शेततळ्यांमुळे शिंदी गावात शेकडो एकरावर मोसंबी बागा.
बदलत्या नैसर्गिक परीस्थित सर्वत्र पाणी टंचाई तीव्र झाली असतांना काळाची पावले ओळखून शिंदी (ता.चाळीसगाव, जि.जळगाव) येथील शेतकर्यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात केली आहे. फक्त दोनच वर्षात या गावात तब्बल 128 शेततळ्यांच्या माध्यमातून पिकांना संरक्षित सिंचनाची सोय शेतकर्यांनी केली आहे. परिणामी या गावात शेकडो एकर क्षेत्रावरील मोसंबी, द्राक्ष बागांना जीवदान मिळाले आहे. यातून शेतकर्यांची आर्थिक भरभराट होऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.
चाळीसगावपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर चाळीसगाव - येवला रस्त्याला गणेशपूर शिंदी फाटा लागतो. फाट्यापासून 4 किलोतीटर अंतरावर शिंदी गाव आहे. येवला रस्ता सोडला की, आपण जळगाव नाही, तर नाशिक जिल्ह्यात आहोत असे वाटायला लागते. रस्त्याच्या दुतर्फा हिरव्यागार फळबागा दिसू लागतात. शिंदी शिवारात शिरल्यापासून तापमान जळगावपेक्षा 4 ते 5 अंश सेल्सियसने कमीच असल्याचे जाणवू लागते. अजिंठ्याची डोंगररांग जवळच असल्याने कदाचित येथील तापमान कमी असावे. या डोंगररांगातून वाहात येणार्या तितूर नदीमुळे परिसरातील विहिरींना बर्यापैकी पाणी असते.
एकाच वर्षात 100 शेततळे
गावात मोसंबी बागांतून एकरी 12 ते 13 टन मोसंबी उत्पादनातून दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न घेणारे शेतकरी. पण पाऊसमान कमी झाल्याने म्हणा किंवा भूगर्भातील पाण्याच्या प्रचंड उपश्यामुळे ऐन फळधारणेच्या काळात या भागात विहिरी कोरड्या पडू लागल्या. डोळ्या देखत बहार गळून जाऊ लागला. काही शेतकर्यांच्या तर बागा सुकू लागल्या. अशातच वर्ष 2011 मध्ये शासनाने शेतकर्यांसाठी शेततळे योजना आणली. या योजनेचा लाभ घेणारे बाळू काटे पहिले शेतकरी ठरले. परंतु, जाचक अटी आणि अनेक त्रुटीमुळे अनेक शेतकरी योजनेपासून दूरच राहिले. वर्ष 2014 पासून मात्र मागेल त्याला शेततळे योजनेचा असंख्य शेतकरी लाभ घेऊ लागले. वर्ष 2017-18 या एकाच वर्षात शिंदी शिवारात तब्बल 100 शेततळे निर्माण झाले.
मोसंबीने लावला लळा
शिंदीतील यशस्वी फळ बागायातदारांमध्ये बहुतेक तरुण शेतकरीच आहेत. त्यापैकी रणजीत आनंदराव देशमुख हे एक. त्यांची वडिलोपार्जित 12 एकर शेती. वडिलांच्या हिश्याला एकच विहीर होती. एक विहीर अपुरी पडू लागली म्हणून त्यांनी आणखी 3 विहिरी खणल्या. आनंदराव वर्षानुवर्षे कापूस हेच पिक घेत. रणजीत यांनी बारावीनंतर नोकरी करण्यापेक्षा शेती करणेच पसंत केले. ते शेतीकडे लक्ष देऊ लागल्यानंतर कापूस सोडून फळबागायतीकडे वळाले. विहिरींमुळे सिंचनाची खात्रीशीर असल्याने त्यांनी 7 ते 8 एकर क्षेत्र मोसंबी लागवडी खाली आणले. जामनेर येथील एका नर्सरीतून त्यांनी न्यू शेलार व कॉटल गोल्ड या जातीची रोपे आणून लागवड केळी. एकरी सुमारे 175 रोपे लागली. लागवडी पाठोपाठ ठिबक सिंचन संचाने पाणी दिले जाऊ लागले.
पाण्यासाठी शेततळे खोदले
मोसंबीची लागवड केली त्यावर्षी विहिरींना भरपूर पाणी होते. परंतु झाडे 4 ते 5 वर्षाची झाली तेव्हा दुष्काळाने घेरले. 2017-18 या वर्षी मोसंबी बाग कशाबशा जगवल्या पण पुढे काय? म्हणून देशमुखांनी त्यांच वर्षी शेततळे खोदून घेतले. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून एकूण 1 लाख रुपये खर्चून 30 गुंठे क्षेत्रावर शेततळे खोदले. त्याचे अडीच लाख रुपये खर्चून अस्तरीकरण केले. अस्तरीकरणासाठी 75 हजार रुपये अनुदान प्राप्त झाले. सुरक्षेसाठी चहुबाजूने जाळीदार कुंपण करून घेतले. त्यासाठी 50 हजार रुपये खर्च आला. अशाप्रकारे एकूण 4 लाख रुपये खर्चून शेततळे तयार झाले.
