मराठवाड्यातील ग्रामीण भागांसह अनेक शहरातही भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. मार्चच्या मध्यापर्यतच मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात फक्त 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील 100 लघु प्रकल्प कोरडेठाक पडले असून, 269 प्रकल्प जोत्याच्या खाली आहेत. त्यामुळे अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला गेला आहे.
छत्रपती संभाजीनगरसह कन्नड, खुलताबाद, सिल्लोड तालुक्यात पाणीटंचाई वाढली आहे. सिल्लोड तालुक्यातील 25 गावांत तर मार्चपासून 57 टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवड्यात पाण्याचा जार जागेवर 10 तर घरपोच सेवा 20 रुपयांना होती. आता जागेवर 20 रुपये आणि घरपोच 25 रुपये दर आकारण्यात येत आहेत.
काही ठिकाणी प्रशासनाने प्रकल्पातून होणारा पाणी उपसा थांबवला आहे. विहिरींची पाणी पातळी कमी झाली आहे. शेततळ्यातील पाणी संपत आले आहे. अनेक शेतकऱ्यांना उन्हाळी मिरचीची लागवड करायची आहे. मात्र पाणी नसल्याने ते हतबल झाले आहेत. यामुळे या वर्षी मराठवाड्यातील मिरचीचा पेरा घटण्याची शक्यता आहे. पुढील तीन महिने पाणीटंचाईची परिस्थिती राहणार असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी आता होत आहे.