ज्ञानेश उगले, नाशिक
शेतीतील तरुणाईला नव्या पिकाचा ध्यास…. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका हाऊस, कांदा या नगदी पिकांचे आगार म्हणून ओळखला जातो. या भागातील तरुण शेतकरी पिकांची ही रुळलेली वाट सोडून नव्या पिकांकडे वळत आहेत. सायखेडा या बाजारपेठेच्या शिवारात शेती असलेल्या रवींद्र डेर्ले हे यातील ठळक उदाहरण. रवींद्र यांनी ऊस, कांदा, गाजर ही पारंपारिक पिकांची वाट न चोखाळता अत्यंत नवीन अशा केळी पिकाकडे मोर्चा वळवला आहे.
रवींद्र खंडेराव डेर्ले, वय वर्षे 33. मूळ गांव शिंगवे. एकूण 15 एकर वडिलोपार्जित शेती. ऊस, कांदा, टोमॅटो, गाजर, सोयाबीन ही पिके नेहमी घेतली जातात. गोदावरी नदीच्या काठालगत शेती असल्याने पाणी टंचाईची अडचण नाही. शेतीसोबतच गावालगतच असलेल्या सायखेडा बाजार समितीनजीक त्यांचे साईश्रध्दा कृषि उद्योग हे कृषि निविष्ठा विक्री केंद्र ही आहे. घरची शेतीची पार्श्वभूमी असली तरी रवींद्र यांनी शहादा येथील कृषि महाविद्यालयातून बीएस्सी ग्री व त्यानंतर गुजरातेतील सरदार कृषी नगर येथून एमएस्सी ग्री पदवी भाजीपाला उत्पादन शास्त्र विषयांत घेतली आहे. जाणीवपूर्वक कृषि शिक्षिण त्यातून प्रत्यक्ष शेती व परिसरातील अन्य शेतकर्यांना मार्गदर्शन अशी त्यांची वाटचाल सुरु आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना ; यासाठी मिळू शकते २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/SckaImzMZFk
नाविन्याची ओढ : रवींद्र डेर्ले यांची शिंगवे व लगतच्या म्हाळसाकोरे शिवारात शेती आहे. या शिवारातच महाराष्ट्रातील प्रसिध्द निफाड साखर सहकारी कारखाना राहिलेला आहे. एकेकाळी या कारखान्यामुळे या भागात फक्त उसाचे क्षेत्र होते. रवींद्र यांचेही उसाचे क्षेत्र आहे. हे पिक आता परवडत नसतांना ते पर्यायी पिकांचा शोध घेत होते. अन्य पिकांतही वाढता खर्च, मजुर टंचाई या आव्हानांसोबत शेती करतांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे जाणवत राहिले. नवीन काही करण्याची ओढ त्यांना खुणावत होती.
याबाबत अधिक माहिती देतांना रवींद्र म्हणाले की, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे सायखेडा येथे केळी या पिकाची लागवड या नवीन पिकाविषयी चर्चासत्राचे आयोजन केले होते. मूळचे जळगाव जिल्ह्यातील केळी हे पिक नाशिकच्या पूर्व भागात पावसाळी हंगामात चांगले येऊ शकते, असा सूर या चर्चासत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून समोर येत होता. यातून त्यांनी हे करुन पाहू असे ठरवले. सह्याद्री फार्म्सच्या टिमशी संपर्क साधला. म्हाळसाकोरे येथील दीड एकर क्षेत्रावर केळीचे पिक घेण्याचा निश्चय केला आणि जून 2021 मध्ये टिश्यूकल्चर केळी रोपांची लागवड केली.
तंत्र समजून घेतले : नाशिक भागात थंडीचे प्रमाण जास्त असल्याने जून महिन्यातील लागवड यशस्वी ठरेल असे तज्ज्ञांनी सांगितले होते. डिसेबर-जानेवारी पर्यंत झाड तयार होते व उन्हाळा सुरु होतांनाच फुलोरा व नंतर फळधारणा असे टप्पे येतात. आमच्याकडे पुरेसे पाणी आहे हा विचार करुनच लागवड केली. लागवड करण्याआधी धुळे जिल्ह्यात शिरपूर भागात काही चांगल्या शेतकर्यांकडे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्याकडूनही याचे तंत्रज्ञान समजून घेतले. नगर जिल्ह्यातील गोदाकाठाचा पट्टा असलेल्या नेवासा भागात जाऊनही केळीच्या बागांची पाहणी केली.
