नवी दिल्ली : शेती क्षेत्रात मोठ्या झपाट्याने बदल होत आहेत. कृषी क्षेत्रातील संशोधक तसेच शेतकरी घेत असलेल्या मेहनतीच्या जोरावर आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशक्य गोष्टी देखील शक्य होतांना दिसून येत आहेत. तुम्ही जर काश्मिर गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्ही केसरची शेती नक्कीच पाहिली असेल. कधी काळी केवळ काश्मिरच्या बर्फाच्छादीत खोर्यात पिकणारे केसर आपल्याकडे पिकेल याचा साधा विचारही कोणी केला नसेल. परंतु, नोएडा येथील 64 वर्षीय अभियंता रमेश गेरा यांनी हे प्रत्यक्षात करुन दाखविले आहे. गेरा हे 100 स्वे. फुट म्हणजेच 10 बाय 10 च्या खोलीत केसरची शेती करत असून यातून ते लाखोंचे उत्पन्न घेत आहेत.
नोयडा येथील रमेश गेरा यांनी 1980 साली कुरुक्षेत्र येथील एनआयटी मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी लागली. नोकरी करीत असतांना त्यांना जगभरातील अनेक देशांमध्ये जाणे झाले. 2002 साली त्यांना 6 महिन्यांसाठी दक्षिण कोरीया येथे जाण्याची संधी मिळाली. साप्ताहिक सुटीच्या दिवशी ते एका ठिकाणी फिरायला गेले असतांना त्यांना हाइड्रोपोनिक, माइक्रोग्रीन्स, पॉलीहाउस इंजीनियरिंग आणि सेफ्रॉन कल्टीवेशन यासारख्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येत असल्याचे पाहावयास मिळाले.
अन् डोक्यात आला विचार
या अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत असलेली शेती पाहून गेरा यांना विचार आला की, आपण हे तंत्रज्ञान भारतात का नेऊ नये. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कामाबरोबर सहा महिन्यापर्यंत अत्याधुनिक शेती करण्याची पद्धत शिकुन घेतली. त्यानंतर भारतात परत येवून त्यांनी नोएडाच्या सेक्टर 63 मध्ये 100 स्वेअर फुटच्या एका खोलीत केसरच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण केली. संपूर्ण सेटअप उभा करण्यासाठी त्यांना 4 लाख रुपयांपर्यतचा खर्च आला.
काश्मिरहून मागविले बियाणे
दहा बाय दहाच्या खोलीत संपूर्ण सेटअप उभा केल्यानंतर रमेश यांनी काश्मिर येथून 2 लाख रुपयांचे बियाणे मागविले. केसर विषयी बोलतांना ते सांगतात की, भारतात जेवढी केसरची मागणी आहे, त्याच्या 30 टक्के भागच काश्मिरवरून येतो. बाकी 70 टक्के केसर ईरानवरुन आयात करावे लागते. मागणी आणि आयात यामधील जी दरी आहे, तीच आपल्यासाठी मोठी बाजारपेठ असल्याचे ते सांगतात. केसरची शेती करतांना जास्त लोकांची गरज भासत नाही. आपल्या घरातील एखादा सदस्य देखील या व्यवसायाला सहज सांभाळू शकतो. यात वीज बिल व्यतिरिक्त इतर कोणताच मासिक खर्च नसल्याचेही ते सांगतात. फक्त 4 महिने जेव्हा आपण या प्रणालीला सुरु ठेवतो, त्यावेळी कमीत कमी 4 ते साडेचार हजार रुपये महिना इतके बिल येत असते. त्यानंतर त्याला बंद करुन द्यावे लागते, असेही ते सांगतात.
अडीच ते तीन लाखापर्यंत कमाई
पुढे बोलतांना गेरा सांगता की, केसर हे चांगल्या दराने विकले जाते. जर तुम्हाला त्याला होलसेलमध्ये विक्री करायचे असेल तर अडीच हजार रुपये प्रति किलो दराने विक्री करु शकता. किरकोळ पद्धतीने देखील तुम्ही त्याची विक्री करु शकता. 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅमच्या पॅकींगमध्ये साडे तीन लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकता. आणि जर निर्यात केले तर 6 लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकता.
अनेकांना प्रशिक्षण
रमेश गेरा हे केसरची शेती करण्याबरोबर आपल्या देशातील तरुणांना देखील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी तरुणांना प्रशिक्षित देखील करीत आहेत. यासाठी त्यांनी नोएडा येथे मआकर्षक सेफ्रॉन इंस्टीट्यूटफ या नावने प्रशिक्षण सेंटर देखील सुरु केले आहे. आतापर्यंत 105 लोकांना त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने केसरची शेती करण्याचे तंत्र शिकविले आहे.