हैदराबाद : भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित मानली जाते. देशाच्या “जीडीपी”मध्ये कृषी क्षेत्राचे योगदान सुमारे 17.5 टक्के आहे. ताज्या जागतिक अन्न संकटामुळे या क्षेत्राचे महत्त्व आणखी वाढले आहे. अशात देशातील केंद्र व बहुतांश राज्य सरकारे शेतकरी हिताच्या फक्त वल्गना करतात; मात्र आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी यांच्या “वायएसआर” सरकारने शेतकरी हिताची काळजी कृतीतून दाखवून दिली आहे. आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना मोफत पीक विमा योजनेचा लाभ मिळतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकार विमा हफ्ता भरते. यंदा सलग तिसऱ्या वर्षी सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा विमा हफ्ता अदा केला आहे.
तिरुपती जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
आंध्र प्रदेशातील रिथु भरोसा केंद्रांद्वारे सर्व पिकांची ई-पिकांमध्ये नोंदणी केली जाते आणि त्यांना विमा योजनेचे संरक्षण मिळते.गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात विविध कारणांमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई देण्यात आली. त्या कार्यक्रमात तिरुपतीचे खासदार डॉ एम गुरुमूर्ती यांनी आंध्र सरकारच्या या शेतकरी हिताच्या योजनेची विस्तृत माहिती माध्यमांना दिली. गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीपोटी तिरुपती जिल्ह्यातील 5,297 शेतकऱ्यांच्या खात्यावर 3.58 कोटी रुपये जमा करण्यात आले.
शेतकरी सन्मानाने जगण्यास होतेय मदत
राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मोफत दिला जात असल्याने नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना शेती सुरू ठेवण्यास मदत होते. शेतकरी खचून जात नाही, कोलमडत नाही. त्याला आर्थिक भांडवलासाठी कुठे हात पसरण्याची वेळ येत नाही. त्यामुळे आंध्रातील शेतकरी सन्मानाने जीवन जगत आहे. आंध्र प्रदेशातील 80 टक्के लोकसंख्या शेतीशी निगडीत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत करावी, असे वाटते, असे खासदार गुरुमुर्ती यांनी सांगितले.
The Government of Andhra Pradesh has provided the benefit of Free Crop Insurance to the farmers. Under this scheme, the state government pays the insurance premium for the crop insurance of the farmers.