- तुडतुडे :- फिक्कट हिरव्या रंगाचे पौढ किटक, पानावर तिरकस चालतात. नर आणि मादीचे मिलन झाल्यावर मादी २ ते ७ दिवसांनी पानांच्या वरील पृष्ठभागावरील शिरामध्ये १ -१ पिवळी अंडी घालते. एक मादी ३० ते ४० पर्यंत अंडी घालते. अंडी घालण्यासाठी ३५ ते ४० दिवसाची कापसाची पाने आवडतात . ४ ते ११ दिवस अंडी अवस्था राहते. पिल्ले पानांच्या खालील पृष्ठभागावरून रस शोषतात व २१ दिवसात त्यांची वाढ पुर्ण होते. तुडतुडे मोठे होताना दर २ -३ दिवसांनी कात टाकतात. दिवस पानांच्या खालील बाजूस व रात्री पानांवरील बाजूस आढळतात. मादीशी संगम न झालेले तुडतुडे ३ महिन्याहून अधिक काळ जगतात. संगम झालेले तुडतुडे उन्हाळ्यात ५ आठवड्यापेक्षा व हिवाळ्यात ७ आठवड्यापेक्षा अधिक काळ जगत नाहीत. ऋतुमानानुसार १५ ते १६ दिवसात जीवनक्रम सुरू होतो. वर्षभरामध्ये ११ पिढ्या तयार होतात.
- तुडतुड्यांपासून होणारे नुकसान : – प्रौढ तुडतुडे व पिल्ले पानांतील रस शोषतात आणि पानांच्या पेशीत ओली विषारी लाळ टाकतात. त्यामुळे पानांची कडा प्रथम फिकट हिरवी व नंतर पिवळी आणि शेवटी विटकरी लाल ते तपकिरी दिसते. पानांचा रंग बदलून पाने वाळू लागतात आणि नंतर गळतात. झाडांची वाढ खुंटते. परिणामी फुलांची व बोंडांची संख्या घटते. कापसाचे उत्पादन कमी, वजन कमी भरून कापसाची प्रत ढासळते. या किडीचा प्रादुर्भाव लवकर पेरणी केलेल्या पिकामध्ये अधिक जाणवतो. पुर्ण वाढ झालेल्या पण अद्याप पंख न फुटलेला लहान तुडतुड्यापासून जास्त नुकसान होते. ही कीड पानांच्या शिरेमध्ये सुईसारखी सोंड खुपसून पानातील रस शोषतात.
- तुडतुड्याचे नैसर्गिक शत्रू :- दोन प्रकारचे क्रायसोपा तुडतुडे खातात. लेडीबर्ड बिटल (ढाल किडा ) बरेच प्रकारचे कोळी (अष्टपदी ) व मुंगळे हें तुडतुड्यांचे शत्रू आहेत. मात्र या नैसर्गिक परजीवी कीटकांचा परिणाम तुडतुड्यांची संख्या कमी करण्यासाठी फारसा होत नाही. Cephalospemum नावाची बुरशी तुडतुड्याचा नाश करते.
- तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची लक्षणे :- तुडतुडे हिरवे किंवा पिवळसर हिरवे असतात. स्पर्श केल्यास ते तिरपे चालतात. प्रादुर्भाव झालेल्या पानाच्या कडा प्रथम पिवळसर होतात व त्यावर तुडतुड्याच्या काती दिसतात. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास पानाच्या कडा खालच्या बाजूने कोकाडतात. पानाच्या कडा नंतर लालसर होतात व प्रादुर्भाव कायम राहिल तर जळल्यासारखा दिसतो. तुडतुड्याचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास बोंडे गळून पडतात व बोंडातील घागा कच्चा राहतो.
क्रमशः भाग-2
सौजन्य–
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर