दीपक देशपांडे, पुणे
आधुनिक शेती करून 20 लाखांचे वार्षिक उत्पन्न देणारी ही नाशिक जिल्ह्यातील यशोगाथा आपल्याला नक्कीच प्रेरित करेल. इगतपुरी तालुक्यातील शेनित या 1,500 लोकवस्तीच्या गावात जाधव कुटुंब सेंद्रीय गूळ उद्योग, ऊस नर्सरीसह अनेक प्रयोग करत आहे. जाणून घेऊया जाधव कुटुंब करत असलेले अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रयोग आणि त्यांची यशोगाथा …
नाशिक जिल्हा तसा सुजलाम सुफलाम असलेला जिल्हा. नाशिक नाव उच्चारताच डोळ्यासमोर द्राक्ष उत्पादक, निर्यातदार व वाईन उत्पादक शेतकरी नजरेसमोर येतात. याशिवाय, कांदा उत्पादक शेतकरी व राज्यातील सर्वांत मोठे लासलगाव कांदा मार्केटही सर्वांच्या नजरेसमोर येते. जिल्ह्यात चांगला पाऊस पडतो. अगदी सरासरी 1600 मिमीपेक्षाही जास्त, त्यामुळे शाश्वत शेती उत्पादनातून या जिल्ह्यातील शेतकरी सधन आहे. अर्थात जिल्ह्यात कमीत-कमी व जास्तीत-जास्त जमीनधारक, जमीनदार आहेतच. शेतीत निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसानही आहेच; पण जिद्दी शेतकर्यांनी त्यावरचा कायम उपाय म्हणून शेतीपूरक व्यवसाय सुरु केले आहेत. अशाच एका शेतकर्याच्या यशस्वी शेतीची माहिती आपण पाहणार आहोत. या यशोगाथेतील एक भाऊ पीएचडी तर दुसरा कृषी तंत्रज्ञान पदविकाधारक आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील शेनित या 1,500 लोकवस्ती असलेल्या गावातील जाधव कुटुंबीयांची ही यशोगाथा आहे. इगतपुरी व नाशिक तसेच सिन्नरपासून जवळपास सारखेच अंतर असलेल्या या गावातून दारणा व कडवा या दोन नद्या वाहतात. या दोन्ही नद्यांवर धरणे आहेत, एकावर मातीचे तर दुसर्या नदीवर दगडी धरण आहे. धरणाखाली सुमारे 10 कि.मी.वर या दोन्ही नद्यांच्या संगमावर त्रिकोणामधे विखुरलेल्या स्वरुपात जाधव कुटुंबीयांची 8+9+5+1.5+1.5 अशी एकूण जवळपास 25 एकर जमीन आहे.
जाधव कुटुंबातील दोघेही भाऊ उच्चशिक्षित
प्रकाश विश्राम जाधव हे 56 वर्षीय शेतकरी कुटुंबप्रमुख आहेत. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. त्यांना दोन मुले व एक मुलगी असा परिवार असून सर्वजण विवाहित आहेत. दोन मुलांपैकी, मोठा मुलगा प्रविण (वय 32) हा एमटेक पीएचडी आहेत. फार्म मेकॅनिझम पॉवर इंजिनिअरिंग असा शेतीशी निगडित त्यांचा उच्च शिक्षणाचा विषय आहे. शेती-तंत्रज्ञानवरील त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी आधुनिक शेतीमधील तंत्रज्ञान याविषयी एक पुस्तकही लिहिले आहे. ते नाशिकमधील एका बँकेत सेवेत आहेत. तर लहान भाऊ गोकुळ (30) याने राहुरी कृषी विद्यापीठातून अॅग्रीकल्चर डिप्लोमा तसेच बीएस्सी हॉर्टिकल्चरचे शिक्षण पूर्ण केले आहे. वडील, दोघे भाऊ व घरातील तिन्हीही स्त्रिया असेही सहाही जण मिळून एकत्रित शेती करतात.
जाधव कुटुंब अनेक पुरस्कारांचे धनी
जाधव कुटुंबीयांच्या एकूण जमिनीपैकी निम्मी जमीन काळी व अत्यंत सुपीक; पण नोव्हेंबर अखेरपर्यंत चिबडे असणारी तर उर्वरित जमीन ही गोटे, दगड असणारी हलकी, मुरमाड व लालसर अशी आहे. विखुरलेल्या या शेतात पिकांना पाणी पुरवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तीन विहीरी आहेत. एक 100X100X10 फूट आकाराचे शेततळे असून त्याला 5 फूट खोलीवर पाणी लागले आहे. पारंपरिक पिकामधे ऊस 10 एकर, तांदूळ तीन प्रकारचा तीन एकर व द्राक्षे 2 एकर क्षेत्रात आहे इतरत्र कांदा एक हेक्टर, भाजीपाला, वांगी, स्वीटकॉर्न, कोबी, कलिंगड व कोथिंबीर ही पीके घेतली जातात.
