दीपक खेडेकर
आपल्या सोबत घडलेल्या अकस्मित घटनेमुळे शिक्षण सोडावे लागले, रोजगारासाठी मुंबई गाठावी लागली. मात्र, शेतीची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे गावाकडे परतले आणि दुसर्याच्या हाताखाली काम करायचे नाही. स्वतःच काही तरी करायचे आणि जे काही करायचे ते शेतीमध्येच करायचे, असा ठाम निर्णय घेतला. त्यानंतर कुटुंबाच्या मदतीने पारंपारिक भात शेतीला एका पेक्षा अनेक शेती पूरक व्यवसायांची जोड देवून शेतीला सुरुवात केली आणि त्यात यश मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम देखील झाले. ही प्रेरणादायी गोष्ट आहे, कुंभवे येथील प्रयोगशील शेतकरी अनिल शिगवण यांची. चला जाणून घेवूया सविस्तर.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कुंभवे येथील प्रयोगशिल शेतकरी अनिल हरिश्चंद्र शिगवण हे कला शाखेमध्ये पदवीधर असून त्यांची जिवनगाथा मोठी प्रेरणादायी आहे. अनिल यांच्या सोबत घडलेल्या एका अकस्मित घटनेमुळे त्यांना आपले महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून इतर युवकांप्रमाणे रोजगाराच्या शोधात मुंबई गाठावी लागली. परंतु, जिवनात काही तरी करायचेच… या जिद्दीने पेटलेल्या अनिल शिवगण यांनी छोटी-मोठी नोकरी करून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तीन वर्षातच शहरातील त्यांना न आवडणारी जीवनशैली व दगदगीच्या कंटाळून त्यांनी शेतीमध्ये राबण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मूळ गावी परतले.
खत लिंकिंगचे गौडबंगाल माजी कृषी मंत्र्यांकडूनच अधिवेशनात उघड
इतरांकडे केली रोजंदारी
रोजगार मिळवून कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळण्यासाठी मुंबई येथे गेलेल्या अनिल शिगवण यांनी मुंबई सोडून गावी आल्यानंतर कुटुंबाची आर्थिक बाजू संभाळण्यासाठी काही दिवस इतरांकडे गरजेनुसार रोजंदारी केली. पण आपल्याला शेतीमध्येच काहीतरी करायचं आहे, ही त्यांची असणारी ईच्छा, आवड त्यांना शांत बसू देत नव्हती.
शेतीची असणारी आवड ठरली प्रेरणा
अनिल शिगवण यांची वडिलोपार्जित अशी काही जास्तीची शेती नव्हती. पण, कुटुंबाला आवश्यक एवढी भात, नाचणी, वरी याची शेती केली जायची. त्याच बरोबर वडिलांनी काजू व आंब्याच्या काहीश्या कलमांची सुद्धा लागवड केली होती, मात्र त्यामधून त्याकाळी तेवढेशे काही उत्पन्न मिळत नव्हते. पण शालेय जीवनापासूनच शेतीमध्ये असणारे आवड हीच अनिल शिगवण यांची प्रेरणा ठरली, आणि त्यांनी शेतीमध्ये राबायला सुरुवात केली.
शेती उत्पन्नाचा श्री गणेशा
वडिलोपार्जित असणारी जमीन ही खडकाळ, जांभ्या दगडाची असल्यामुळे तिथे कोणतीही शेती होऊ शकत नव्हती, त्यामुळे अनिल शिगवण यांनी 3 महिन्यासाठी शेजार्यांची 15 गुंठे जमीन राबण्यासाठी घेऊन त्यामध्ये कलिंगड, पालेभाज्या, वांगी इत्यादीची लागवड केली. या लागवडीमधून रब्बी हंगामामध्ये सुमारे 70 हजार रुपयांची पहिल्यांदाच आर्थिक कमाई झाली, असे अनिल शिवगण अभिमानाने सांगतात. एवढी आर्थिक कमाई जर शेती मधून मिळते तर मग रोजंदारी का करावी? हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊन शेतीमधून मिळालेल्या उत्पन्नाच्या विश्वासामुळे अनिल शिगवण यांनी हळूहळू रोजंदारी कमी करून कालांतराने बंद केली.
