नांदेड : शेत तळ्याच्या पाण्यात फूलवली मोत्याची शेती… जिल्ह्याच्या कंधार तालूक्यातील शेल्लाळी येथील भास्कर मारोती केंद्रे, विश्वनाथ मारोती केंद्रे या दोघा भावंडांनी आपल्या शेतीत शेत तळ्याच्या पाण्यात मोत्याची शेती हा नवीन प्रयोग यशस्वी करुन विविध कलाकृतीत शिंपल्यातून मोत्याचे भरघोस उत्पादन घेतले आहे. वर्ष 2021 ला त्यांनी एका शेत तळ्याच्या पाण्यात 6300 शिंपले बिजांकूर सोडून त्याचे संगोपन केले होते. एका वर्षानंतर त्यापासून जवळपास एका शिंपल्यात दोन मोती याप्रमाणे एकूण 12,000 मोती उत्पादन घेतल्या गेले. त्याच्या विक्रीतून 15 लाख रुपये मिळाले तर 6 लाख रुपये उत्पादन खर्च जाता 9 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला होता. यंदा दोन शेत तळ्याच्या पाण्यात एकात 12,000 तर दुसर्यात 7000 शिंपले बिजांकूर सोडून देऊन त्याचे संगोपन चालू आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालूक्याचा बहुतांश भूभाग हा डोंगराळ खडकाळ आहे. अशाच डोंगराळ स्वरुपाच्या परिसरात कंधार-मुखेड रोडवर शेल्लाळी हे जवळपास 2000 लोकसंख्या असलेलं गाव आहे. गावशिवाराची जमीन डोंगराळ खडकाळ असून येथील शेतकरी खरीपात सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, ज्वारी ही पिके घेत असतात. तर काही शेतकर्यांनी कमी पाण्यात येणारी फळबाग लागवड केलेली आहे. डोंगराच्या खडकाळ जमिनीवर आपोआप उगवलेली गावरान सिताफळ झाडे आहेत. दरवर्षी या भागातील बरेच जण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात डोंगरावरील झाडाची पाडाला आलेली सिताफळ तोडून आणून ते पिकवून मुख्य रोडच्या काठावर बसून विकतात. यातून काही दिवस अनेकांना रोजगार मिळत असतो. शिवाय बरेचशे शेतकरी शेतीत काही नवनवीन प्रयोग देखील राबवत असतात. शेल्लाळी येथील भास्कर व विश्वनाथ केंद्रे यांनीही आपल्या शेतीत 30 बाय 30 मिटर आकाराचे दोन शेततळे खोदून घेतले आहेत. यातून एक स्वतः तर एक शेततळं रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदले आहे. केंद्रे यांची शेल्लाळी शिवारात एकूण 15 एकर डोंगराळ खडकाळ जमीन आहे. खरीपात ते सुुध्दा इतर शेतकर्यांप्रमाणे सोयाबीन, कापूस, ज्वारी व अन्य पिके घेतात. परंतु गत दोन वर्षापासून त्यांनी प्रयोग म्हणून गोड्या पाण्यातील मोत्याची शेती करण्यास सुरुवात केली आहे. त्यातून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळून त्याच्या विक्रीतून वर्षाकाठी लक्षावधी रुपये निव्वळ उत्पन्न मिळवत आहेत.
2021 ला पहिला प्रयोग
शेतकरी भास्कर केंद्रे हे औरंगाबाद (संभाजीनगर) येथे काही दिवसापासून एका खासगी शाळेवर सुपरवायझरची ड्युटी करतात. त्या दरम्यान त्यांना संभाजीनगरा जवळील करमाड गावातील शेतकर्यांनी सुरु केलेली मोत्याची शेती पहावयास मिळाली. तेथील मोती उत्पादक शेतकर्यांना औरंगाबादमधील धनश्री पर्ल फार्मिंग कंपनी शिंपले व बिजांकूराचा पुरवठा या कंपनीचे मालक बबन सानप यांच्याशी केंद्रे यांचा संपर्क आला. चर्चेतून मोत्याच्या शेती विषयी प्रशिक्षणपर माहिती जाणून घेतली आणि आपल्या गावाकडील शेतीतील शेत तळ्याच्या पाण्यात मोत्याची शेती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर त्यांनी आपल्या शेतीत असलेल्या एका शेततळ्यात गत वर्षी कंपनीकडून 6300 शिंपले बिजांकूर प्रति शिंपला 90 रुपये प्रमाणे खरेदी करुन सोडले. एका वर्षानंतर पहिला क्रॉप यशस्वी करुन मोठ्या प्रमाणावर मोती उत्पादन झाले. ते मोती त्यांनी परत कंपनीला प्रति शिंपला 350 रुपये प्रमाणे विक्री केले.
