जळगाव : कधी सुलतानी तर कधी आसमानी संकटांचा सामना करणार्या शेतकर्यांना यंदा देखील पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका असला आहे. आधीच उशिराने सुरु झालेल्या पावसाने मध्येच महिनाभर ओढ दिल्याने मूग, उडीद आणि सोयाबीनची पिके जळाली आहेत, तर कापसाच्या पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे यंदा खरिपाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या वर्षी रब्बीचा हंगाम जेमतेम हाती आला. त्याची भर खरीप हंगामात निघेल, अशी आशा शेतकर्यांना होती. मात्र, यंदा पावसालाच उशिराने सुरुवात झाल्याने कुठे दुबार, तर कुठे उशिराने पेरणी, लागवड करण्यात आली. त्यातच पावसाने महिना ते दीड महिना ओढ दिल्याने पावसावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांची पिके धोक्यात आली आहेत.
जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक लागवड
यंदा जळगाव जिल्ह्यात कापूस पिकाची 5 लाख 62 हजार 263 हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ मका 85 हजार 790, सोयाबीन 20 हजार 56, ज्वारी 18 हजार 720, मुग 14 हजार 463, उडीद 13 हजार 695, तुर 11 हजार 334, बाजरीची 9 हजार 485 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.
27 मंडळांमध्ये नुकसान
पावसाने ओढ दिल्याने जळगाव जिल्ह्यातील 27 मंडळातील शेती क्षेत्र बाधित झाले आहे. यात सर्वाधिक अमळनेर तालुक्यातील 8 आणि चाळीसगाव तालुक्यातील 7 महसूल मंडळांचा समावेश आहे. यावल तालुक्यातील 3, रावेर तालुक्यातील 3, मुक्ताईनगर 1, भडगाव 3 आणि धरणगाव तालुक्यातील 2 मंडळांचा समावेश आहे.
कापूस पिकाची वाढ खुंटली
पिकांना ज्या वेळी सर्वाधिक पावसाची गरज होती, त्याचवेळी पावसाने ओढ दिल्याने कापसाची वाढ खुंटली आहे. यामुळे झाडांना येणार्या कैर्यांची संख्या देखील घटली आहे. तर उडीद, मूग, सोयाबीन ही पिके पावसाअभावी जळाल्याची माहिती पाळधी येथील शेतकरी प्रकाश ठाकूर यांनी “अॅग्रोवर्ल्ड”शी बोलतांना दिली.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता
- उत्तर कर्नाटकात 2,000 वर्षे पुरातन पॉट इरिगेशन सिंचन प्रणाली पुनरुज्जीवित!