जळगाव (प्रतिनिधी) : शेतांमध्ये सध्या सर्वत्र पिकांच्या संरक्षणासाठी मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतकऱ्यांना हा मल्चिंग पेपर योग्य दरात खरेदी करता यावा म्हणून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (NHM) अंतर्गत शेतकऱ्यांना मल्चिंग पेपरसाठी 50 टक्के अनुदान दिले जात आहे.
सध्या शेती पध्दतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत. अत्याधुनिक पध्दतीचा वापर करुन केवळ उत्पादन वाढीसाठीच नाही तर त्यासाठी आवश्यक बाबींचाही विचार सरकारकडून केला जात आहे. ठिबक, स्प्रिंक्लर हा त्यामधलाच एक भाग आहे. आता फळझाडे, भाजीपाला तसेच वेगवेगळ्या पिकांभोवती अच्छादन रहावे तसेच पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास टाळला जावा व किड- तसेच रोगराईपासूनही पिकाचे संरक्षण व्हावे, यासाठी अलिकडच्या काळात या प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर वाढत आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होत आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टळत आहे. विशेष: भाजीपाल्यासाठी याचा वापर वाढत आहे. वाढता वापर लक्षात घेता शेतकऱ्यांना याची खरेदी योग्य दरात करता यावी म्हणून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत 50 टक्के अनुदान दिले जात आहे.
शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना राबवण्यात येत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही. शिवाय त्याबद्दल अधिकची माहिती नसते. त्यामुळेच प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी असलेल्या 50 टक्के अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा? याची अनेकांना माहिती नसते.
कसे आहे अनुदान
मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पिकांमध्ये तण वाढत नाही. शिवाय किड व रोगराईचा प्रादुर्भावही होत नाही. सर्वसाधारण क्षेत्रसाठी प्रति हेक्टरी वापरासाठी 32 हजार रुपये खर्च येत असून या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत या खर्चाच्या 50 टक्के जास्तीत जास्त रुपये म्हणजेच 16 हजार प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते. तर डोंगराळ भागासाठी खर्च हा 36 हजार 800 रुपये ठरवून याच्या 50 टक्के रक्कम अदा केली जाते. यामध्ये शेतकरी वैयक्तिक लाभ घेऊ शकतो तसेच शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य केले जाते.
ऑनलाईन नोंदणी करतांना आवशश्यक कागदपत्रे
ऑनलाईनसाठी सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर नोंदणीसाठी 7/12, 8-अ, आधार कार्डची झेरॅाक्स, आधार कार्ड हे बॅंकेशी संलग्न असल्याच्या पासबुकची झेरॅाक्स असणे आवश्यक आहे.
मल्चिंग पेपरचा वापर
साधारणपणे 3 ते 4 महिने कालावधी असलेल्या पिकांसाठी 25 मायक्रॅान जाडीच्या यु. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्मचा पेपर गरजेचा आहे. यामध्ये भाजीपाला, स्ट्रॉबेरी यासरख्या पिकांना संरक्षण देता येते. तर मध्यम कालावधी म्हणजे 11 ते 12 महिन्यांच्या फळपिकांसाठी 50 मायक्रॅान जाडीचे यु. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्मचा पेपर उपयोगी ठरणार आहे. तर त्यापेक्षा जास्त कालावधी असलेल्या पिकांसाठी 100/200 मायक्रॅान जाडीचे यु. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्मचा पेपर घेतला तर अधिकचे फायद्याचे राहणार आहे.
अनुदानासाठीचा पाठपुरावा
शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर मल्चिंग फिल्म खरेदी करावी. अनुदानाची रक्कम ही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी स्तरावरून (PFM) प्रणालीद्वारे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होईल.