जळगाव : Rabi Season… बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील काही भागात पाऊस तर काही ठिकाण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. दरम्यान, सोमवार दि.5 रोजी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या ढगाळ वातारवणामुळे रब्बीतील पिकांवर रोग येवून शेतकर्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिकांची वेळीच काळजी घेतल्यास होणारे नुकसान टाळता येणार आहे. त्यासाठी काय उपाययोजना करावी, याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून निघेल अशी अपेक्षा शेतकर्यांना असतांना अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, सूर्यफूल, कापूस या पिकांवर रोगकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे ही पिके किडीपासून वाचविण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभर्यावर पाने खाणारी अळी, रब्बी ज्वारीवर मावाकीड, गव्हावर तांबेरा तर कापसाचा खोडवा ठेवला असेल त्यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होवू शकतो.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
पिकांची वाढ खुंटणार?
वातावरणात झालेल्या बदलामुळे थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे. थंडी कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम रब्बीतील पिकांवर जाणवण्याची शक्यता आहे. थंडी कमी झाल्यामुळे गहू, हरभरा यांसारख्या पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ.संजीव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
अशी करा उपाययोजना
ढगाळ वातावरणामुळे पिकावर कोणत्याही रोगकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास तातडीने शिफारसी नुसार आंतरप्रवाही किटकनाशकाची फवारणी करावी. हरभर्यावरील पाने खाणार्या अळीच्या नियंत्रणासाठी क्युनॉल फास्ट किंवा क्लोरोफायरी फास्ट या किटकनाशकांची फवारणी करावी. कामगंध सापळा लावावा तर गव्हावरील तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी 2 ते 2.5 ग्रॅम डायथेन एम-45 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ज्वारीवरील मावाकिडीच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी 5 मि.ली. प्रति लीटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तसेच किडीचा प्रादुर्भाव दिसताच थायामिथाक्झाम 25 टक्के दाणेदार 150 ग्रॅम 500 लिटर पाणी किंवा इमिडाकलोप्रीड 17.8 टक्के प्रवाही 140 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. असे केल्यास किडीमुळे उत्पादनात होणारी घट कमी होण्यास मदत होणार आहे.
गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण
खोडवा ठेवलेल्या कापसावर ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तात्काळ प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाने व बोंडे जमा करून नष्ट करावीत.
डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात. नियंत्रणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत. ट्रायकोग्रामा टॉयडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड (1.5 लाख अंडी/हेक्टरी) कपाशी पिकात लावावेत.
तसेच अझाडिरॅक्टीन (0.15 टक्के) 5 मि.लि. किंवा अझाडिरॅक्टीन (0.30 टक्के) – 4 मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 ईसी) 2 मि.लि. किंवा थायोडीकार्ब (75 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन (5 ईसी) 1 मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस (50 टक्के) + सायपरमेथ्रीन (5 टक्के ई सी) 2 मि.लि. प्रतिलिटर पाण्यात फवारणी करावी.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