मुंबई : आजही एक भारतातील रेल्वेमार्ग ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. भारतीय रेल्वे ब्रिटिश कंपनीला आजही देते या रेल्वे मार्गाचे भाडे.. विशेष म्हणजे हा रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातून जातो.. काय आहे हा मामला, ते सारे आपण जाणून घेऊ…
रेल्वेचे 1952 मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेव्हापासून देशभरातील रेल्वेचे सर्व जाळे भारतीय रेल्वे सांभाळते. मात्र, त्यात ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात असलेल्या या एका ट्रॅकचे (रेल्वेमार्ग) राष्ट्रीयीकरण होऊ शकले नाही. तेव्हापासून हा रेल्वेमार्ग वेगळा राहिला आणि तो भारत सरकार किंवा भारतीय रेल्वेच्या नियंत्रणाखाली आला नाही. या ट्रॅकची काळजी आणि संरक्षणाची जबाबदारी आजही एका ब्रिटिश कंपनीकडे आहे. या ब्रिटिश कंपनीला भारत सरकार दरवर्षी चक्क या रेल्वेमार्ग वापराचे पैसे अदा करते.
हा भारतातील रेल्वेमार्ग ब्रिटिशांच्या ताब्यात आहे तरी कोणता?
आजही ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात असलेला हा रेल्वेमार्ग विदर्भातील यवतमाळ , अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांना जोडतो. यवतमाळ ते मूर्तिजापूर आणि मूर्तिजापूर ते अचलपूर असा हा रेल्वेमार्ग आहे. यवतमाळ ते मूर्तिजापूर रेल्वे लाइन सेवा 1903 मध्ये सुरू झाली. पुढे 1913 मध्ये अचलपूरपर्यंत या रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात आला. आजही हा रेल्वेमार्ग परदेशी कंपनीच्या मालकीखाली असून त्यावरील वाहतूक भारतीय रेल्वेकडून कंत्राटी पद्धतीने चालविली जाते. सध्या कोरोनामुळे देशभरात बंद झालेल्या नॅरोगेज रेल्वेमार्गाप्रमाणे या मार्गावरील रेल्वेगाड्यांची वाहतूक बंद आहे. महाराष्ट्रात पाचोरा-जामनेर ही नॅरोगेज रेल्वेही सध्या बंद आहे.
झुक् झुक् झुक् झुक् आगीनगाडी … लहानग्यांसाठी सवलतीच्या किंमतीत आकर्षक, भन्नाट टॉय ट्रेन खरेदी करा
कापूस वाहून नेण्यासाठी सुरू झालेला रेल्वेमार्ग
वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वेलाईनची इंग्रजांनी उभारणी केली होती. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली तरी या रेल्वेमार्गाने वऱ्हाडवासीयांना स्वस्तात दळणवळण सुविधा उपलब्ध करून दिली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती, त्या काळात येथील छोट्या-मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारा हा रेल्वेमार्ग ठरला. या रेल्वेगाडीने यवतमाळ ते मूर्तिजापूर या 114 किलोमीटरच्या प्रवासासाठी अगदी आतापर्यंत फक्त 11 रुपये भाडे होते. कोरोनापूर्वी शेवटचे भाडे केवळ 19 रुपये होते. याच अंतरासाठी एसटी मात्र 125 ते 140 रुपये घेते. अत्यंत कमी भाड्यामुळे ही गरिबांना परवडणारी गाडी पसंतीची राहिली.
ब्रिटिश सरकारबरोबर झाला होता 100 वर्षांचा करार
ब्रिटिश सरकारसाठी क्लिक निक्सन ॲन्ड कंपनीने हा रेल्वेमार्ग उभारला. या रेल्वे मार्गाचे काम जेव्हा सुरू केले, तेव्हा पुढील 100 वर्षे ही रेल्वे कंपनीच्या मालकीची राहील, असा करार तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर केला गेला होता. त्यामुळे 25 डिसेंबर 1903 रोजी सुरू झालेला हा रेल्वेमार्ग व त्यावरील सेवा यांची मालकी 2003 पर्यंत त्या कंपनीकडेच होती. करार संपल्यानंतर भारत सरकार आणि कंपनीतील वाटाघाटींनुसार त्याला मुदतवाढ मिळाली. या क्लिक निक्सन कंपनीचे नाव पुढे सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी असे झाले. स्वातंत्रप्राप्तीनंतरही भारतीय रेल्वे सुरुवातीला या कंपनीला दरवर्षी रॉयल्टीची एक कोटी रुपयांची रक्कम देत असे. मात्र गाडी चालवताना उत्पन्न नावापुरतेच आणि देखभालीचे खर्च जास्त होते. मध्य रेल्वेने संबधित कंपनीला प्रत्यक्ष रक्कम न देता ती रक्कम देखभालीसाठी खर्च करणे सुरू केले.
