ऐश्वर्या सोनवणे
झेंडू लागवडीनंतरचे व्यवस्थापन : झेंडूचे फूल माहिती नसणारे कदाचित क्वचितच कोणी असेल. पूजा पाठ, लग्न सोहळा इत्यादी कार्यक्रमांमध्ये देवाला वाहण्यासाठी व सजावटीसाठी या फुलांचा वापर होत असताना आपण सगळ्यांनीच पाहिले असेल. तसेच सणावाराला झेंडूच्या फुलांची मागणी जास्त असते. त्यामुळे शेतकरी याची लागवड करतात.
पाणी व्यवस्थापन
झेंडू फुलांच्या उत्पादन वाढीसाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. झेंडू फुलांना योग्य मुळांपर्यंत पाणी पोहोचवणे आवश्यक आहे. परंतु, अति पाणी किंवा कमी पाणी दोन्ही नुकसानकारक असू शकतात. झेंडू फुलांना पाणी नियमितपणे देणे आवश्यक आहे. पाणी कमी प्रमाणात आणि योग्य वेळेस दिल्यास फुलांची गुणवत्ता सुधारते. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी देणे सर्वोत्तम असते, जेणेकरून पाणी जमीन शोषून घेईल.
खत व्यवस्थापन
सेंद्रिय खत, जसे की वर्मी कंपोस्ट किंवा गांडूळ खत हे झेंडूला पोषकतत्त्वे पुरवते. यामुळे मातीची संरचना सुधारते आणि मातीची जलधारण क्षमता वाढते. वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत 200-250 kg प्रमाणात पेरणीच्या वेळी देणे योग्य ठरते. झेंडू वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे खत देणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात खत दिल्याने फुलांची वाढ, गुणवत्ता आणि प्रमाण उत्तम होऊ शकते.
कीड व रोग व्यवस्थापन
सहसा फुलझाडांवर वेगवेगळ्या प्रकारे अळी पडली असते किंवा बुरशी लागत असते. झाडाची पाने वाळली असतात, हिरवे कीटक असतात जे फुल झाडांच्या पानांवर बसतात आणि ते सायटोप्लाझमिक द्रव शोषून घेतात, त्यामुळे फुलांची वाढ मंदावते. म्हणून योग्य वेळी फवारणी करणे गरजेचे आहे. पावडर बुरशी रोग या रोगाने प्रभावित झाडांच्या देठांवर, पानांवर आणि फुलांवर पांढरा पावडरचा लेप दिसून येतो. रोग वाढत असताना, कळ्या फुलत नाहीत. या रोगापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी 1 मिली हेक्साकोनाझोल 5% किंवा 3 ग्रॅम सल्फर 80 टक्के डब्ल्यूपी फवारावे. गरज भासल्यास 12 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.
फुले किती दिवसात येतात
जेव्हा झाड 30 ते 45 दिवसाचे असेल तेव्हा झाडाच्या वरच्या बाजूचा भाग कापून टाकावे त्यामुळे झाड दाट होण्यास मदत करते आणि फुलाची गुणवत्ता ही सुधारते आणि आकारही चांगला होतो. झेंडूच्या फुलाच्या जातीनुसार फुल 2 ते 2.5 महिन्यात काढण्यासाठी तयार होतात. फ्रेंच जेंडरची जात 1.5 महिन्यात काढण्यासाठी तयार होते, तर आफ्रिकन झेंडूची जात 2 महिन्यात काढण्यासाठी तयार होते.
काढणी
योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने काढणी केल्याने झेंडूचे फूल अधिक टिकाऊ, आकर्षक राहते. फुलांच्या पहिल्या काढणीनंतर दर 2-3 दिवसांनी सकाळी किंवा संध्याकाळी फुलाची काढणी करावी. यामुळे फुलांमध्ये ओलावा टिकून राहतो आणि फुल अगदी ताजेतवाने राहतात. फुलांची निवड करतांना नेहमी निरोगी आणि पूर्णपणे फुललेल्या फुलांची निवड करावे. काढलेली फुले हवेच्या ठिकाणी ठेवून 1-2 तास वाळवून घ्या, जेणेकरून ते ताजे राहतील.
विक्री व उत्पादन
झेंडू फुलांच्या विक्रीसाठी स्थानिक बाजार एक उत्तम पर्याय असतो. झेंडू फुलाचे एकरी उत्पादन विविध घटकांवर अवलंबून असते. जसे की जमीन, हवामान, पाणी व्यवस्थापन, आणि खतांचा वापर. झाडांची चांगल्या पद्धतीने देखभाल केल्यास झेंडू फुलांचे एकरी उत्पादन 25,000 ते 30,000 फुलांची संख्या असू शकते. अधिक लक्ष दिल्यास हे उत्पादन 40,000 फुलांपर्यंत देखील पोहोचू शकते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