पूर्वजा कुमावत –
केळी बागेचे उन्हापासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, तीव्र उन्हामुळे केळीची गुणवत्ता कमी होते, आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यासाठी तुम्ही खाली दिलेले उपाय करून केळी बागेचे संरक्षण करू शकता.
– सर्वसाधारणपणे बागेमध्ये स्वच्छता ठेवावे व बाग तणमुक्त ठेवावा.
– केळी बागेतील उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी सजीव कुंपण करावे जसे की तूर काट्या, बाजरी, ज्वारी, कडब्याची ताटे बांबू हे सर्व दोरीच्या साहाय्याने ताट्या कराव्यात.
– अशा ताट्या बाकीच्या चारी बाजूने किंवा कमीत कमी उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील बाजूस बांधावे.किंवा केळीच्या बागेभोवती शेडनेट उभारावे.
– केळीच्या झाडांना मातीचा आधार द्यावा व वाफेतील माती भुसभुशीत करावी. यामुळे जमिनीचे योग्य तापमान राहते व झाडांच्या मुळांना इजा होत नाही.
– मुख्य खोडाजवळ आलेल्या पिल्ले जमिनीलगत तीन ते चार आठवड्यानंतर त्याचे धारदार विळ्याने कापणी करावी, त्यामुळे मुख्य पिकांना पिल्लांची सूर्यप्रकाश, हवा, पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी कमी स्पर्धा होते.

– केळीच्या झाडावरील फण्या पूर्णपणे निसवल्यानंतर शेवटच्या फणीपासून थोडे अंतर ठेवून केळफुल कापून घ्यावे.
– हे केळफुल जनावरांना खाद्य म्हणून किंवा खत तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो.
– कापलेल्या केळफुलांमध्ये विविध रस शोषणाऱ्या किडी, कोळी हे दिवसा लपून बसतात आणि रात्री घडाचे नुकसान करतात, यामुळे कापलेले केळफुल बागेत तसेच टाकू नये ते बागेच्या बाहेर फेकावे.
– केळीचे वाळलेली पाने, उसाचे पाचट किंवा गव्हाचा भुसा, सोयाबीन भुसा याचा वापर करून सेंद्रिय आच्छादन तयार करावे. या सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहते तसेच तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
– केळीच्या पानातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी उन्हाळ्यात पंधरा दिवसाच्या अंतराने बाष्परोधक पावडरची 80 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. ही फवारणी केल्यामुळे केळीच्या पानावर पांढरा थर तयार होतो व तो पानातील छिद्रांना अंशतः बंद करतो.
– एप्रिल महिन्यात उष्ण वाऱ्यांमुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते. पाने मोडतात, फाटतात, सुकतात, घडे सुकतात, झाडे वाकून मध्यावर मोडतात तर यासाठी आपण झाडांना आधार द्यावा व पक्व झालेल्या घडाची वेळेवर काढणे करावी.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