त्यांच्या घरचे गुर्हाळही होते, जे 10 वर्षापूर्वी बंद केले गेले. प्रकाश जाधव हे नाशिक साखर कारखान्याचे सभासद होते. तर प्रकाश जाधव यांच्या पत्नी सौ. लता जाधव या 2008 ते 2013 पर्यंत या कारखान्याच्या संचालिका होत्या. त्यांना कृषिथॉनचा आदर्श महिला शेतकरी पुरस्कारही मिळालेला आहे. तर सध्या शेती करणारे गोकुळ यांनाही दैनिक देशदूतचा तेजस युवा शेतकरी व उत्तर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज युवा पुरस्कारही मिळाला आहे.
👆 स्पेस सेव्हींग, इनोव्हेटिव्ह, स्टायलिश मॅजिक फोल्डेबल हँगर्स SHAYONAM® Shynm Multi Hanger डील ऑफ दी डे : सेट फक्त 349₹!
15 एकर जमिनीवर ठिबक सिंचन
शेतात व विभागात चांगले पाणी असतानाही मे महिन्यात जाधवांच्या शेतात पाणी कमी पडते असे. त्यामुळे तीन-चार वर्षांपूर्वी दोन भावांनी वडिलांच्या परवानगीने सुमारे 15 एकर जमिनीवर ठिबक सिंचन केले. ढोबळी मिरची, काकडी, वांगी, टोमॅटो उत्पादनसाठी प्रथम मल्चिंग व नंतर शेडनेट, ग्रीनहाऊस वापरणे सुरु केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा
शेतात अवलंब करताना बैलावरील शेती बंद करुन यांत्रिकीकरण केले आहे. सध्या त्यांच्याकडे एक मोठा व एक लहान असे दोन ट्रॅक्टर, मशागतीसाठी करण्यासाठी लागणारी सर्व छोटी यंत्रे, पाणीपुरवठा ऑटोमायजेशन, कटर व इतर औजारे आहेत. तर शेडनेट मधे स्प्रेअरचा वापर केला आहे.
ऊसाच्या नर्सरीचा अनोखा प्रयोग
2017-18 पासून ऊस रोपवाटिका (नर्सरी) सुरू केली. त्यासाठी नोव्हेंबरपासुन शेतकर्यांकडून नोंद घेणे, इसार घेणे व त्यानुसार शेतकर्यांना अपेक्षित ऊसजातीच्या डोळ्यांची लागवड कोकोपिटमधे करणे सुरु झाले. त्यासाठी लागणारा ऊस लागवड करण्यात आली. ऊस लागवड करताना जाधव यांनी शेतात प्रथम खोल नांगरट करुन घेतली. दोन पाळ्या घालून तिसर्या पाळीपूर्वी जमिनीत एकरी 250 किलो निंबोळी पेंड, 10:26:26 दोन बॅग, एमओपी 2 बॅग, कार्बोफ्युरॉन (कीटकनाशक) 2 किलो या प्रमाणात टाकून 5 फुटाच्या सरी काढुन घेतल्या. ऊस रोपे सरीवर लागवडीपूर्वी बाविस्टीनच्या द्रावणात बुडवुन घेऊन 6 ते 8 इंच अंतरावर लागवड केली.
सालकरीऐवजी रोजंदारीवर आहेत गडी
जाधव यांच्या शेतात सालकरी (सालगडी/सालदार) गडी नाहीत. त्याऐवजी 300 रू. रोजाने कायमस्वरूपी दोन गडी ठेवले आहेत. तर गरजेनुसार रोजंदारीवर महिला मजूर व गडी बोलावले जातात. मात्र, सर्वत्र असलेल्या मजूर टंचाईचा जाधव कुटुंबालाही सामना करावा लागतो. यामुळे प्रविण व गोकुळ बंधूंनी भाजीपाला नर्सरी सुरू केली. सोबतच नवीन प्रयोग म्हणून ऊस नर्सरीचा नाशिक जिल्ह्यातील पहिला प्रयोगही त्यांनी पाच वर्षांपूर्वी सुरू केला आहे. दरवर्षी या रोपांना मागणी वाढत आहे. त्यामुळे आगाऊ नोंदणी करणार्या शेतकर्यांना रोपे पुरवली जातात. या भागात सर्वसाधारणपणे डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंत ऊस लागवड होते. ऊसाचे उत्पादन सरासरी 55 ते 60 टन एकरी आहे. तर 2,600 ते 2,800 रु. टन भाव मिळतो. नाशिक सह. साखर कारखाना बंद असल्याने या भागातील सर्व ऊस संगमनेर व प्रवरा येथील कारखान्यास दिला जातो.
