मान्सून पूर्व कापूस लागवडीला सुरुवात झाली असून, बरेच शेतकरी बीज प्रक्रिया करीत नाहीत,बीज प्रक्रिया केल्यामुळे खूप फायदे होतात. कंपनी कडून आलेल्या बियांण्याला गौचो सारख्या औषधांची बीजप्रक्रिया केलेली असते,आपण ते बियाणे लागवड करतो. आपल्या पिकावर कमी रोग पडावेत, तसेच नत्र, स्फुरद, पालाश स्थिरीकरण व विरघडवण्यासाठी विविध प्रकारच्या जिवाणू खतांची प्रक्रिया करावी.त्यात ऍझोटोबॅक्टर,रायझोबियम, पीएसबी, विविध प्रकारची बुरशी नाशके यांची बीज प्रक्रिया केल्यामुळे काय फायदे होतात व कोणत्या कोणत्या जिवाणूंची व कशी,कोणत्या क्रमाने बीजप्रक्रिया करावी या विषयीची माहिती आपण आज पाहू.
शेतकरी बंधूनी शेती करताना शेतीचे सर्व प्रकारचे व्यवस्थापन / नियोजन अत्यन्त काटेकोर पणे केले पाहिजे. शेती व्यवसायात बियाण्याला असाधारण महत्त्व आहे.बियाणे प्रक्रिया करणे का? गरजेचे आहे ते खालील माहिती वरून आपल्या लक्षात येईल. बियाणे हा शेतीमधला पहिला प्रमुख घटक आहे. त्यामुळे उत्तम उगवणशक्ति असलेले, चांगल्या प्रतीचे, सुधारीत व किड , रोगांपासुन मुक्त असलेले बियाने वापरावे. पिकांमध्ये रोगाची निर्मीती सर्वसाधारणपणे बिजांमार्फत, जमिनीमार्फत व हवेमार्फत होत असते. यामध्ये वेगवेगळे घटक रोगप्रसारण करण्याकरीता भुमीका बजवतात. जसे हवा, कीटक, शेतीचे साधने इ. बिजांमार्फत अनेक हानीकारक रोगजंतुंचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्रसार होतो. बिजांमार्फत होणाऱ्या रोगांमुळे शेतीची प्रत खालावते. अंकरुन न झाल्यामुळे रोपांच्या संख्येवर विपरीत परीणाम होतो, दुय्यम रोगांचा फैलाव होण्यास मदत होते, परिणामी उत्पादन घट होते, तसेच दुषित बियाण्याचा आकारमान व रंग बदलतो. अशा बियाण्या पासून उत्पादित शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. तेलवर्गीय बियाण्यामधील तेलाचे प्रमाण कमी होते. बिजासोबत जुळलेले सुक्ष्म जिव, प्रती जैविके/ टॉकझिनस निर्माण करतात. असे बियाणे पेरण्यास तसेच खाण्यास अयोग्य असते. बियांना मार्फत पसरणारे रोग उभ्या पिकात दुय्यम रोगाचे फैलाव करतात. त्यामुळे नुकसानिची पातळी वाढते. पीकसंरक्षणाचा खर्च वाढतो. अशा वेळेस बियाण्याद्वारे प्रसारण होणाऱ्या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी वेळीच उपयोजना करणे महत्वाचे आहे. सर्वसाधारणतः बियाण्याच्या मार्फत पिकांवर 3 प्रकारे रोग येतात. बियाण्याच्या बाह्य पृष्ठभागावर रोगकारक सुक्ष्म जिव असतात
बियाण्यांच्या अंतर्गत भागात रोगकारक सुक्ष्म जीव.
रोगकारक बीज फळे, हलके बी, रोगट बी चांगल्या बियाण्यांमध्ये अनवधानाने मिसळले जाणे.
बियाणद्वारे उदभवणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया हा कमी खर्चाचा उपाय आहे. यावरुन बियाणे प्रक्रियेचे महत्व आपल्या लक्षात येईल, या अनुषंगाने शेतकरी बांधवांना आवाहान करण्यात येते की, कोणतेही बियाणे बिजप्रकिया केल्याशिवाय पेरु नये.
बिजप्रक्रिया म्हणजे काय ?
बियाणे जमिनीत पेरणीपुर्वी जमिनीतुन किंवा बियाण्यातुन पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढवीण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळी जैविक व रसायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते. याला बिजप्रक्रिया असे म्हणतात.
बिजप्रक्रियेचे फायदे
* जमिनीतुन व बियाणाद्वारे पसरणारया रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
* बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
* रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.
* पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
* कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मकउपाय करून पेरणी करता येते.
जिवाणु संवर्धकाची बिजप्रकिया
250 ग्रॅम जीवाणु सवर्धकाचे पाकिट 10 ते 15 किलो बियाण्यास वापरावे.
1 लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गुळ टाकुन द्रावण तयार करावे.