उसाकडून केळीकडे : रवींद्र म्हणाले, आम्ही पूर्वापार ऊस पिकाचे शेतकरी. मात्र अलीकडच्या काळात त्याची उत्पादकता घटली आहे. नाशिक भागातील मोजकेच कारखाने सुरु असतांना बाजाराचीही समस्या आहेच. ऊसतोडीला मजूर भेटत नाहीत. या परिस्थितीत ऊस पिकापासून मिळणारे उत्पन्न घटले आहे. 50 ते 60 हजार रुपये उसाला एकरी खर्च येतो. त्यातून जास्तीत जास्त 90 हजाराच्यावर उत्पन्न मिळत नाही. मला उसाला पर्यायी पिक हवे होते. केळीला किलोला 7 रुपये जरी मिळाले तरी ते चांगले परवडते. असे याचे अर्थशास्त्र तज्ज्ञांकडून समजले होते. केळी पिकाची बरीचशी माहिती मिळवल्यानंतर हेच पिक आता चांगले राहील असे वाटू लागले होते.
केळीचे शरीरशास्त्र : केळीला काळी जमीन चांगली मानवते. आम्ही मात्र काळी अधिक मुरुमाड जमिनीत लागवड उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही याकडे लक्ष दिले. आमच्याकडे मुरुमाड जमीन असल्याने रोजच पाणी द्यावे लागत होते. पाणी कमी पडत असल्याने शेजारच्या शेतकर्यांकडून पाणी घेतले. उसाच्या चिपटाची मल्चिंग केली. झळांचा त्रास होऊ नये म्हणून चारी बाजूंनी नेट लावून घेतले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन : लागवड झाल्यानंतर सह्याद्री फार्म्सचे अॅग्रोनॉमिस्ट प्रवीण ठाकरे यांनी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने लागवड क्षेत्राला भेट दिली आहे. ते वाढीची स्थिती, कामकाज याचे निरिक्षण करुन मार्गदर्शन करीत आले. या काळात त्यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापन, पिक संरक्षण, पाणी व्यवस्थापन याचे श्येड्यूल तयार करुन दिले. त्यानुसार पुढील व्यवस्थापन करीत आलो.
अन्नद्रव्य व्यवस्थापन : सुरुवातीला एकदा व त्यानंतर दीड महिन्याने एकदा असे दोन वेळा बेसल डोस म्हणून खते दिली. लागवड झाल्यानंतर मूळालगत 3 वेळा ड्रेंचिंग केली. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी 2 स्प्रे घेतले. ठिबक सिंचनातून विद्राव्य खते गरजेनुसार वाढीच्या टप्प्यात दिली. सुरुवातीच्या काळात महिन्यातून 2 वेळा शेणस्लरी दिली. आता केळी पिकाचे हार्वेस्टींग सुरु झाले आहे. आतापर्यंत वर्षभरात एकूण 15 वेळा शेणस्लरी दिली आहे. या सगळ्यांचा उत्पादन वाढीत तसेच गुणवत्ता वाढीतही उपयोग झाला आहे.
स्लरीमध्ये शेण, गोमुत्र, गूळ, दाळीचे पीठ हे बेसिक मिश्रण तर प्रत्येक वेळी गरजेनुसार पीएसबी (स्फुरद विरघळविणारे जीवाणू), केएसबी (पालाश विरघळविणारे जीवाणू) ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, मायकोरायझा या उपयुक्त बुरशींचा वापर केला. सह्याद्रीच्या तज्ज्ञांनी दिलेल्या श्येड्यूल मध्ये रासायनिक खतांचे प्रमाण कमी करुन जैविक खतांच्या वापराचे प्रमाण वाढवून घेतले. शेणखत आणि स्लरीच्या वापराचे चांगले परिणाम मिळाले.
कामगतीचे नियोजन : दर महिन्यातून किंवा कधी 15 दिवसांतूनही एकदा केळीच्या बुंध्याजवळील फुटी (पिले) काढीत रहावे लागते. त्याकडेही लक्ष दिले. पाण्याचे नियोजन केले.
