दिलीप वैद्य, रावेर –
जळगाव जिल्हा तसा केळी आणि कापूस या पिकांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र अलीकडची युवा पिढी नवनवीन प्रयोग करत या पारंपरिक शेती ऐवजी अगदी आगळ्यावेगळ्या सर्वसमावेशक अशा नगदी फळ पिकांकडे वळत आहेत. नेहल वारके हे केवळ एक तरुण शेतकरी नाहीत, तर आधुनिक शेतीचे प्रेरणास्थान आहेत. पारंपरिक शेतीला नवी दिशा देत त्यांनी ड्रॅगन फ्रुट, लिंबू, साग, मोहगणीसह तब्बल 10 पेक्षा अधिक फळपिकांची लागवड केली आणि मत्स्य शेतीचा प्रयोगही यशस्वीपणे उभा केला. तसेच ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीत 1 लाख 20 हजार रुपये त्यांना नफा मिळाला.
नेहल वारके हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील युवा शेतकरी! त्यांचे शिक्षण बीएससी (एग्रीकल्चर) आणि एमबीए (मार्केटिंग) असे झाले आहे. त्यांचे वडील निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या थोरगव्हाण या गावी आणि तालुक्यातील विवरा येथे साधारण 11 एकर इतकी शेती आहे. या शेतीत पूर्वी केळी, कपाशी, ज्वारी सारखी नगदी आणि पारंपरिक पिकं घेतली जात. आपले शिक्षण पूर्ण केल्यावर नेहल वारके यांनी आपल्या घरच्या शेतीकडे लक्ष देण्याचे ठरवले. तसे लहानपणापासूनच त्यांना शेतीची आवड होती म्हणून अन्य कोणाकडे नोकरी न करता शेती करण्याचे ठरवले. तेव्हा त्यांनी पारंपारिक शेती न करता आगळीवेगळे नवे प्रयोग करण्याचे ठरवले.
ड्रॅगन फ्रुट आणि लिंबूची केली लागवड
अगदी सुरुवातीला 2021 मध्ये त्यांनी कागदी लिंबू आणि ड्रॅगन फ्रुट या फळांची लागवड केली. ड्रॅगन फ्रुट साधारण 1 एकर क्षेत्रात तर लिंबूची साधारण 100 झाडे म्हणजे तीही साधारण एक एकर क्षेत्रात त्यांनी लावली. यासाठी लागणारे बियाणे त्यांनी थेट सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे जाऊन आणले. त्यांनी लावलेल्या ड्रॅगन फ्रुटच्या झाडांना मागील वर्षीच म्हणजे तीनच वर्षात 6 क्विंटल इतकी फळे लागली होती. ती काढून त्यांनी सावदा, थोरगव्हाण गावातच आणि स्थानिक बाजारपेठेतच विकली. या फळांना त्यावेळी सुमारे 200 रुपये किलो असा भाव मिळाला. म्हणजेच ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीत 1 लाख 20 हजार रुपये नफा मिळाले. तसेच लिंबूचीही काढणी मागील वर्षी सुमारे 1 क्विंटल इतकी झाली होती.
साग आणि मोहगणीचीही लागवड
नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञानाची कास धरलेल्या नेहल वारके यांनी साग आणि मोहगणी या दोन प्रकारच्या झाडांची लागवड 3 वर्षांपूर्वी केली आहे. त्यांचे वडील दिलीप वारके यांनी पाल येथून सुमारे 25 वर्षांपूर्वी सागाची 18 रोपे आणली होती. ती त्यांनी शेताच्या बांधावर त्यावेळी लावली होती. सुमारे 4 वर्षांपूर्वी या 18 झाडांना विकून 8 लाख रुपये इतके उत्पन्न त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मिळाले. त्यामुळे वडिलांचा तो अनुभव लक्षात घेऊन नेहल यांनी सागाची 225 झाडे आणि मोहगणीची 200 झाडे आपल्या शेतात लावली आहेत.
लिंबू आणि ड्रॅगन फ्रुट लागवड करता करता अन्य फळपिके लागवड आपल्या शेतात करण्याचा विचार नेहल वारके यांनी केला आणि विविध 9 ते 10 प्रकारच्या फळपिकांची लागवड त्यांनी आपल्या शेतात केली आहे. आंबा 40, आवळा 12, सीताफळ 10, पेरू 10, संत्री 15, मोसंबी 15, सफरचंद 10, नारळ 40 आणि अंजीर 45 अशा विविध फळझाडांची लागवड त्यांनी आपल्या सुमारे दीड एकर जमिनीत केली आहे. या सर्व फळांना सेंद्रिय खत देऊन सेंद्रिय पद्धतीनेच उत्पादन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी दोन वर्षांनंतर या सर्वच फळ झाडांना भरघोस फळे येतील आणि मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.

मत्स्य शेतीचाही प्रयोग
विविध फळ पिकांचे उत्पादन घेण्याच्या नवनवीन प्रयोगासोबतच नेहल वारके यांनी मत्स्य शेतीचाही प्रयोग शेतात केला आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेत त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मदत आणि मार्गदर्शन घेत त्यांच्या शेतात 100 फूट बाय 100 फूट लांबी रुंदीचे शेततळे तयार केले आहे. या तळ्यात सुमारे 30 लाख लिटर पाणी सध्या गोळा झाले आहे. या शेततळ्यात त्यांनी मत्स्य उत्पादनही घेण्याचे ठरवले आहे. 2024 मध्ये त्यांनी या शेततळ्यात सुमारे 10 हजार माशांची पिले सोडली आहेत. त्यांच्या शेततळ्यातील मासे खरेदी करण्यासाठी स्थानिक आणि घाऊक व्यापाऱ्यांनी आतापासून त्यांच्याशी संपर्क सुरू केला असून मत्स्य विक्रीतून किमान 8 ते 9 लाख रुपयाचे उत्पन्न मिळेल असा त्यांचा अंदाज आहे.
संपर्क :-
नेहल वारके
मो. नं. 8888789400