मुंबई – मुसळधार पावसामुळे आतापर्यंत राज्यातील 18 लाख हेक्टर शेती क्षेत्र प्रभावित झाले आहे. त्यातून अब्जावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यात सोयाबीन आणि कापसाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
गेल्या दोन महिन्यांत राज्यातील 30 जिल्हे अतिवृष्टीने प्रभावित झाले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे राज्यातील 17 लाख 85 हजार हेक्टरवरील शेत जमिनीचे नुकसान झाले आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 30 जिल्ह्यांमधील 195 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654 महसूल क्षेत्रातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामा काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यात सोयाबीन आणि कापसाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मका, उडीद, तुरी आणि मूग यांचेही मोठे नुकसान झाले आहे. काही भागात भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांनाही फटका बसला आहे.
सध्या मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त असून नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव आणि परभणी येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची नोंद होत आहे.