गुंठ्यावरुन एकरावर नेली शेती
कालांतराने अनिल शिगवण यांनी आजूबाजूच्या इतरही शेतकर्यांच्या जमिनी भात कापणीनंतर काही कालावधीसाठी राबण्यासाठी घेतल्या. यामध्ये त्यांनी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये कलिंगडाचे मुख्य उत्पन्न घेतले. त्यानंतर भेंडी, काकडी व इतर पालेभाज्यांचे उत्पन्न घेऊन आजूबाजूच्या परिसरामध्ये तसेच बाजारपेठेमध्ये प्रत्यक्ष विक्री करून शेतीला व्यावसायिक स्वरूप दिले.
शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था
वडिलोपार्जित असणार्या विहिरीचे अनिल शिगवण यांनी पुनर्जीवन केले. आता याच विहिरीच्या पाण्याने संपूर्ण शेती केली जाते. आवश्यक तिथे पाणी देण्यासाठी मशीन, ठिबक सिंचनच्या सहाय्याने तर गरजेच्या ठिकाणी पाईपलाईनचा उपयोग करून शेतीसाठी पाण्याचे नियोजन केले जाते. शेती करण्याचे प्रमाण जसे-जसे वाढत गेले तसे-तसे शेती करण्याच्या पारंपारिक पद्धतीला मर्यादा येऊ लागल्यामुळे अनिल शिगवण यांनी पॉवर टिलर, ग्रास कटर तसेच शेती वापरासाठी येणारी संबंधित सर्व अवजारे कृषी विभागाच्या साहाय्याने घेण्यास सुरुवात केली. यामध्ये कृषी विभागाचे सर्वतोपरी सहकार्य मिळाल्याचेही ते आवर्जून सांगतात.
निर्मल रायझामिका 👇
दरवर्षी एक म्हैस व मशीन खरेदी
दरवर्षी शेतीमधून मिळालेल्या आर्थिक कमाईमधून काहीशी रक्कम बाजूला ठेवून दरवर्षी एक म्हैस व एक शेती उपयोगी मशीन खरेदी करण्याचा संकल्प अनिलक यांनी केला व हा संकल्प कोरोनाच्या काळापर्यंत त्यांनी पूर्णत्वास नेऊन शेतीला यांत्रिकीकरणाच्या बाबतीत परिपूर्ण केले. आता त्यांच्याकडे 17 ते 18 गाई, म्हशी असून दुग्ध व्यवसाय सुद्धा चांगल्या पद्धतीने करत आहेत. एखादी गाय किंवा म्हैस व्यायली की, ती कमीत कमी 7 ते 8 महिने दूध देते. त्या दुधाची मागणी नुसार आजूबाजूच्या परिसरामध्ये विक्री करून काहीसे उत्पन्न मिळून एकंदरीत मासिक आर्थिक उत्पन्नातमध्ये वाढ होण्यास मदत होते.
शेतीसाठी शेणखताचा वापर
गाईचे गोमूत्र, गायी, म्हशी यांचे शेण यांचा वापर शेतीच्या कामासाठी होतो. सुमारे 90 टक्के शेणखत, गांडूळ खत, गोबर गॅसच्या स्लरी याचा शेतीसाठी वापर केल्यामुळे रासायनिक खतावरील खर्च कमी होतो जमिनीची सुपीकता वाढते. शिगवण हे गावठी कोंबड्यांचे सुद्धा पालन करतात .या कोंबड्यांच्या होणार्या विक्रीमधून काहीशे उत्पन्न मिळाल्यामुळे एकूणच शेती उत्पन्नात वाढ होते. विशेष म्हणजे माऊथ पब्लिसिटी झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील गिर्हाईक घरी येऊन कोंबड्या खरेदी करतात. बाहेर कुठेही विक्रीसाठी घेऊन जायची आवश्यकता लागत नाही. वर्षाला सुमारे 1 हजार कोंबड्यांची विक्री होते असे ते सांगतात.
