शहादा : नंदुरबार जिल्हा कृषी विविधतेने समृद्ध, नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आणि भविष्याच्या दृष्टीने अमाप संधी असलेला जिल्हा असून, योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शेतकऱ्यांची संघटित शक्ती उभी राहिली, तर हा जिल्हा कृषी क्षेत्रात देशपातळीवर अग्रगण्य ठरू शकतो, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले. शहादा येथे आयोजित ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन व पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

‘ॲग्रोवर्ल्ड’ प्रभावी व्यासपीठ
सीईओ गोयल म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आयोजित होणारे ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन हे शेतकरी, कृषी तज्ज्ञ, नर्सरी, उद्योजक, विविध संस्था व बाजारपेठ यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या प्रदर्शनातून आधुनिक शेतीतील नवतंत्रज्ञान, उत्तम पद्धती (बेस्ट प्रॅक्टिसेस), एकात्मिक शेती, बाजार व्यवस्थापन व मूल्यवर्धन यांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असून, त्याचा थेट फायदा उत्पादनक्षमता व उत्पन्नवाढीस होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘गॉड गिफ्टेड’ नंदुरबार जिल्हा
नंदुरबार जिल्ह्याच्या कृषी वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकताना गोयल म्हणाले की, शहादा व नंदुरबार तालुके हे केळी, पपई, कापूस यांसारखी व्यावसायिक पिकांसाठी ओळखले जातात. धडगाव व अक्कलकुवा हा भाग भौगोलिक परिस्थितीनुसार विकसित पिकपद्धतीसाठी उत्तम आहे. तापी व नर्मदा खोरे, सुपीक माती व अनुकूल हवामान यामुळे नंदुरबार जिल्हा कृषीच्या दृष्टीने ‘गाँड गिफ्टेड’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोलर पंप, फूड प्रोसेसिंगवर भर
शासन व कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सोलर पंप योजना, मशरूम क्लस्टर, एकात्मिक शेती, एफपीओ (शेतकरी उत्पादक कंपन्या), सेंद्रिय शेती व फूड प्रोसेसिंग या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काळात एक्सपोर्ट, ग्रेडिंग, क्वालिटी टेस्टिंग व सर्टिफिकेशन यावर विशेष भर देण्यात येणार असून, जिल्ह्यात लवकरच फूड टेस्टिंग लॅब सुरू होणार असल्याची माहितीही गोयल यांनी दिली.
उल्लेखनीय कार्याचा गौरव
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात शेती, कृषी उद्योजकता, शेतकरी गट, एफपीओ, ग्रामपंचायती, कृषी विस्तारक व पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील शेतकरी व शेती व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲग्रोवर्ल्डचे प्रकाश पाटील यांनी केले. ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा समारोप सोमवारी करण्यात येणार आहे.
शेतकरी टिकावा व शेतीत नवं तंत्रज्ञान पोहोचावं या उद्देशाने १२ वर्षांपूर्वी ॲग्रोवर्ल्ड उपक्रम सुरू करण्यात आला. गेल्या ११ वर्षांत राज्यातील २५ ठिकाणी कृषी प्रदर्शने आयोजित करण्यात आली असून, शहाद्यातील प्रदर्शनाची व्याप्ती दरवर्षी वाढत आहे. ॲग्रोवर्ल्डमुळे शेतकरी व कृषी उद्योजकांना नवी ऊर्जा मिळत असून, नंदुरबार जिल्हा कृषी क्षेत्रात भविष्यात निश्चितच नवे शिखर गाठल.
– शैलेंद्र चव्हाण,
संयोजक, ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा
पुरस्कार विजेते :-
ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी उद्योजक पुरस्कार
जितेंद्र अर्जुन पाटील (शहादा), मधुकर तुकाराम पाटील (शहादा), माधव उर्वराज माळी (दुधाळे), राजाराम नथू पाटील (कोळवा), विश्वनाथ तांबडू पाटील (कुडावद).
ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट पुरस्कार
बलराम शेतकरी गट, तळोदा (उमेश विजय पाटील) व महात्मा फुले शेतकरी गट, वडफळी (विलवरसिंग कलाश्या पाडवी)
ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी पुरस्कार
धर्मेंद्र पंडितराव पाटील (बोराळे), मनोहर धनराज पाटील (खलाणे), मरत बाबुलाल पाटील (तिखोरे), नरेंद्र हिमतसिंग गिरासे (जावदा तर्फ बोरद), पुरुषोत्तम संमू पाटील (मामाचे मोहिदं), संगा राजमापटले (कुंभरी), योहान अरविंद गावित (भवरे)
ॲग्रोवर्ल्ड आदर्श फार्मर प्रोड्यूसर कंपनी पुरस्कार
अविनाश पाटील (पातोंडा), मनोज पाटील (वावद)
ॲग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन पुरस्कार
सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (सीएफआर), पिपळखुट, ता. धडगाव
ॲग्रोवर्ल्ड आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार
बामखेडा, तळवे, भुजगाव, मोरखी, कात्री, हरनखुरी
ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी विस्तारक पुरस्कार
जितेंद्र रोहिदास सोनवणे, संदीप देवसिंग कुंवर
ॲग्रोवर्ल्ड वन व वन्यजीव संरक्षक पुरस्कार
सागर निकुंभे (शहादा)