पॉलिहाऊसबाबत घेतले प्रशिक्षण
गोकुळ व त्यांचा परिवार साधारणपणे 265, 86032 व 8005 या वाणांची लागवड करीत आला आहे. तर यावर्षी 92005 या वाणाची लागवड सुरु केली आहे. यावेळी वरील सर्व वाणांची मिळून 6 एकर क्षेत्रावर लागवड होणार आहे. गोकुळ यांनी 2015 मध्ये पॉलिहाऊस उभारणी केली. मात्र, त्यासाठी त्यांनी तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हॉर्टिकल्चर संस्थेत प्रशिक्षण घेतले. पॉलिहाऊसमध्ये सर्वप्रथम रंगीत ढोबळी मिरची लागवड केली. उत्पादनही चांगले मिळाले. मात्र, विक्रीसाठी अडचणी आल्या व अपेक्षित किंमतही मिळाली नाही. त्यामुळे 2016 पासून हिरवी ढोबळी मिरची लागवड व नंतर काकडीची लागवड अशी दोन पीके घेण्यास त्यांनी सुरवात केली. ती आजपर्यंत सुरू आहे.
अनेक मिश्र पिकांचेही उत्पादन
दोन ओळीत 5 फूट अंतर असल्याने या जागेवर कधी कोथिंबीर तर कधी वांगी तर कधी कांदा-लसूण, तर कधी सोयाबीन लागवड करुन चांगले उत्पन्न घेतले. कधी-कधी ऊसाच्या पैशापेक्षा या पिकापासुन जास्त उत्पन्न मिळाले. लॉकडाऊनपूर्वी एक वर्ष आधी नेटाफेम कंपनीची ड्रिप लाईन 10 एकरवर बसवून घेतली. जैन इरिगेशनची लाईन द्राक्ष पिकांसाठी व महिंद्राची ड्रीप लाईन ऊस व पॉलिहाऊससाठी वापरली जाते. ऊसाला प्रत्येक तीन आठवडे ते एक महिन्याला खताचा एक डोस याप्रमाणे एकूण 6 ते 7 डोस दिले जातात. त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे – युरीया 2 बॅग, 18ः46 दोन बॅग, पुन्हा युरीया 2 बॅग व 10ः26ः26 दोन बॅग, नंतर 19ः19ः19, सिक्स बीए 20 पीपीएम. व जीए 20 पीपीएमची फवारणी केली जाते. तर 21 दिवसांनी ऊसामधे निंदणी केली जाते किंवा तणनाशक (तमर) व टू फोर डी फवारणी केली जाते. चार महिन्याने पुन्हा एकदा तीन वेळा वरील खतांचे डोस दिले जातात. जूनच्या पहिल्या आठवडयाच्या आत खत देणे संपवले जाते. साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा ऊस रोपवाटिकेसाठी वापरला जातो. तर उर्वरित ऊस कारखाना 2,500 रु. प्रती टन या दराने घेऊन जातो.
अशा पद्धतीने केली जाते ऊस रोपांची निर्मिती
ऊसाच्या नर्सरीतील ऊस तोडल्यानंतर त्याचे डोळे 20 ते 25 मिमीचे काढले जातात. ऊसाचे डोळे काढण्यासाठी 2016 साली सुमित टेक्नॉलॉजी कंपनीचे मशीन घेतले आहे. त्यामुळे ऊसाचे डोळे व्यवस्थित व एकसारखे निघतात. डोळे काढल्यानंतर ते कोकोपिटमधे लावले जातात. पॉटमधे कोकोपिट टाकतानाच ट्रायकोडर्माचे ड्रिंचिंग केले जाते. 5 ते 6 दिवसात 98 ते 99 टक्के जर्मिनेशन होते. पुन्हा 19:19:19, 0:52:34 व फेरस 200 लिटर पाण्यात, 500 ग्रॅम खत टाकून रोपांना स्प्रे केला जातो. मागणीनुसार रोपे देताना 24 तास आधी रोपे नेटच्या बाहेर आणून बाहेरील वातावरणात ठेवली जातात.
सेंद्रीय गूळ प्रकल्प व कृषी पर्यटनाच्या भविष्यात योजना
भविष्यातील योजनांबाबत वडील प्रकाश जाधव व गोकुळ जाधव सांगतात, ऊसावर प्रक्रिया करुन सेंद्रीय गूळ व गूळ पावडर उत्पादन प्रकल्प उभा करण्याचा मानस आहे. प्रविण व गोकुळ बंधू म्हणाले, आमचा हा परिसर निसर्गसंपन्न आहे, त्याबरोबरच सभोवताली नाशिक, सिन्नर व इगतपुरी ही तीन मोठी गावे आहेत. त्यामुळे आम्ही कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्याच्या तयारीत आहोत.
