शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक चांगली बातमी आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाची नवी मान्सून प्रणाली विकसित होत आहे. त्यामुळे मध्य भारतासह देशाच्या बहुतांश भागात सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस सुरू राहील. गेल्या 2 दिवसात थंडावलेला राज्यातील पाऊस उद्या, बुधवार, 13 सप्टेंबरपासून पुन्हा जोर धरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. बुधवारी, गुरुवारी विदर्भातील बहुतांश भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मान्सून आता पुन्हा एकदा बंगालच्या खाडीत मंथन करण्यास तयार झाला आहे. नव्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल, मध्य भारत, उत्तर प्रदेश, केरळ व तटवर्ती कर्नाटकसह पश्चिम किनारपट्टी, तेलंगणा, ओडिशा आणि महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होईल. दरम्यान, किनारी कर्नाटक, चेन्नई, रायलसीमा भागात आजपासूनच ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या उत्तराखंडसह उत्तर प्रदेशातही विक्रमी पाऊस होत आहे. मध्य प्रदेश, बिहार-झारखंडमध्येही पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश आणि आजूबाजूला चक्रीवादळ तयार होत आहे. या चक्रीवादळातून पूर्व मध्य प्रदेश, दक्षिण छत्तीसगड आणि विदर्भात बंगालच्या उपसागरात एक लांबलचक कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत झाले आहे. येत्या 72 तासांत वायव्य बंगालच्या उपसागरात आणखी एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या नव्या मान्सून प्रणालीमुळे पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
राज्यात सक्रीय झालेला मान्सून उद्यापासून पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी वर्तवली आहे. 14 सप्टेंबरपासून 19 सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीतील आयएमडी मुख्यालयाने मात्र दक्षिण-पश्चिम मान्सून 21 सप्टेंबरपर्यंत मध्य आणि पूर्व भारतात सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या भागात तोवर जोरदार पावसाची शक्यता राहू शकते.
सध्या, विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरावर एल-निनोची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. एल-निनो 2024 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. परिणामी अनेकदा नैऋत्य मान्सून कमकुवत होण्याची भीती कायम राहते.
स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी देशाचा वायव्य भाग कोरडाच राहण्याची भीती व्यक्त केली आहे. पश्चिम राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यात पावसाची चिन्हे दिसत नाहीत. या राज्यांमध्ये मान्सून पुनरुज्जीवनाची अपेक्षा नाही. मात्र, पूर्व आणि मध्य भारतात पाऊस सुरूच राहील, कारण आता कमी दाबाची नवी प्रणाली विकसित होत आहे. मात्र, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य भारतातील इतर भागांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे एकूण तूट कमी होण्यास मदत होईल, असे पलावत यांनी सांगितले. हा पाऊस सध्याच्या पीक चक्रासाठी फारसा उपयुक्त नसला तरी रब्बी हंगामासाठी फायदेशीर आहे.
Comments 1