शकुंतला रेल्वेच्या डब्यांवर 2018 मध्ये लागला भारतीय रेल्वेचा लोगाे
सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी लिमिटेडकडून देशात इतरही छोट्या रेल्वे मार्गांची उभारणी करून मग ती भारतीय रेल्वेला हस्तांतरित केली गेली. या कंपनीने दौंड ते बारामती, पुलगाव ते आर्वी, पाचोरा ते जामनेर, दारव्हा ते पुसद यासह अनेक रेल्वेमार्ग उभारले आहेत. ते सर्व रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेच्या अखत्यारीत आले. शकुंतला रेल्वे मात्र ब्रिटिशांकडेच राहिली. मूर्तिजापूर ते अचलपूर ही 52137 व 52138 आणि यवतमाळपर्यंत धावणारी गाडी 52131 व 52132 नंबरची आहे. 2018 पर्यंत या शकुंतला रेल्वेवर भारतीय रेल्वेचा लोगोही नव्हता.
वऱ्हाडवासीयांची जीवनरेखा शकुंतला रेल्वे एक्सप्रेस
या ब्रिटिश कंपनीच्या ताब्यातील रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाडीचे नाव आहे शकुंतला रेल्वे एक्सप्रेस. कालिदासाने लिहिलेली ही काही दुष्यंताची शकुंतला नव्हे. पण ही शकुंतला रेल्वे आज वऱ्हाडवासीयांची जीवनरेखा बनली आहे. या रेल्वेमार्गाची उभारणी इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी केली असली तरी अतिशय कमी तिकिटामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांची ती पहिली पसंती होती. या शकुंतलेने लवकरच वऱ्हाडवासीयांना आपलेसे केले. 1994 पर्यंत ही गाडी वाफेच्या इंजिनावर धावायची. 15 एप्रिल 1994 पासून मात्र या गाडीला डिझेल इंजिन लागले. पूर्वीचे शकुंतला रेल्वेचे वाफेचे इंजिन आजही पुणे रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळते. इंजिन बदलले मात्र, या गाडीच्या वेगात 110 वर्षांत काहीही बदल झालेला नाही. या मार्गावर डिझेल इंजिनचा वेग ताशी 20 किलोमीटर आहे. पूर्वी या गाडीला तीन डबे होते, ते आता पाच आहेत.
कसे पडले शकुंतला रेल्वे एक्सप्रेस नाव
दर्यापूरचे स्वातंत्र्य सैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्नी शकुंतलाबाई देशमुख यांच्या नावावरूनच या गाडीला शकुंतला नाव पडल्याचे सांगण्यात येते. देशमुखांचा दर्यापुरात मोठा वाडा होता. स्वातंत्र्य आंदोलन, सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते त्या वाड्यावर येत. अमरावतीचे माजी खासदार व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सुदामकाका देशमुख हेदेखील देशमुखांकडे या वाड्यावर यायचे. आणीबाणीच्या काळात ते या ठिकाणी काही काळ आश्रयाला होते. शकुंतलाबाईंचे वडील रेल्वेत अधिकारी होते. स्वातंत्र्यापूर्वी लग्न झाल्यावर त्या याच गाडीने पहिल्यांदा सासरी आल्या होत्या. 1 ऑगस्ट 2010 साली शकुंतला देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी या लोहमार्गाच्या विकासासाठी मूर्तिजापूर ते अचलपूर अशी प्रवास परिक्रमा या गाडीने आयोजित केली होती.