असे होते जिवंत शिंपल्याचे संगोपन
सुरुवातीला जुन-जुलै मध्ये शेततळ्यात विहीरीतील गोडे पाणी कृषी पंपाच्या साह्याने सोडून ते भरुन घेतले जाते. त्यानंतर कंपनीकडून खरेदी करुन आणलेले शिंपले बिजांकूर पाण्यात सोडले जाते. यानंतर शिंपल्यातील जिवंत बिजांकूर कीटकाच्या खाद्यासाठी स्पिरुलीना (शैवाळ)च्या गोळ्या व काही प्रमाणात सुपर फॉस्फेट पावडर रात्रभर पाण्यात भिजवून शेत तळ्याच्या पाण्यात टाकतात. शिंपल्यातील जिवंत किटकाचे खाद्य शैवाळ असते. त्या व्यतीरीक्त दुसर्या कोणत्याही खाद्याची गरज पडत नाही. तसेच पाण्यात कायम ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी मत्स्य मासे बिज सोडले जाते. मासे पाण्यात ऑक्सिजन तयार करतात. शिंपल्यातील जिव जगवण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असते. म्हणून पाण्यात मासे असणे गरजेचे असते.शेत तळ्याच्या पाण्यात शिंपले बिजांकूर जाळीला बांधून लोंबकळत ठेवल्यानंतर काही ठराविक दिवसानंतर शिंपले बाहेर काढून त्याची शस्त्रक्रिया केली जाते. शिंपल्यातीलवरच्या भागातील पापुद्रा हलक्या स्वरुपात एका छोट्या पकडीने हळूवार फाकवून विशेष कलाकृतीचे मोती निर्माण होण्यासाठी गणपती, बौद्ध व अन्य मुर्ती अकाराचे साचे टाकून शस्त्रक्रिया होते. जेणेकरुन वरच्या भागाच्या पापूद्र्यामध्ये मोती तयार होत असतात. तेथून पुढे बारा महिन्याला परिपक्व मोती विशेष कलाकृतीत तयार होतात. त्यानंतर सदर शिंपले कंपनीला विक्री केली जातात. या प्रमाणे वर्षातून एकच मोत्याचा क्रॉप निघत असतो.
दागिन्या प्रमाणेच नैसर्गिक मोत्याला आहे मोठी मागणी
गळ्यातील हार, हिरेजडीत टोप व पेहराव पोशाख बनवण्यासाठी मोत्याचा वापर होत असतो. त्यामुळे कृत्रिम मोत्यापेक्षा शिंपल्यातील नैसर्गिक मोत्यास स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आपल्या देशात नैसर्गिक मोती अतिशय कमी प्रमाणात उत्पादीत होत असल्यामुळे बाहेर देशातून कृत्रिम व नैसर्गिक मोत्याची आयात करावी लागते आहे. त्यामुळे आपल्या भारत देशाच्या शेतीत मोत्याची शेती करुन त्यापासून सुंदर, आकर्षक नैसर्गिक मोती उत्पादन होणे आवश्यक आहे. सुरुवातीला किचकट वाटणारी मोत्याची शेती अनुभव आल्यावर अगदी कमी खर्चाची आणि सोपी आहे असा केंद्रे यांचे म्हणणे आहे.
तर हमखास उत्पन्न
आमच्या गावकडची शेल्लाळी येथील शेती ही डोंगराळ खडकाळ आहे. त्या जमीनीत संपूर्ण बागायती पिके घेण्यासाठी भरपूर असा पाण्याचा कायम स्त्रोत नाही. त्यामुळे काही पिके घेण्यासाठी आम्ही एक शेततळं खोदलं होतं. परंतु त्यातील थोडक्या पाण्यात किती बागायती येणार? असे वाटायचे. मी औरंगाबाद संभाजीनगर भागातील करमाड येथे मोत्याची शेती पाहीली. त्यातून प्रेरीत होवून गावी आपणही मोत्याची शेती करावी, असे ठरवले व वडील व भाऊ यांना मोत्याची माहिती देवून प्रारंभ केला. सुरुवातीला यशस्वी होईल की नाही? असी चिंता होती. पण धनश्री पर्ल फार्मिंग कंपनीच्या प्रतिनिधी टिमने सर्व प्रात्यक्षिक समजावून सांगितले. त्यांना करवून दिले. त्यामुळे मोत्याची शेती करण्यास अडचणी आल्या नाहीत. कमी जागेत (हौद) कमी पाण्यात देखील मोत्याची शेती करता येवू शकते. शेततळं असेल तर उत्पादन अधिक घेऊन नफा शुध्दा मोठाच मिळतो. आम्ही एकाच वर्षाच्या उत्पादनात 9 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळविले असून या वर्षी 25 ते 30 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आशा आहे. यात सर्वच शिंपल्यातील जिव जिवंत राहतील याची शाश्वती नसते. संगोपनात एखाद्या बाबीची उणीव झाल्यास 20 ते 50 टक्यापर्यंतही शिंपल्यातील जिव मृत होवून मोत्याचे उत्पादन घटत असते. तरी खचून न जाता सातत्य ठेवणे तितकेच महत्वाचे आहे. आम्ही आता इतरही शेतकर्यांनी मोत्याची शेती करुन लाखो रुपये उत्पन्न घ्यावे. यासाठी शेतावर मोत्याची शेती या विषयी अनुभवानुसार शिंपले मोती संवर्धन शेतकरी मेळावे घेऊन माहिती देत आहोत. प्रत्येक शेतकर्यांनी आपल्या शेतीत लहान मोठे जागेच्या उपलब्धतेप्रमाणे शेततळं तयार करुन मोत्याची शेती केल्यास हमखास उत्पन्न मिळवता येते.
– भास्कर मारोती केंद्रे
शेल्लाळी, ता. कंधार, जि. नांदेड.