यंदा होणार नऊ लाख ऊस रोपांची विक्री
तयार रोपांची विक्री 2.50 रु. प्रती नग याप्रमाणे जागेवर केली जाते. एखाद्या शेतकर्यास पोच हवी असेल तर 20 ते 25 पैसे प्रति नग जादाची आकारणी केली जाते. गेल्या दोन वर्षांत करोना असतानासुध्दा जवळपास सहा लाख रोपांची विक्री दरवर्षी झाली आहे. यावेळी मागणी वाढली असून जवळपास 8 ते 9 लाख रोपांची विक्री होईल असे वाटते. सध्या 86035, 8005 व नवीन 92005 या जातीच्या ऊसाची मागणी वाढत आहे. 265 ची रोपे सुद्धा विकली जातात पण त्यावर आता नवीन रोग आला आहे, ज्यात संपूर्ण ऊस लाल होतो. त्यामुळे आम्हीच शेतकर्यांना याविषयी माहिती देतो, असे गोकुळ जाधव सांगतात.
भारतातील एक अनोखे गाव जिथे दुकाने आहेत, पण दुकानदार नाही; आजवर कधीही झालेली नाही चोरी-लबाडी!
शेतकर्यांसाठी पीकनिहाय मार्गदर्शन केंद्र
जाधव कुटुंबीयांचे भाजीपाला उत्पादन चांगले असून यावेळी त्यांनी 20 गुंठ्यात 18 टन कोबीचे उत्पादन घेतले. नाशिक व मुंबई येथील मार्केटमध्ये भाजीपाला विक्री केला जातो. उन्हाळी कांदा, सोयाबीन व भात (साळ) जागेवर विकला जातो. याशिवाय गोकुळ यांनी शिवनेरी ग्रो केंद्र अधिकृतपणे शेतातील रस्त्यालगत सुरू केले असुन शेतकर्यांना त्यांच्या माल खरेदीनुसार पीकनिहाय मार्गदर्शन केले जाते. शेतात होणार्या खर्च व उत्पन्नाबाबत मात्र त्यांनी ठोस आकडेवारी न सांगता दरवर्षी सुमारे 10 लाख रुपये खर्च होतो, असे सांगितले. अर्थात गुंतवणूकही खूप आहे. बर्याच आग्रहानंतर सर्व खर्च वजा जाता किमान 20 लाख रुपये त्यांना मिळतात, असे सांगितले. यात कृषी सेवा केंद्रातील उत्पन्नाचा समावेश नाही.
अतिवृष्टीने कपाशीचे नुकसान; काय राहू शकतात कापूस दर? सविस्तर जाणून घ्या
शेतकर्यांना काय सल्ला द्याल?
शेती स्वत: करावी. स्वानुभवसंपन्न होत असताना पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली, तर शेती फायद्याची ठरते. मात्र, यापुढे नोकर किंवा मजुरावर अवलंबून असलेली शेती नुकसानीची ठरणार आहे.
– प्रकाश जाधव
कोणत्याही शेतीमालाचे मार्केट शेतकर्यांच्या हातात नाही. त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या उत्पादनाचे नॅलिसिस करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण शेतात घेत असलेल्या पिकाचे उत्पादन दीड ते दोन पट वाढणे गरजेचे आहे. मात्र, खर्चात वाढ न करता तंत्रज्ञान अवलंबून शेती होणे गरजेचे आहे.
– प्रविण जाधव
नवशेतकर्यांनी आपल्या शेतीचा आधी सखोलपणे अभ्यास करून माहिती घ्यावी. नंतर मार्केटचा अभ्यास करावा. त्यानंतरच शेतातील पीके लागवड नियोजन करावे. त्यामुळे यश हमखास मिळते; पण त्याबरोबरच शाश्वत उत्पन्नासाठी जोडधंद्याची जोड देणे अलीकडील काळात गरजेचे झाले आहे.. त्याबरोबरच मार्केट शोधण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
– गोकुळ जाधव
9049949317, 9423093349.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
शेतीत रासानिक, सेंद्रियचा समन्वय… प्रयोगशील शेतकरी उमेश बंग यांचा शेतीचा यशस्वी मंत्र
आयात – निर्यात कंपनी सोडून शेती…; सावखेड्यातील तरूणाचे श्रम वाचविणारे हाय-टेक प्रयोग
घरातल्या घरात लॅब उभारून पाच लाख रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या “कॉर्डीसेप्स मशरूम”चे उत्पादन
सेंद्रीय भाजीपाल्यातून लाखोंचे उत्पन्न… वासरी येथील शेतकरी विठ्ठल लष्करे यांचा प्रेरणादायी प्रवास
Comments 4