लोको पायलट गाडी थांबवून लावून घेतो रेल्वेफाटक
यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्थानकावरून सुटणारी ही एकमेव गाडी आहे. अन्य कोणतीही गाडी यवतमाळवरून सुटत नाही किंवा यवतमाळवरून जातही नाही. त्यामुळे ब्रिटिश काळापासून या एका गाडीसाठी यवतमाळ स्थानकाचा संसार सुरू आहे. अत्यंत कमी भाड्यामुळे ही रेल्वेगाडी गरिबांना परवडणारी असली तरी हिचा वेग कायम थट्टेचा विषय राहिला आहे. यवतमाळपर्यंतचे अंतर कापायला शकुंतला एक्सप्रेस सहा ते सात तास घेते. चालत्या गाडीतून उतरून बाजूच्या शेतातला हरबरा उपटून पुन्हा गाडी पकडता येत असे, असे जुने प्रवासी सांगतात. त्यामुळे शकुंतला धावत नाही तर रांगते, असे लोक गमतीने म्हणत. रेल्वे फाटक आले की, लोको पायलट गाडी थांबवतो. फाटक लावून घेतो. गाडीने फाटक पार केले की मग पुन्हा उतरून रेल्वे फाटक उघडतो व त्यानंतर गाडी पुढे निघते, असेही या गाडीबद्दल सांगितले जाते.
ब्रॉडगेजसाठी 2,100 कोटी, रेल्वेमार्ग मालकीचे भिजत घोंगडे
या रेल्वेमार्गाचे ट्रॅक्स अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत. पैसे देऊनही त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. गेल्या 60 वर्षांपासून या ट्रॅकवर कोणतेही काम झालेले नाही, असे भारतीय रेल्वेचे म्हणणे आहे. या रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेजसाठी रेल्वे मंत्रालयाने 2,100 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली. मात्र, या ट्रॅकची मालकी आजही ब्रिटिश कंपनीकडे आहे. या रेल्वेच्या राष्ट्रीयीकरणासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. 2016 मध्ये करार संपल्यामुळे सध्या या ट्रॅकची मालकी कोणाकडे, हा संभ्रमच आहे. रूट ताब्यात आल्याशिवाय या मार्गावर काहीच विकास होेणार नाही, अशी भुसावळ रेल्वे विकास विभागाचे डीआरएम यांची भूमिका आहे.
शकुंतला रेल्वे बंद करण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न
आर्थिक दृष्ट्या परवडत नाही या सबबीखाली, ही शकुंतला रेल्वे बंद करण्याचा भारतीय रेल्वेचा आटोकाट प्रयत्न चालू आहे, असा आरोप केला जातो. त्याची सुरुवात म्हणून ही गाडी आता यवतमाळ ते मूर्तिजापूर या दरम्यान कुठलेही स्टेशन न घेता धावते. किनखेड, जिल्हेगाव, भाडशिवणी, पोही, कारंजेटाऊन (कारंजा लाड), दादगाव, सोमठाणा, सांगवी, वरुडखेड, भांडेगाव, दारव्हा, बोरी, लाडखेड, लिंगा, लासीना अशी 15 स्टेशन आता विनाथांबा आहेत. असाच प्रकार मूर्तिजापूर-अचलपूर रेल्वेमार्गाबाबत झाला आहे. त्याही मार्गावरच्या लाखपुरी, भुजवाडा, बनोसा (दर्यापूर), लेहगाव, कोकर्डा, नवबाग, अंजनगाव सुर्जी, पथरोट या स्टेशनवर ती गाडी थांबत नाही, आणि कहर म्हणजे त्या स्टेशनांवरील बहुतेक कर्मचारी हलविण्यात आले आहेत.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
जगातले एक शापित गाव, जिथे वयात येताना मुलींचा होतो मुलगा! वयाच्या 12 व्या वर्षानंतर मुलींमध्ये होऊ लागतात शारीरिक बदल!!
भारतातील एक अनोखे गाव जिथे दुकाने आहेत पण दुकानदार नाही; Most Important 75 वर्षांत कधीही झालेली नाही चोरी लबाडी !
गेल्या 50 वर्षांपासून भुताटकीने झपाटलेले रेल्वे स्टेशन!
Comments 1