण्याची लागवड झाली आहे.
कपाशीच्या उत्पन्नातही अग्रेसर
ज्ञानेश्वर पाटील यांनी धणे, केळीसह कपाशीचेही चांगले उत्पादन घेतले आहे.प्रती एकर सुमारे 20 क्विंटल इतके उत्पादन त्यांनी कपाशीचे घेतले. मागील वर्षी म्हणजे 2021-22 मध्ये त्यांच्या शेतातील कपाशीच्या एका झाडाला सुमारे 200 कैर्या लागल्या होत्या. ही कपाशी बघण्यासाठी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी लांब लांबचे शेतकरी देखील त्यांच्याकडे येत असत. सध्याच्या काळात बोंडअळी मुळे कपाशीचे नुकसान होते म्हणून फरदड कापूस घेण्याचे बंद केले आहे असे त्यांनी सांगितले. सध्या मिळणारा 6-7 हजार रुपये क्विंटल हा भाव समाधानकारक वाटत असला तरी उत्पादन खर्च पाहता कपाशीला 8 ते 9 हजार रुपये क्विंटल भाव मिळावा अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.
सोयाबीन लागवड देखील श्री पाटील किमान खर्चात करतात. सुमारे 18-20 एकर इतकी सोयाबीन लागवड ते दरवर्षी करतात. त्यासाठी एकरी 30 किलो म्हणजे सुमारे 4 हजार रुपयांचे बियाणे लागते. केवळ एकदा अळ्यांसाठी फवारणी करावी लागते त्याचा खर्च सुमारे 2 हजार रुपये एकरी इतका येतो. शेतीची मशागत, कोळपणी, रोटावेटर यासाठी एकरी 2100 रुपये, सोयाबीनची काढणी आणि मळणी यंत्रातून मळणी यासाठी एकरी सुमारे 3 हजार रुपये असा एकूण सुमारे 11 हजार 500 रुपये इतका खर्च येतो. एकरी 8 ते 10 क्विंटल इतके उत्पादन मिळते. त्यावेळी 4300 रुपये क्विंटल इतका किमान भाव गृहीत धरला तरीही त्यातूनही चांगले उत्पादन व उत्पन्न त्यांना मिळते. सोयाबीनच्या उत्पादनामुळे जमिनीचा पोत सुधारतो. कुठल्याही खताची त्यासाठी गरज नसते. या पिकाच्या मुळांना खाली नत्रयुक्त गाठी आल्याने पुढील पीक जोमदार येते असा आपला अनुभव असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर पाटील त्यांच्या शेतातील कपाशीचे पीकही इतक्या कमी उत्पादन खर्चात घेतात की त्याची दखल कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी घेतली आहे. 18 ते 20 एकर कपाशी लागवड ते दरवर्षी करतात. नांगरणी 1500 रुपये, रोटावेटर 1200 रुपये, सर्या पाडणे 700 रुपये, बियाणे 1050 रुपये, खते 4 हजार रुपये, फवारणी 3 हजार रुपये, निंदणी 1500 रुपये, वेचणी 7 हजार रुपये असा कपाशीला सुमारे 20 हजार रुपये एकरी खर्च येतो. एकरी 9 ते 12 क्विंटल इतके उत्पादन मिळते. किमान 6 हजार रुपये भाव धरला तरीही एकरी सुमारे 80/85 हजार रुपये उत्पादन चार महिन्यात कपाशीतून मिळते.
उद्योग धंद्यात कुठलाही उद्योजक उत्पादनाला लागणारा खर्च कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतो. उत्पादन खर्च जितका कमी तितका नफा अधिक मिळतो. हेच तत्व ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या शेतीमध्ये अमलात आणले आहे. शेतीमालाचा भाव आपल्या हातात नाही त्यामुळे उत्पादन खर्च कमीत कमी करून अधिकाधिक उत्पन्न आणि उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न हा अन्य शेतकर्यांसाठी ही अनुकरणीय असाच आहे.
शेतीतून मिळणारा पैसा शुद्ध
ज्ञानेश्वर पाटील यांच्या कुटुंबावर वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीचा मोठा पगडा आहे. त्यांचे कुटुंब शाकाहारी असून सात्विक आचार विचाराबाबतही ते आग्रही असतात. शेतीतून मिळणारा पैसा हा शुद्ध असतो, त्या घामाच्या आणि कष्टाच्या पैशातून मिळणारे समाधान हे अनमोल असते. बँकेत कितीही पैसे असले तरी त्यातून कमी समाधान मिळते पण शेतकर्याचे घर धान्याने आणि शेतीमालाने भरलेले असले तर ते खरे समाधान असे त्यांचे म्हणणे आहे. ऋषी आणि कृषी संस्कृतीमुळे एकमेकांना सहकार्य करण्याचा संस्कार शेतकरी आणि शेतमजूर बांधवांवर होतो. वाडवडिलांपासून मिळालेले चांगले संस्कार पुढील पिढीला देऊन ती सुसंस्कारित करण्यावर त्यांचा भर आहे.