द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जीवाणु संवर्धन टाकुन बियाण्यास हळुवारपणे लावावे किंवा जीवाणु संवर्धकाचा लेप बियाण्यावर समप्रमाणात बसेल व बियाण्यांचा पृष्ठभाग (साल) खराब होणार नाही , याची काळजी घ्यावी.
बियाणे ओलसर करुन जीवाणू संवर्धन करणारे जिवाणू बियाण्यास चोळावेत.
नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे .
अशी बिजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांची पेरणी ताबडतोब करावी त्यामुळे जमिनीतुन सेंद्रीय पदार्थ कुजवून जमीन सुधारण्यास मदत होते.
जीवाणू संवर्धन बिज प्रक्रियेबाबतची काय दक्षता घ्यावी
जीवाणू संवर्धन प्रक्रिया ही बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांची प्रकिया केल्यानंतर करण्यात यावी.
जीवाणु सवर्धके लावण्यापुर्वी जर बियाण्यास किटकनाशकाचे, बुरशीनाशके, जंतुनाशकाचे इ. लावलेले असतील तर जीवाणु संवर्धन नेहमीपेक्षा दीडपट जास्त प्रमाणात लावावे .
रायझोबियम जीवाणु संवर्धनाची प्रक्रिया पाकीटावर नमुद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गट समुहास करावी.(एकदल,द्विदल, व व्यपरी पिके)
ट्रायकोडर्मा जैविक बुरशिनाशक सोबत रायझोबियम , अझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणु या जीवाणु संवर्धकाची बिजप्रक्रिया करता येते.
रासायनिक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करणे
बुरशीनाशकाच्या द्रावणात बी भिजवणे : प्रथम 100 किलो बियाण्यामध्ये 1 लिटर पाणी टाकुन या प्रमाणात भांडयात एक मिनीट घोळुन ओलसर करावे. नंतर त्यात बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात टाकुन पुन्हा हे बियाणे मिश्रण कोरडे होइपर्यत ही घोळण्याची प्रक्रिया चालु ठेवावी. मोठया प्रमाणावर बियाणे प्रक्रिया करावयाची झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडी वाढ करावी, जेणेकरुन बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिकटेल ,त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलित वाळवुन पेरणीसाठी वापरावे.
बियाण्यास बुरशीनाशकाची भुकटी/ पावडर चोळणे, बियाणे प्रक्रिया शिफारशीमध्ये दिलेल्या शिफारशींनुसार 1 किलो बियाण्यास लागणाऱ्या बुरशीनाशकाचे प्रमाण घेऊन बियाण्यास चोळावे. त्यापुर्वी बियाणे पाण्याचा शिंफडा मारून ओले करुन घावे.
अशी प्रक्रिया करताना. हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत. बुरशिनाशकाची घट्टसर द्रावणाची प्रक्रिया करावी. ही प्रक्रिया मशिन किवा यंत्राद्वारे करावी, प्रथमतः 100 किलो बियाण्यामध्ये 1 लिटर !पाणि टाकुन ते ओलसर बियाणे बिजप्रक्रिया ड्रममध्ये घ्यावे, नंतर त्यात बुरशिनाशके दिलेले प्रमाणात टाकुन 30 ते 40 वेळा फिरवावे. बियाणे मिश्रण कोरडे होइपर्यत ही घोळण्याची प्रक्रिया चालु ठेवावी . मोठया प्रमाणावर बियाणे प्रक्रिया करावयाची झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी, जेणेकरुन बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिटकेल, त्यानतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलित वाळवुन पेरणीसाठी वापरावे.
रासायनिक बुरशीनाशकाची बिज प्रक्रियेबाबत काय काळजी घ्यावी
बियाणे प्रक्रियेसाठी मातीचे किंवा प्लॅस्टिक भांडयांच्या वापर करावा. या भांडयांचा वापर अन्न शिजवण्यासाठी करु नये.
बीज प्रक्रियेनंतर भांडयाचे झाकण किंवा प्लॅस्टिक पिशवीचे तोंड लगेच उघडु नये
बीज प्रक्रियेनंतर शिल्लक राहीलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरु नये.
बीज प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी मोजे घालावेत व तोंडावर मास्क लावावा.
बीज प्रक्रिया करताना तंबाखु खाणे, पाणी पिणे, सिगारेट ओढणे टालावे.
बिजप्रक्रिया करण्याचा क्रम
1) सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी.
2) कीटकनाशक
3)त्यानंतर 3-4 तासांनी रायझोबिअम /अॅझोटोबॅक्टरची बिजप्रक्रिया करावी.
4)सर्वात शेवटी पी. एस.बी. ची बिजप्रक्रिया करावी.
मित्रानो पाऊस लांबणीवर पडला आहे, शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कापूस लागवड सुरु केली आहे प्रत्येक शेतकरी बंधूनी कापूस बियांण्याला बीज प्रक्रिया करूच कापसाची लागवड करावी.