पूर्वजा कुमावत
शेवंती हे एक सुगंध फुल आहे. पुदिनाच्या वर्गातले हे झाड अति थंड प्रदेशापासून ते गरम हवेतही वाढते. गुलाबानंतर दुसऱ्या क्रमांकावर गणले जाते ते म्हणजेच शेवंतीचे फुल. या फुलाचा आकार आकर्षक रंग आणि उमलण्याची पद्धत ही एक नैसर्गिक देणग्यांमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ असेही म्हटले जाते. अमेरिका, युरोप, जपान, चीन आणि आशिया देशांमध्ये शेवंतीची व्यापारीदृष्ट्या लागवड केली जाते. भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटका, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात या फुलाची लागवड केली जाते व पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात शेवंती फुलाला जास्त प्रमाणात मागणी आहे. पुणे, सोलापूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये फुलाची लागवड थोड्या प्रमाणात आहे, पण नगर जिल्ह्यात या फुलाची लागवड खूप जास्त प्रमाणात आहे.
लागवड तंत्रज्ञान
शेवंती लागवडीसाठी चांगली पाणी निचरा होणारी व मध्यम हलकी जमीन फायदेशीर ठरते. जमिनीचा सामू 6.5 ते 7 असावा व जमिनीत भरपूर सेंद्रिय पदार्थ असले पाहिजे. पाण्याचा योग्य निचरा न होणारी जमीन या पिकाला मानवत नाही म्हणून शेवंतीसाठी अत्यंत भारी जमीन ही निवडू नये.
हवामान
शेवंती हे पीक कमी दिवसाचे आहे व याला फुले येण्यासाठी कमी तापमानाची आवश्यकता असते. शेवंती वाढण्यास 20 ते 30°C तर, फुले येण्यासाठी 10 ते 17°C तापमानाची गरज असते. शेवंतीची सुरुवातीची वाढ ही जोमदार झाल्यास त्याचे उत्पादन भरपूर व दर्जेदार मिळते. हलका ते मध्यम पडणारा पाऊस शेवंतीसाठी पोषक असतो दीर्घकाळ पडणाऱ्या पावसामुळे शेवंती मूळबुजव्या रोगास बळी पडते.
लागवड
महाराष्ट्र शेवंतीची लागवड ही एप्रिल-मे महिन्यात करतात. लागवडीची वेळ ही पिकाची वाढ व फुले येण्याचा काळ लक्षात घेऊन या पिकाची लागवड करावी. पाण्याच्या उपलब्धतेनुसार लवकर किंवा उशिरा लागवड करता येते. लागवडीसाठी सुरुवातीच्या काळात पाणी उपलब्ध असले तर लागवड ही चांगल्या प्रकारे करता येते.
मशागत
सर्वात पहिले जमीन ही उभी-आडवी नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. जमीन तयार करत असताना हेक्टरी 25 ते 30 टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. 60 सेंमीअंतरावर सऱ्या सोडून वाफे तयार करून घ्यावे. शेवंतीची लागवड ही सरीच्या दोन्ही बाजूस 30 सेंमी अंतरावर करावी व ही लागवड शक्यतोवर दुपारच्या सुमारात करावी म्हणजे रोपांचे मर कमी होते.
खत व पाणी व्यवस्थापन
शेवंतीच्या उत्तम वाढीसाठी व दर्जेदार उत्पादनासाठी लागवडपूर्वी शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी हेक्टरी 150 : 200 : 200 किलो नत्र- स्फुरद-पालाश तर लागवडीनंतर एक दीड महिन्याने 150 किलो नेत्र हेक्टरी या प्रमाणात द्यावे. उन्हाळी हंगामात लागवड केल्यास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर 5 ते 7 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
रोग व्यवस्थापन
मर रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या वाढीच्या सुरुवातीस किंवा फुले येण्याच्या कालावधीमध्ये केव्हाही येऊ शकतो. प्रादुर्भावामुळे झाडांची खोडे तपकिरी होते व पाणी पिवळी पडतात. मर रोगाच्या नियंत्रणासाठी झाडाच्या मुळांची मँकोझेब 0.2% प्रमाणात किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 0.3% प्रमाणात द्रवण स्वरूपात द्यावी. बुरशीनाशकाची आलटून पालटून गरजेनुसार 10 ते 15 दिवसांनी फवारणी करावी.
अंतरमशागत
वेळोवेळी निंदणी करून तण काढून घ्यावे. पिकाची वाढ मर्यादित राहण्यासाठी व अधिक उत्पादन येण्यासाठी शेवंतीच्या झाडाचा शेंडा काढून (खुडून) घ्यावा. लागवडीनंतर चौथ्या आठवड्यानंतर झाडाचा शेंडा काढून घ्यावा. शेंडा काढल्याने अधिक फुटवे फुटून फुलांच्या उत्पादनात वाढ होते.
काढणी व उत्पादन
फुलाची काढणी ही लागवडीनंतर तीन ते पाच महिन्यांनी सुरू होते. शक्यतो फुलेही सूर्योदयापूर्वी काढावीत हे उमललेले फुल उशिरा काढल्यास रंग फिका पडतो व वजन कमी करते. लवकर उमलणाऱ्या जातीचे एकूण 5 ते 7 तर, उशिरा उमलणाऱ्या जातीचे 9 ते 10 तोडे होतात. साधारण हेक्टरी उत्पादन हे 7 ते 13 टनापर्यंत मिळते. या फुलांची पॅकिंग बांबूच्या करंड्या किंवा पोत्यात केली जाते.