शेततळ्यात पाणी साठवले
पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरल्या होत्या, तेव्हा 7 हॉर्सपॉवरच्या मोटारपम्प 550 तास चालवून शेततळे भरून घेतले. संपूर्ण मोसंबी बागेला ठिबक सिंचनाने दररोज 8 ते 10 तास पाणी दिले तरी ऐन उन्हाळ्यात 3 महिने पाणी पुरणार आहे. अशाप्रकारे मोसंबीचा हंगाम तर हाती आलाच शिवाय पाण्याअभावी जी बाग सुकून गेली असती ती जगली आहे.
शेततळ्यामुळे उत्पन्न मिळणार
रणजीत देशमुख यांनी मोक्याच्या काळात शेततळे केल्याने सुमारे 8 लाख खर्चून उभी राहिलेली 6 एकर बाग तर जगलीच शिवाय या वर्षीच्या हंगामात 3 हेक्टर क्षेत्रातून 4 ते 5 लाखाचे उत्पन्न देखील येणार आहे. मोसंबी लागवडी नंतर घेतलेला हा पहिलाच बहार आहे. शिंदी परिसरातील विहिरीत डोकावलात तर तळ गाठलेल्या विहिरी दिसतात पण फळांनी लगडलेल्या मोसंबीच्या व द्राक्ष बागा, कांद्याची शेते मनाला भुरळ घालतात. ही किमया केलीय ती शेततळ्यांनी. शिंदी गावाला गवसलेले हे गुपीत आता आजूबाजूच्या गावातील शेतकर्यांना उमगले असून त्यांनीही शेततळे करायला सुरुवात केली आहे.
प्रतिक्रिया
युट्यूबरून शेततळ्याची प्रेरणा
युट्यूब वर शेततळ्यांच्या काही यशोगाथा पाहिल्या, ‘अॅग्रोवर्ल्ड फार्म’च्या अंकातही शेततळ्याची माहिती वाचायला मिळाली. त्यातूनच शेततळे तयार करण्याची प्रेरणा मिळाली. विहिरी आटून गेल्याने लाखो रुपये खर्चून उभी केलेली मोसंबीची बाग उन्हाळ्यात वाचवायचा प्रश्न समोर होता. शेततळे खोदून तर तयार केले पण प्लॅस्टिक अस्तरीकरणाचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी इम्बी जलसंचय कंपनीचे खानदेशातील डीस्ट्रीब्यूटर अनिल राजपूत यांचे सहकार्य मिळाले. तसेच तालुका कृषी अधिकारी येवले व कृषी सहाय्यक टी.आर. पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. या शेततळ्यामुळे माझे पाण्याअभावी संभाव्य लाखो रुपयाचे नुकसान तर टळलेच शिवाय यंदाच्या हंगामातून सुमारे 4 ते 5 लाख रुपये मिळणार आहेत.
- रणजीत आनंदराव देशमुख,
रा. शिंदी (गणेशपूर) मो.नं. 9503305625
दुष्काळात फळबाग वाचली
शेततळे खोदले आणि लगेचच त्याला अस्तरीकरण केले. त्यामुळे मागच्या दुष्काळी वर्षात त्याचा लाभ मला झाला. शेततळे नसते तर माझी मोसंबीची 500 झाडे पाण्याआभावी सुकून गेली असती. आता विहीर कोरडी असून 12 एकारापैकी आज मी 7 ते 8 एकर शेतात मोसंबी, कांदा, कापूस ही पिके घेऊ शकलो.
-संजय देशमुख,
मो.नं. 9970602679
तीस गुंठ्यात शेततळे केले
आम्ही मोसंबी बागायतदार आहोत. पूर्वी पाण्याची उपलब्धता खात्रीलायक असल्याने आमच्या बागा सुरक्षित होत्या. परंतु अलीकडे सततच्या दुष्काळामुळे बागा सुकून नष्ट होण्याची वेळ आली. मात्र शेततळे केल्याने आमच्या बागा वाचल्या. कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून आम्ही 30 गुंठ्यात शेततळे केले.
पुंडलिकराव देशमुख, मो.नं. 9960763773
बाष्पीभवन रोखण्यासाठी मार्गदर्शन
इम्बी पौंडलायनिंग पेपर 575 मायक्रोन जाळीचा असून एडीपी + एलडीपीचे 2 असे 7 लेअर आहेत. पेपरचा पना देखील मोठा म्हणजे 13.5 फूट आहे. तळे आटल्यानंतर उन्हापासून पेपरचे संरक्षण होणारे तंत्रज्ञान पेपर निर्मितीसाठी वापरले आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून तसे मार्गदर्शन शेतकर्यांना कंपनी पुरविते. पाण्यात सोडण्यासाठी कंपनी शेतकर्यांना 30 ते 35 फुटाची शिडी व 1 बाय 1 मीटर 17 मायक्रोन कागद मोफत दिला जातो. आता शेततळ्यात कागद मानवी हातांनी नव्हे, तर ऑटोमेटीक ट्यूनिंग मशीनने पसरविला जातो. त्यामुळे शेतकर्यांचा वेळ व मजुरीही वाचते.
- अनिल राजपूत,
इम्बी जलसंचय वितरक,
मोहाडी ता.जामनेर. जि.जळगाव
मो.नं. 8007316776
स्टोरी आऊटलाईन…
- शेततळ्यांनी शिंदी शिवाराचे चित्र पालटले.
- उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पण शिवार हिरवेगार.
- शिंदी शिवारात आहेत 121 शेततळे.
- 2017-18 या एकाच वर्षात विक्रमी शंभर शेततळ्यांची निर्मिती.
- शिंदीत तरुणांचा नोकरीपेक्षा शेतीकडे अधिक कल.
–