शिष्यवृत्तीच्या पैशातून शेळी
दहावी इयत्तेत असताना गरीब विद्यार्थी म्हणून मिळालेल्या 1100 रुपयाच्या शिष्यवृत्तीतून आपल्या आते कडून आवडीने आणलेली एक शेळी आणि शेळीच्या एका पिल्लाने सुरुवात केलेल्या शेळी पालनाने सुद्धा आता पर्यंत लाखो रुपये उत्पन्न कमवून दिले आहे असे समाधानाने असे अनिल शिगवण सांगतात. जास्तीची जास्त शेळ्यांची विक्री ही शेळी पालना साठी इच्छुक व्यक्ती, शेतकरी यांनाच केली जाते ही पण एक उल्लेखनी बाब आहे.
खडकाळ जमिनीला केली सुपीक.
अनिल शिगवण हे शेतीच्या कामाच्या दिनचर्येतून जसा वेळ मिळेल तसा खडकाळ जमीन शेती योग्य करण्यासाठी मेहनत करत असतात.यांनी अंदाजे दोन लाख रुपये खर्च करून वडीलोपार्जित 1 एकर खडकाळ जमीन जेसीपी च्या सहाय्याने तसेच बाहेरून माती आणून शेती करण्याच्या योग्यतेची केली. त्या जमिनीवर सुद्धा त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली आहे.
कुटुंबाची मोलाची साथ व सहकार्य
शिगवण यांना शेतीच्या प्रत्येक कामामध्ये आई, बाबा, पत्नी यांची मोलाची साथ लाभते. प्राथमिक शिक्षण घेणारी त्यांची दोन मुले देखील शेती करण्यासाठी मदत करत असतात. अनिल हे आपल्या शेतात पिकवलेला शेतीमाल स्वतः बाजारपेठेमध्ये जाऊन विक्री करतात. शेतमालाच्या वाहतुकीसाठी त्यांनी एक स्वतःचे वाहन देखील घेतलेले आहे. मालाची स्वतः प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये विक्री केल्यामुळे एवढी आर्थिक प्रगती होऊ शकते, असे ते आवर्जून सांगतात. अनेक पुरस्कारांनी सन्मानित अनिल शिगवण यांनी शेती क्षेत्रामध्ये केलेला केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल राज्य शासनाने देखील घेतली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून तसेच निरनिराळ्या सामाजिक संस्थाकडून त्यांनी अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
शेती व्यवसायाची वार्षिक उलाढाल
पारंपारिक शेती ही विशेषतः स्वतःच्या कुटुंबाच्या गरजेपुरतीच केले जाते. मात्र या शेती बरोबर एकापेक्षा अनेक शेती पूरक व्यवसायाच्या माध्यमातून अनिल शिगवण हे वर्षाकाठी अंदाजे 6 ते 7 लाखाचे उत्पन्न मिळवतात. त्यांच्या शेती तसेच शेतीपूरक व्यवसायामधून सात व्यक्तींना कायमस्वरूपी पूर्णवेळ रोजगार मिळतो. हंगामानुसार आवश्यकता वाटल्यास इतर व्यक्तींना सुद्धा शेतीच्या काम मधून रोजगार दिला जातो.
उत्पन्न पूर्वपदावर यायला सुरुवात
कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रांसह कृषी क्षेत्रावर देखील परिणाम झाला होता. उत्पादीत केलेला शेतमाल बाजारात जाऊन विकणे कठीण झाले होते. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले, कर्जाचे हप्ते सुद्धा थकीत झाले. अशावेळी कायमस्वरुपी कामावर असणार्या कामगारांना सुद्धा नाईलाजने कमी करणे भाग पडले. पण आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत असल्याचे अनिल शिगवण सांगतात.
कृषी विद्यापीठाची महत्वाची भूमिका
असल्या शेती क्षेत्रातील करीअरला कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे वेळोवेळी सहकार्य, मार्गदर्शन मिळत असते. शेती मधील यांत्रिकीकरण, खते, कीटकनाशके, प्रदर्शने मिळावे,चर्चासत्रे यामध्ये वेळोवेळी सहभाग घेता येतो.
नोकरीच्या मागे न धावता शेतीकडे वळा…
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता विशेषत: कोकणातील तरुण पिढीने आपल्याकडील पडीक जागेचा वापर करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा. नोकरीपेक्षा शेतीमध्ये पैसा आहे. यासाठी मात्र पारंपरिक शेती बरोबर वेगवेगळे शेतीपूरक व्यवसाय करणे आवश्यक आहे.
– अनिल हरिश्चंद्र शिगवण,
प्रगतशील शेतकरी