फ्रुटकेअर महत्वाचे : हिवाळ्यात करप्याच्या नियंत्रणासाठी प्रमाणित कंपनीच्या बुरशीनाशकाचे 2 स्प्रे घेतले. केळीचे कमळ बाहेर येते. तिथूनच फवारणी सुरु करावी लागते. फ्रुट केअर या बाबीकडे या काळात जास्त लक्ष द्यावे लागते. याबाबत पिक सरंक्षणासाठीच्या फवारणीचे नियोजन केले. त्याचा खूपच चांगला उपयोग झाला. कमळ निघतांना थ्रीप्सच्या नियंत्रणासाठी पहिला स्प्रे स्पिनोसॅडचा घेतला. त्यानंतर कोन्टॉफचा घेतला. या प्रत्येक फवारणीत कमाब नावाचे सुक्ष्मअन्नद्रव्ये आधारित पोषक वापरत होतो. ज्याचा केळीच्या लांबीसाठी आणि गुणवत्तेसाठी चांगला उपयोग झाला. मागील जुलै महिन्यात 15 दिवस सतत पाऊस सुरु होता. या काळात करपा आदी रोगांच्या नियंत्रणासाठी प्रमाणित कंपनीच्या किडनाशकांचा वापर केला.
चांगली पूर्वतयारी महत्वाची
लागवडीच्या अगोदर जून (2021) महिन्यात या क्षेत्रावर ताग पेरला होता. ते नंतर गाडले त्यापासून हिरवळीचे खत मिळाले. ऑगस्ट महिन्यात रोटाव्हेटर व नंतर वखर वापरुन जमीन तयार करुन घेतली. 6 फुट अंतरावर बेड तयार केले. त्यानंतर 6 बाय 5 अशी लागवड केली. या अंतराने एकरी 1400 रोपे बसतात. माझ्या दीड एकर क्षेत्रात 1980 रोपे बसली. बेड तयार करतांना अगोदर चांगले कुजलेले 5 ट्रॉली शेणखत टाकले. 6 ऑगस्ट (2021)ला लागवड केली. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिलेली होती.
उत्तम पर्यायी पिक : अॅग्रोनॉमिस्ट प्रवीण ठाकरे म्हणाले की, केळी पिकासमोर जास्तीची थंडी हे एक मोठे आव्हान असते. थंडीमुळे होणार्या चिलिंग इंज्युरीमुळे उत्पादनावर विपरित परिणाम होतो. नाशिक भागात आपण जून ते ऑगस्ट या दरम्यान लागवडीची शिफारस करीत आहोत. यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये थंडी वाढण्याच्या अगोदर झाडाची व थंडी संपल्यानंतर घडाची वाढ होण्यास संधी मिळते. या शिवाय उन्हाळ्यातील पाणी व्यवस्थापन ही सर्वात महत्वाची बाब आहे. या काळात केळीला पाणी अजिबात कमी पडणार नाही याकडेही केळी उत्पादकांनी प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे. या बाबींकडे नीट लक्ष दिले तर नाशिक भागात इतर पिकांना एक चांगला म्हणून केळी पिक नक्कीच चांगले रुजू शकते.
केळी पिक : काही महत्वाचे मुद्दे : जून ते ऑगस्ट या काळातील लागवडीला आपल्या नाशिक भागात काहीच अडचण येत नाही हे या पहिल्या अनुभवांतून दिसून आले. केळी उत्पादनात पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन या सर्वात महत्वाच्या बाबी आहेत. उन्हाळ्यात प्रति दिनी प्रति झाड 20 लीटर पाणी देणे गरजेचे आहे. जमिनीच्या मगदुरानुसार यात थोडे कमी जास्त होऊ शकते. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी फ्रुट केयर ही बाब सर्वात महत्वाची आहे. यात थिनिंग (विरळणी) महत्वाची आहे. प्रति झाड 8 ते 9 बंच ठेवणे उपयुक्त ठरते. जितकी चांगली थिनिंग तितका प्लॉट हार्वेस्टींगसाठी लवकर तयार होतो.
केळीची निसवण
15 एप्रिल पासून केळीची निसवण चालू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात 20-25 झाडे निसवलीत. 15-20 जून पर्यंत 100 टक्के पूर्ण निसवण झाली. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हार्वेस्टींग सुरु झाली आहे. टप्याटप्याने ही काढणी होणार आहे. एकरी 36 टन इतके अपेक्षित उत्पादन आहे. यंदा बाजारभाव चांगले दिसत आहे. पहिल्या टप्प्याला प्रति किलोला बागेत 21 रुपये दर मिळाला आहे. यावेळी जीनैन ही केळीची व्हरायटी लागवड केली आहे. दुसर्या टप्प्यात पुन्हा खोडवा केळी लागवडीचे नियोजन करीत असल्याचेही रवींद्र डेर्ले यांनी सांगितले.
– रवींद्र खंडेराव डेर्ले, मूळ गांव शिंगवे. मो. 9975694313
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
Comments 2