नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मोसमी पावसाचा, म्हणजेच मान्सूनचा मुक्काम लांबला आहे. अजून परतीचा पाऊस (रिटर्न मान्सून) सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज IMD आयएमडी महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला आहे. पावसाचा माघारीचा प्रवास लवकर सुरू होणार असल्याचा गेल्याच आठवड्यातील अंदाज सुधारून आयएमडीने ही घोषणा केली. त्यामुळे परतीचा मान्सून किमान 17 सप्टेंबरपर्यंत तरी रेंगाळणार असून राज्यासह देशाच्या बऱ्याच भागात या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाने मान्सूनचा मुक्काम लांबला
बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या आतापर्यंत कोरड्या राहिलेल्या भागांमध्येही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. महापात्रा म्हणाले, “नैऋत्य मान्सून लवकर माघारीची अपेक्षा होती. मात्र, पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाचे परिवलन 7 सप्टेंबरच्या सुमारास मॉन्सूनचा प्रवाह दक्षिणेकडे वळवेल. यामुळे मध्य आणि उत्तर द्वीपकल्पीय भारतामध्ये पावसाचा वेग वाढेल.”
याआधी जाहीर केला होता लवकर माघारीचा अंदाज
आयएमडीने यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी, जाहीर केलेल्या अंदाजात 17 सप्टेंबरच्या नेहमीच्या तारखेच्या तुलनेत, नैऋत्य मान्सून लवकर म्हणजे, या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात माघारी जाण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, कालच्या सुधारित अंदाजात, सध्या मान्सून लवकर माघारी घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल नाही, असे सांगण्यात आले आहे. बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल कोरडेच
यंदाच्या मान्सूनमध्ये, जूनपासून ऑगस्टअखेर देशभरात सहा टक्के जास्त पाऊस झाला. तथापि, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मणिपूर, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या प्रदेशात खरीप हंगामातील भात उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. आता सप्टेंबरमधील वाढीव मुक्कामात उत्तर प्रदेश, बिहारसह ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये पावसाची तूट भरून निघण्यास मदत होऊ शकते, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
देशभरात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता
संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे, असेही महापात्रा यांनी म्हटले आहे. सप्टेंबर महिन्याची दीर्घ कालावधी सरासरी 167.9 मिमी इतकी आहे. यंदाच्या सप्टेंबरमध्ये त्या तुलनेत अंदाजे 109 टक्के जास्त पावसाची शक्यता आहे. “ईशान्य भारतातील काही भाग वगळता भारतातील बहुतेक भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. पूर्व आणि वायव्य भारतातील काही भागातही सामान्य सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे,” असेही महापात्रा यांनी स्पष्ट केले.
मध्य भारतातील तापमानात वाढ
पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात दिवसाचे तापमान सरासरीहून कमी राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, मध्य आणि वायव्य भारतातील काही भागात सरासरी कमाल तापमानापेक्षा आता दिवसाचे जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
विदर्भ, मराठवाड्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; “या” 10 जिल्ह्यांत आयएमडीने जारी केला यलो ॲलर्ट
भारतात मान्सून लवकरच.. अखेर IMD चेही शिक्कामोर्तब..