मुंबई – नैऋत्य मान्सून बुधवार (24 सप्टेंबर) ते गुरुवार (25 सप्टेंबर) दरम्यान दिल्लीतून माघारी येण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. या भागातून मान्सून माघारीची सामान्य तारीख 25 सप्टेंबर आहे. यंदाही त्याच्या आसपास दिल्लीतील मान्सून हंगाम संपण्याची शक्यता आहे. बिहारमध्येही आता नवरात्रीत सप्तमीपर्यंत फारसा पाऊस नसेल. 29 सप्टेंबरच्या आसपास येथे परतीच्या पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील नियमित मान्सूनचा पाऊस मात्र अजून काही दिवस सुरूच राहणार आहे. आजही महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागात आज, 23 सप्टेंबर रोजी हलक्या ते मध्यम पावसाची तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, गोवा व मराठवाडा भागात. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्य आहे. राज्यात दिवसाचे सरासरी तापमान 28 ते 30°C पर्यंत असेल, तर रात्रीचे तापमान 25° ते 27°C पर्यंत असेल. राज्याच्या काही भागात थोडे दमट आणि काही भागात थंड असे मिश्र हवामान राहील.
राज्यासाठी पावसाचे आपडेटेड अलर्टस्
ऑरेंज: आयएमडीने नाशिकसाठी अपडेटेड ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. लगतच्या गुजरातमधील वलसाड, नवसारी आणि डांग जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट आहे.
यलो: यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष अलर्ट नाही, या भागात अपवाद वगळता फारशा पावसाची आज शक्यता नाही.
राजधानी दिल्लीत सरासरीपेक्षा 40.9% जास्त पाऊस
राजधानी दिल्ली आणि लगतच्या एनसीआरमध्ये या आठवड्यात कोरडे हवामान राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी, 2 ऑक्टोबर रोजी मान्सूनची दिल्लीतून माघार जाहीर करण्यात आली होती, तेव्हा दिल्लीत 1,000 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला होता. दिल्लीसाठी हा सातवा सर्वात जास्त पाऊस होता. आयएमडीच्या नोंदींनुसार, 1933 मध्ये सर्वात जास्त एकूण 1,421.6 मिमी पाऊस पडला होता. दिल्लीत सामान्यत: 640.4 मिमी पाऊस पडतो. यंदा दिल्लीत 40.9% जास्त म्हणजे 902.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.